03 August 2020

News Flash

थंडीतलं निसर्ग निरीक्षण

नोव्हेंबरच्या मध्यावर देशभर थंडीचा डेरा जमायला सुरुवात झालेली असते.

भारद्वाजसारखा पक्षी, पाणनिवळी, कुंभारमाशीसारखे कीटक, सोनचाफ्यासारखं सुगंधी फुलाचं झाड हे सगळे निसर्गातले घटक खरं तर आपल्यापासून फार लांब नसतात. निसर्गचक्राचं पालन करत सुखेनैव जगणाऱ्या या जीवांना समजून घ्यायला, त्यांचे जीवनचक्र समजून घ्यायला आपण थोडा वेळ मात्र काढायला हवा.

नोव्हेंबरच्या मध्यावर देशभर थंडीचा डेरा जमायला सुरुवात झालेली असते. आपल्याकडे ज्याला हेमंत ऋतू  म्हणतात, तो काळ सुरू झालेला असतो. या हेमंताची चाहूल म्हणूनच हिरवळ हळूहळू पिवळी पडायला लागलेली असते. झाडांना लागणाऱ्या वैराग्याच्या चाहुलीसोबत आसमंताला सकाळच्या उबदार उन्हाची ओढ लागलेली असते. अशा वातावरणात नजर खेचायला ना रंगीबेरंगी फुलोरा असतो ना निथळणारी हिरवाई. साहजिकच आसमंतातल्या किडामुंगीपासून पाखरांपर्यत बारीकसारीक गोष्टींकडे सहज लक्ष वेधलं जात. आपल्या सभोवती गुणगुणणारे कीटक, किलबिलणारे पक्षी आणि सुवासिक झाडं आपलं लक्ष वेधून घ्यायला सुरुवात करतात.

धावपळीच्या आयुष्यात, झटपट रिचार्ज हवा म्हणून मुलांना घेऊन जवळच्या जंगलात फेरफटका मारायला गेलं असताना भल्या सकाळी ‘कूऽऽप कूऽऽऽप’ असा गंभीर आवाज आल्याबरोबर त्या आवाजाचा धनी शोधायला सुरुवात केली. त्या गंभीर आवाजाच्या धन्याचं दिसणं, त्याचं ओरडणं त्याच्या नावाप्रमाणेच भारदस्त म्हणावं असं आहे. कावळ्याहून मोठा असणारा भारद्वाज दिसला आणि जाणवलं की आपल्या अवतीभोवती सहज दिसणारे काही पक्षी आठवायचे म्हटले तर पहिल्या दहा पक्ष्यांमध्ये भारद्वाजचा वरचा क्रमांक येऊ शकतो. कावळ्यापेक्षा मोठा आणि ठळक रंगाचा हा पक्षी दिसला तर शुभ मानणारे अनेक जण अवतीभोवती दिसतात. कुकुलिडी कुटुंबातल्या काही सदस्यांना आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाहात असतो.  कोकिळा, पावशा आणि भारद्वाज हे पक्षी माहीत नसलेली व्यक्ती विरळाच. अनेकदा या पक्ष्याला येता-जाता पाहिलेलं असतं पण माहीतच नसतं की हाच तो भारद्वाज! कुकुलिडी कुटुंबातल्या बहुतेक सदस्यांचं वैशिष्टय़ म्हणजे यातले बहुतांश सदस्य घरटी बांधत नाहीत. ते इतर पक्ष्यांच्या घरटय़ात आपली अंडी घालून आपल्या पिल्लांचं पालकत्व दुसऱ्यांवर लादतात. याला सन्माननीय अपवाद म्हणजे हा भारद्वाज.

क्रो फेजंट म्हणून ओळखला जाणारा भारद्वाज पक्षी डोंबकावळ्याच्या आकाराचा असतो. रखरखीत काळ्या रंगाच्या शरीरावर लाल मातकट विटकरी रंगाचे पंख असलेला हा पक्षी त्याच्या लांबसडक पंख आणि शेपटीमुळे नजरेत भरतो. मोकळ्या माळरानांवर, झाडांवर, मानवी वस्त्यांजवळ सहज वावरणारा भारद्वाज त्याच्या गुंजेसारख्या लाल डोळ्यांमुळे कायम लक्षात राहतो. भारद्वाजाची शेपटीदेखील या कुटुंबाचं वैशिष्टय़ दाखवणारी असते. एकावर एक पिसं असलेली शेपटी जणू पायऱ्या पायऱ्याच वाटावी अशी दिसते. कोकणात ‘कुक्कुड कोंभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारद्वाज पक्ष्याचे नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. आकाराला दादा दिसणाऱ्या भारद्वाजाचा आहार त्याला साजेल असाच असतो. मोठे किडेमकोडे, अळ्या, गोगलगाई, विविध सुरवंट, उंदीर, सरडे खाणारा हा पक्षी अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. हा इतर लहान पक्ष्यांची अंडी पळवतो नि खाऊन टाकतो.  पाम ऑइल ज्यापासून बनते त्या पामच्या बागांना भारद्वाज पक्षी मोठा धोका समजले जातात, कारण एकदा का पामची फळे पिकायला लागली की त्याचा गर खायला भारद्वाज हजर होतात आणि बागांची प्रचंड नासधूस करतात.

