03 August 2020

News Flash

वैज्ञानिक नागपंचमी

साप डूख धरून माग काढत येतात असं आपण समजतो.

साप डूख धरून माग काढत येतात असं आपण समजतो. खरंतर ते समागमोत्सुक मादीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या स्त्रावाच्या गंधाचा माग घेत आलेले असतात..

सापांचं विश्व इतकं वेगळं आणि अद्भुत आहे आणि आपण मात्र ते समजून न घेता दिसला साप की हाण काठी याच न्यायाने वागत असतो.

आसमंतात पावसाळा स्थिरावला की सुरू होतात ते पुनíनर्मितीचे सोहोळे. मुबलक चारा, पाणी उपलब्ध झाल्याने अवघी जीवसृष्टी सुखावलेली असते. आषाढ सरत नाही तर मनाला ओढ लागते ती मनभावन श्रावणाची. आपल्या देशातले बहुतांश सण हे ऋतुचक्रावर आधारलेले असतात. श्रावणातली शुद्ध पंचमी ही पूर्वापार नागपंचमी म्हणून या कृषीप्रधान देशात भक्तिभावाने साजरी केली जाते. या सदरातून ‘आसमंता’चं चक्र साजरे करणारे आपण नागपंचमीला कसे विसरू? आजच्या आसमंतातल्या गप्पा क्षेत्रपालांच्या, अर्थात सापांच्या असणार आहेत.

कृषीवलांचा देश म्हणून पूर्वापार ओळखल्या जाणाऱ्या आपल्या देशात सापांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायला नागपंचमीच्या सणाला सुरुवात झाली असावी. ज्या देशातली बहुतांश प्रजा निव्वळ शेतीवर अवलंबून असते, त्या देशात नागपंचमीसारख्या सणाला सुरुवात होणं स्वाभाविकच होतं. मात्र आधुनिकीकरणाच्या रेटय़ात या सणाच्या निर्मितीमागचा सुंदर हेतू मागे पडून अंधश्रद्धा व भीतीच्या विळख्याने या सणाला कधी ग्रासलं हेच कळलं नाही. साप म्हणजे सरपटणारा मृत्यू हे समाज मनात पक्कं बसलेलं भीतिदायक समीकरण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हायला लागल्यावर हळूहळू बदलायला सुरुवात झाली. या बदललेल्या दृष्टिकोनामुळे  सापांचं सोप्पं वर्गीकरण, त्यांचे आपल्याला असलेले पारंपरिक व नवनवीन उपयोग स्वीकारायला सुरुवात झाली. सरसकट सगळेच साप मृत्युदूत नसतात हे मोठं सत्य समाजमनाने स्वीकारायला सुरुवात केली. जगभर साधारण तीन हजार जातीच्या सापांची नोंद झाली असून आपल्याकडे साधारण दोनशे सत्तर जातीचे साप आढळतात. या सापांपकी मुख्य चार जातीचेच साप, म्हणजेच ‘बिग फोर स्नेक्स’ मानवाला धोकादायक असतात. या मुख्य चार विषारी सापांमध्ये नाग, मण्यार, फुरसं आणि घोणस या सापांचा समावेश होतो. भारतीय राजनाग अर्थात किंग कोब्रा हा सर्वात मोठा विषारी साप आपल्या भोवती सहज दिसत नाही. या पाच जणांखेरीज उरलेले सर्व साप आपल्यासाठी प्राणघातक नसतात!

विस्ताराअभावी सापांबद्दल सखोल लिहिणं शक्य नाहीच, पण थोडक्यात आढावा घेताना आपल्याला सहज जाणवतं की शेतीला त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर, घुशीसारख्या छुप्या शत्रूंचा नायनाट करण्याचं पारंपरिक काम हे सर्पजगत करत असतं. सापाचा चावा म्हणजे मृत्यू हा गरसमज पिढय़ान्पिढय़ा पक्का झाल्याने सर्व साप विषारी समजले जातात. आपल्याकडे आढळणाऱ्या प्रमुख चार विषारी जातीच्या सापांपकी भारतीय चष्मेवाला नाग, अर्थात इंडियन कोब्रा किंवा स्पेक्टय़ाकल्ड कोब्रा हा त्याच्या आकर्षक फण्यामुळे सहज ओळखता येतो. मण्यार, अर्थात इंडियन क्रेट किंवा कॉमन क्रेट हा अतिशय शांत आणि निशाचर असलेला साप चटकन नजरेस पडत नाही. या दोन्ही सापांचं विष न्युरोटॉक्सिक म्हणजेच शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतं. उरलेल्या दोनांपकी घोणस ऊर्फ रसेल्स व्हायपर हा अंगावर असलेल्या रुदाक्षासारख्या नक्षीसोबतच फुत्कारण्यामुळे ओळखला जातो. राहाता राहिलं फुरसं ऊर्फ सॉस्केल्ड व्हायपर. हा साप आकाराने लहान असला तरी जहाल विषारी म्हणूनच ओळखला जातो. या दोघांचं विष हेमोटॉक्सिक म्हणजेच रक्तावर परिणाम करणारं समजलं जातं. असे विषारी साप चावल्यावर मज्जासंस्थेवर होणारे परिणाम प्रत्यक्ष बाह्य़ शरीरावर दिसत नाहीत. म्हणूनच घोणस व फुरसे चावल्यावर शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव सुरू होतो. मेंदू, आतडे, कान, नाक व लघवीतून होणारे हे रक्तस्त्राव अतिशय जीवघेणे असतात. हीच गोष्ट नाग व मण्यारीच्या चाव्याला लागू पडते.

28-shravan

नाग अथवा मण्यार चावल्यावर विषाचा मज्जासंस्थेवर परिणाम होऊन शरीरावरचा ताबा जातो. शरीरात विष भिनून हे सर्व परिणाम दिसायला काही काळ जावा लागतो. मात्र आपल्याला साप चावलाय या भीतीने बहुतांश रुग्ण भीतीने गळपटतात. अनुभवी डॉक्टर लक्षणं पाहूनच या विषारी चाव्यावर असलेला एकमात्र उपाय, प्रतिसर्पविष रुग्णाला टोचतात. बिनविषारी साप चावल्यावर कुठलीही व्यक्ती मरत नसते. भीतीचा व दुखण्याचा बहर ओसरला की माणूस अगदी नॉर्मल होतो. मात्र, विषारी सर्पदंश झाला असेल तर कुठल्याही प्रकारचा अंगारा, धुपारा, गंडेदोरे, मंत्रतंत्र करून विष उतरत नाही. त्यासाठी प्रतिसर्पविष हाच एकमेव उपाय असतो. निसर्गात घोडा आणि मेंढी हे दोनच प्राणी असे आहेत जे शरीरात शिरलेल्या सापाच्या विषाचा प्रतिकार करू शकतात. या प्राण्यांना काही आठवडे सापाच्या विषाचे इंजेक्शन विषाच्या दहास एक इतक्या कमी मात्रेत टोचले जाते. ही मात्रा प्राणघातक नसते. दर आठवडय़ाला हे प्रमाण काही पटीने वाढवलं जातं. साधारण तीन महिन्यानंतर या प्राण्यांच्या शरीरातील रक्तात या विषाविरुद्ध झगडणारी प्रतिकारशक्ती तयार झालेली असते. हे प्रतिक्षम रक्त काढून प्रयोगशाळेत गोळा केलं जातं. एका विशिष्ट यंत्राद्वारे यातील लाल व पांढऱ्या पेशी वेगळ्या केल्या जातात. या पांढऱ्या पेशी म्हणजेच जीवदायी लस. अर्थात, हे प्रतिसर्पविष म्हणजे जादूची कांडी नाही. प्रत्येक औषधाचे दुष्परिणाम असतात तसेच याचेही आहेतच. विषारी सापच चावला आहे याची खात्री झाल्याखेरीज हे दुसरे विष शिरेत टोचताच येत नाही. ही लस बहुतांश घोडय़ाच्या रक्तापासून बनवलेली असल्याने मानवी रक्त घोडय़ाच्या रक्तातील प्रथिनं स्वीकारताना अ‍ॅलर्जी दाखवू शकते. हे प्रतिसर्पविष शरीरात टोचणारी व्यक्ती निष्णात असावीच लागते. कारण ही लस स्नायूत वा शिरेत टोचली जाते. एकदम जास्त प्रमाणात डोस दिला गेला तर रुग्णाला हुडहुडी भरते, दम लागतो, अ‍ॅलर्जी येते. अस्वस्थपणा, मळमळ, उलटी होऊन डोकेदुखीबरोबर सांध्यांमधेही दुखु शकते. त्यामुळे ते हळूहळू शिरेतून टोचावे लागते. म्हणूनच ही लस कधीच बोटांवर, अंगठय़ात दिली जात नाही. विषारी साप चावणं कधीही वाईटच, पण  प्रतिसर्पविष वेळेत म्हणजे साधारण दोनेक तासांत मिळालं तर त्यातूनही वाचता येतं.