साधारण पावसाळ्यानंतरचा काळ या दादा पक्ष्याचा मीलनाचा काळ समजला जातो. नर मादीच्या मागे मागे फिरून तिला वश करण्याचा प्रयत्न करतो. या वशीकरणासाठी तो तिला खाण्याचे पदार्थ भेट म्हणून देतो, जे ती स्वीकारते. मीलनाच्या हंगामात नर आणि मादी एकाच जोडीदाराबरोबर सूत जमवतात. मीलनानंतर, साधारण आठवडाभरात नर उंच झाडावर, कपाच्या आकाराचे घरटे बनवतो. या घरटय़ासाठी, बांबूची पानं, सुकलेल्या वेलीचे तुकडे आणि काटक्यांचा वापर होतो. तयार झालेल्या घरटय़ात मादी साधारण चार-पाच अंडी घालते. नर आणि मादीने मिळून काळजी घेतलेल्या अंडय़ातून पंधरवडय़ात पिल्लं बाहेर येतात. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी दोन्ही पालक पार पाडतात, हे अजून एक वैशिष्टय़ म्हणावं लागेल. भारद्वाज त्याच्या ओरडण्यासाठी प्रसिद्ध आहे. कूप कूप असा धीरगंभीर आवाज अनेकदा सकाळच्या पारी किंवा उतरत्या संध्याकाळी ऐकायला येतो. एकाच वेळी अगदी दहा-पंधरा वेळाही हा आवाज भारद्वाज काढू शकतो. आपल्या देशात सगळीकडे सापडणारा हा पक्षी अनेकदा जमिनीवर उडय़ा मारताना दिसतो. याचं कारण याच्या फ्लाइट्स म्हणजेच भराऱ्या फार तीव्र नसतात. नर-मादी असे जोडीने फिरणारे भारद्वाज अनेकदा आपण पाहतो. याच्या दिसण्याला आपल्याकडे शुभ शकुन समजतात. मात्र गंमत अशी आहे की, उत्तरेकडे अनेक ठिकाणी याला अशुभ समजतात. शुभ काय, अशुभ काय, आसमंतात कुठलाही पक्षी मुक्तपणे वावरताना पाहणे हे निव्वळ सुखच असतं हेच खरं.

भारद्वाज कुठे दिसतोय याचा अंदाज घेत पुढे गेल्यावर उष्णतेने कडांना सुकायला लागलेल्या पाणवठय़ाजवळ गुणगुण करीत माश्यांची चाललेली लगबग नजरेत भरली. ओल्या मातीत बसून उडणाऱ्या माश्या निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की, अरेच्चा, या तर कुंभारमाशा आहेत. आणि त्यांची सुरू असलेली लगबग म्हणजे दिवस भरत आल्यावर घर बनवण्याची खूण आहे. आपल्याला घरं बनवायला महिनेच काय, वष्रे लागतात, पण हे किडेमकोडे पाहा, दोन-तीन दिवसांत घर बांधून तयारही करतात. ‘वेस्पीडाई’ कुळातली पॉटर वास्प, अर्थात कुंभारमाशी आपल्या कडकडीत डंख मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कुंभारमाशा घर बनवण्याची तयारी म्हणून स्वत:च्या शरीराचा अंदाज घेत स्वत:भोवती एक िरगण बनवून त्यावर घर बांधायचं ठरवतात. दिवसभर पाणवठय़ावरून इकडून तिकडून उडून ‘अक्कणमाती चिक्कणमाती’ असं गुणगुणत ओलसर जागेतले चिकणमातीचे कण गोळा करीत, स्वत:च्या लाळेने ते नीट एकमेकांमध्ये रचून लहानसं मडक्यासारखं घर बनवतात. अगदी कुंभार बनवतो तसं सुबक आकाराचं मडकं बनवायला किती मेहनत करतात या कुंभारमाशा. इकडे घर बनवायला त्यांच्या या शेकडो फेऱ्या मारणं सुरू असताना तिकडे कुंभारभाऊ मात्र दुसऱ्या कुंभारणींच्या मागे ‘लाळघोटेपणा’ करीत फिरतात. साधारण घरटय़ाचा हा रांजण बनत आला की आतल्या पिलांना आपल्या पश्चात खाण्याची विवंचना पडू नये म्हणून अन्न गोळा करायला मादी सुरुवात करते. आसपास िहडून फुलपाखरांच्या अळ्या, कोळी, रातकिडे, झुरळं असले ‘खाद्यपदार्थ’ गोळा करून आणण्याचं काम करताना हे लहानसे जीव केवढा मोठा विचार करतात. हे पदार्थ जिवंतच घरात बंद केले तर ते पळून जातील आणि मारून ठेवले तर सडून जातील व आतील पिल्लं उपाशी मरतील याची जाणीव कुंभारमाशीला नीट माहीत आहे. म्हणूनच भक्ष्यांना पकडल्यावर स्वत:च्या विषाची नांगी मारून त्यांना बधिर करून पॅरेलाइज करून ठेवते. हाच तो गांधीलमाशीचा प्रसिद्ध चावा. म्हणजे आतली पिल्लं मोठी होईस्तो हे खाद्यपदार्थ जिवंत राहतात. आपण मनुष्यप्राणी उगाचच ‘भूलथापा’ मारतो की आम्ही भूल देण्याचं तंत्र शोधून काढलं वगरे. खरं तर ही भूल देण्याची पद्धत आपल्याही आधीपासून कुंभारमाश्यांनी शोधून काढलीय, हेच खरं! निसर्गात, अपत्य संगोपनात बहुतांश जबाबदारीची कामं माद्यांकडे सोपवलेली दिसून येतात, जसं सस्तन प्राण्यांच्या माद्या पिलांना दूध पाजतात. कुंभारमाशीचा कुप्रसिद्ध डंख फक्त मादीच मारू शकते. कारण तिला अपत्य संगोपनातली महत्त्वाची कामगिरी पार पाडायची असते. एकदा का हा पुरेसा खाण्याचा साठा केल्यावर नाजूक तंतूने स्वत:ची अंडी या घरात टांगून ठेवण्याचं काम करून पुन्हा तशाच फेऱ्या मारून मादी या घराचं तोंड िलपून बंद करून टाकते. याच्या पुढचं काम निसर्ग चोख बजावतो. अंडय़ाची वाढ झाल्यावर त्यातून अळ्या बाहेर येतात. या अळ्या आईने बेगमी करून ठेवलेल्या अर्धमेल्या खाण्यावर जगतात. थोडय़ा मोठय़ा होऊन पुन्हा कोषात जातात. कोषातून बाहेर आल्यावर रांजणाचे तोंड फोडून घराबाहेर नवीन आयुष्य जगण्यासाठी झेप घेतात. इतक्या सगळ्या दिवसांमध्ये घरटय़ातलं कुठलंही भक्ष्य पूर्ण मरत नाही की सडत नाही. या आईला नीट माहीत असतं की आपल्या पिलांना किती खाणं लागेल नि तेवढाच साठा ती करून ठेवते. या कुंभारमाश्या शक्यतो दुसऱ्या कुणी बनवलेलं घर वापरत नाहीत. स्वत: मेहनतीने बनवलेल्या घरातच ही पिल्लं जन्माला येतात. मला खात्री आहे की, येत्या जानेवारी महिन्यात संक्रांतीला देण्यासाठी जेव्हा मातीची सुगडं आणल्यावर नक्कीच सगळ्यांना गांधीलमाशीची आणि तिच्या घराची आठवण येईल.

कुंभारमाश्यांची लगबग निरखत असताना समोरच्या पाणवठय़ावर मधूनच तरंग उमटायचे आणि ‘सुर्र सुर्र’ हालचाल होताना दिसत होती. ती हालचाल निरखल्यावर मुलांच्या तोंडातून अगदी योग्य शब्द बाहेर पडला तो म्हणजे पॉण्ड स्केटर्स! पाणनिवळी म्हणून ओळखले जाणारे आणि बहुतांश पाणवठय़ांवर वास्तव्य करणारे हे कीटक खरंच पॉण्ड स्केटर्स म्हणूनच ओळखले जातात. हेमिपेट्रा गटातले हे कीटक जगभर पाणवठय़ांवर सुखेनव नांदताना दिसतात. या पाणनिवळ्या मोठय़ा मजेशीर असतात. एखाद्या लांबुळक्या होडीला लाजवेल अशी आपली लांबुळकी देहयष्टी घेऊन पाण्याच्या पृष्ठभागावर सटासट विहरत असतात. यांच्या सहा पायांच्या तीन जोडय़ांपकी पुढची पहिली जोडी मुख्यत्वे तरंगण्यासाठी आणि उदरभरण करण्यासाठी वापरली जाते. मधली दुसरी जोडी लांबसडक असल्याने जणू वल्हच बनते आणि तरंगायला, पुढेमागे व्हायला उपयोगी पडते. राहता राहिली मागची जोडी, जी दिशादर्शक म्हणून काम करते. लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे, पाणनिवळीचे मधले व मागचे मिळून चारही पाय शरीरापेक्षा भरपूर मोठे असतात. निवळीच्या सर्व पायांना हजारो सूक्ष्म केस असतात, ज्यांच्यामधे हवा अडकली जाते आणि निवळ्या पाण्यावर सहज तरंगतात. पाण्यावर पडलेला कीटक, किडे कंपन निर्माण करतात जे या संवेदनाक्षम केसांमुळे निवळ्यांना सहज समजतात. पाण्यात पडणारे किडे, कीटक खाऊन जगणारी ही पाणनिवळी पूर्णवेळ पाण्यात राहत नाही. स्वत:च्या पंखांचा वापर स्थान बदलायला या पाणनिवळ्या करतात. बाकी निसर्गातल्या सामान्य कीटकांप्रमाणेच अंडी, अळी आणि कोषातून जीव मोठा होण्याचं निसर्गचक्र पाळणाऱ्या या पाणनिवळ्या गिर्यारोहक, निसर्ग अभ्यासकांना परिचित असतातच. उणंपुरं सहा महिने आयुष्य जगणाऱ्या या निवळ्या ज्यात फिरतात ते पाणी स्वच्छ असतं असा अनुभव बहुतेकांनी घेतला असतोच. एखाद्या पाणवठय़ाजवळ बसल्यास अशा अनेक गोष्टी नजरेस पडतात, ज्यांचा विचार सहसा आपल्या मनात येत नाही.

पाणवठय़ावर बसून बराच वेळ या पाणनिवळ्यांची पकडापकडी पाहत बसण्यात वेळ कसा निघून गेला हेच कळलं नाही. परतीच्या वाटेवर अचानक चिरपरिचित सुगंधाने आम्हाला स्टॅच्यू केलं. दीर्घ श्वास घेतल्यावर जाणवलं की, जवळपास कुठे तरी सोनचाफ्याचं झाड फुललंय म्हणूनच एवढा घमघमाट पसरला आहे. मराठीत सोनचाफा म्हणून ओळखलं जाणारं हे झाड, इंग्रजीत यलो जेड ऑíकड ट्री म्हणून ओळखलं जातं. मंगोलिआ चंपाका या गटातलं सदाहरित प्रकारातलं हे झाड भारतभर मस्तपकी फुलतं. मला आठवतंय, शाळेत असताना भारताच्या भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थितींबद्दल शिकले होते. बहुतांश लोक शाळा संपल्यानंतर यातल्या निम्म्याहून जास्त गोष्टी विसरून जातात. आपल्याला नजरेसमोर दिसणारी झाडं कुठली आहेत, त्यांचं कूळ काय, ती कुठून आली आहेत, असे प्रश्न बहुतेकदा पडतच नाहीत. किंबहुना प्रश्न पडायची वेळच आपण येऊ देत नाही. त्यामुळे आपले अस्सल देशी वृक्ष आपल्याला माहीतच नसतात. म्हणून दूर ‘किवी नि कांगारूंच्या देशातून’ आलेली झाडं आपल्याला आपलीच वाटतात. अशा वेळेला त्या झाडांची नाही तर आपलीच कीव येते. सोनचाफा किंवा सुवर्ण चंपक या नावाने ओळख धारण करणाऱ्या या झाडाला भारतीय भाषांमध्ये भरपूर नावं आहेत. संपूर्ण भारतवर्षांत आढळणारं एक सुंदर झाड म्हणून सोनचाफ्याकडे सहज बोट दाखवता येऊ शकतं. सोनचाफ्याची फुलं घोसात येतात. गम्मत म्हणजे ही फुलं असतात घोसात, पण एक एक करून उमलतात. मधे दांडा नि भोवती अनेक पाकळ्या असलेलं हे पिवळट छटेचं फूल तसं नाजूक असतं. आपल्याला बहुतांशी पिवळसर केशरी सोनचाफाच माहीत असतो. मात्र दक्षिण भारतात याच्या फुलांचे पांढरे, केशरी, गुलाबी, पिवळे आणि पिवळ्या छटेचे मिश्र प्रकार पाहायला मिळतात. झाड साधारण पंधरा वर्षांचं झालं की त्याला फुलं यायला सुरुवात होते.

या फुलांचा वास भन्नाटच असतो. जगभर या सुगंधाला जॉय स्मेल या नावाने ओळखलं जातं. इतकंच नाही तर जगातल्या सर्वात महागडय़ा अत्तरांपकी एक अत्तर ‘जॉय’ची निर्मिती याच फुलांमुळे झाली आहे. उत्तरेपेक्षा भारताच्या मध्य भागापासून दक्षिण भारतात याची लागवड जास्त आढळून येते. पूर्वी देवपूजेच्या जोडीलाच केसात माळण्यासाठी या फुलांचा उपयोग व्हायचा. हल्ली मात्र अत्तर उद्योगासाठी आणि मोठमोठय़ा हॉटेल्समध्ये सजावटीसाठी याची लागवड केली जाते. रस्त्याच्या कडेला सावलीसाठी, उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी हे झाड उपयुक्त आहे. प्रचंड न वाढता व्यवस्थित वाढणारं झाड, जास्त पालापाचोळा न करणारं झाडं, पक्ष्यांचा सदैव वावर असणारं बहुगुणी झाड म्हणजे सोनचाफा. सोनचाफ्याला फुलं येऊन गेल्यावर त्याच जागी त्याच्या फळांचे घोस येतात. सुरुवातीस ही फळं हिरवी असतात. मग भुरकट- राखडी होऊन शेवटी उकलून त्यातून लालसर- काळसर बिया बाहेर पडतात. या फळांना भरपूर रसरशीत गर असतो. याच कारणासाठी मना, पोपट, साळुंक्या, चिमण्या, कोकिळा आदींचा या झाडावर सतत राबता असतो. एकदा भूक लागली असताना ही फळं मी खाऊन पाहिली होती. तेव्हा सहज जाणवलं होतं की किंचित कडसर, गोडसर नि तुरट चवीची फळं आपलंही पोट भरू शकतात. जर बीमधून झाड जन्माला आलं असेल तर त्याला साधारण पंधरा वर्षांत फुलं येतात. पण आधुनिक कलम पद्धतीने केलेल्या झाडांना मात्र चार-पाच वर्षांत फुलं येतात. या झाडाची पानं चांगली तळवाभर आकाराची असतात. म्हणूनच त्यांच्याआड सोनचाफ्याची फुलं बेमालूम लपतात. पानांआडची फुलं शोधताना सोनचाफ्याची माहिती ओंजळीत मिळाल्याचं समाधान अनुभवत असताना निसर्गातली एक महत्त्वाची गोष्ट मुलांना जाणवली. ज्या फुलांना भडक रंग असतो, त्यांच्याकडे सुवास नसतो. कीटकांना आकर्षति करण्यासाठी भडक रंगाची कमतरता उत्तम सुवास देऊन निसर्ग भरून काढतो.

कुंभारमाशी, पाणनिवळीसारखे लहान घटक निसर्गात सुखेनव नांदत असतात. वलयांकित प्राणी आणि पक्षी लक्षात ठेवताना आपण यांना किरकोळ म्हणून आठवत नाही. उत्क्रांती होत असताना शतकानुशतकं, हे प्राणी कुठलीही अपेक्षा न ठेवता सहजप्रेरणेने अपत्य संगोपन करीत असतात नि स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी सशक्त आणि निरोगी पिढी जन्माला घालून मोठी करीत असतात. ज्यांना आपण तुच्छ किडेमकोडे समजतो अशा या ग्रेट पालकांची गृहनिर्मितीची कला किंवा अपत्य संगोपनाची हातोटी, परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला आणि निसर्गाने दिलेल्या एखाद्या देणगीचा वापर करायचं कौशल्य, हे सगळं अनुभवणं, निरखणं गरजेचं आहे. यानिमित्ताने निसर्गात एकमेकांशी जोडलेली निसर्गसाखळीही समजेल आणि निसर्गवाचनाचा छंदही जोपासला जाईल. बदलत्या ऋतूने गुलाबी थंडीत निरीक्षणाचा टीपकागद बनून निसर्ग शोषून घ्यायला निघायचं आमंत्रण दिलंय. मी निघतेय आसमंत धुंडाळायला, तुम्हीही चला.
रुपाली पारखे देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2016 1:03 am

Web Title: observing nature in winter
Next Stories
1 जंगलाची भूषणं!
2 निसर्ग पर्यटनाची वेळ झाली
3 पर्यावरणीय सीमोल्लंघन
Just Now!
X