या चार विषारी सापांव्यतिरिक्त आपल्या अवतीभोवती आढळणारे साप बिनविषारी असतात. धामण, अर्थात रॅटस्नेक तर शेतकऱ्याचा मित्र समजला जातो. महिन्याला शेकडय़ांनी धान्याचा नाश करणारे उंदीर फस्त करणारा हा साप नागाशी असलेल्या किंचित साम्यामुळे अजूनही विषारी समजून मारला जातो. धामण आपल्या शेपटीने जी स्काऊट गाठ मारते त्यातून जन्माला आलेला गरसमज म्हणजे तिच्या शेपटीत असलेल्या काटय़ाने मनुष्यास इजा करते. दुसरा मोठा गरसमज म्हणजे ती दुभत्या जनावरांच्या आचळातून दूध पिते. प्रत्येक सजीवाला पाण्याची गरज असते. सापही याला अपवाद नसतात. पण म्हणून या गरजेसाठी शंभर टक्के मांसाहारी असलेला कुठलाही साप दुभत्या जनावराकडे जाऊन दूध पीत नाही. उंदीर, घुशी, बेडूक, सरडे, इतर लहान साप, पक्ष्यांची अंडी असा आहार असणारे साप सहजच किंवा विनाकारणही दूध पीत नाही. पाण्यात, मातीत सहजतेने वावरताना डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून निसर्गत: सापाच्या डोळ्यावर एक पारदर्शक पडदा असतो. यामुळेच साप पापणी न लवता पाहून संमोहित करतात असा गरसमज जोपासला गेला आहे. हात आणि पायाप्रमाणेच सापांना कानही नसतात. जमिनीवर निर्माण होणारी आघात कंपनं त्यांना त्वचेद्वारे समजत असतात. या शारीरिक कमतरतेत, अधू दृष्टीचा शाप हा गरीब जीव भोगत असतोच. म्हणूनच नजरेच्या काही फुटांपलीकडे सापाला कुठलीही गोष्ट स्पष्ट दिसत नाहीच. त्यामुळे गारुडय़ाने अगदी चेहऱ्याजवळ हलवलेल्या पुंगीकडे नाग वळून पाहात नसतो, तालावर डोलत नसतो हे सत्य हल्ली आपल्याला पचायला लागलंय. सापाला घाम येत नाही. शरीरात जमणारी विषारी द्रव्यं त्याच्या त्वचेखाली जमतात आणि ती कात टाकण्याच्या स्वरूपात फेकली जातात. कात टाकल्यानंतर त्वचा चकचकीत दिसते आणि त्याचा पुनर्जन्म झाला, तो अमर आहे अशी अंधश्रद्धा आपण जोपासतो. याच कातीचे काही तुकडे अंगावर राहून गेल्यास सापाला केस आल्याचं सांगितलं जातं. सापाची अधू दृष्टी, बहिरेपण यावर तोडगा म्हणजे, हवेत पसरलेले गंधकण साप सतत गोळा करून आपल्या टाळूजवळ असलेल्या जेकबसन नामक इंद्रियाकडे पोहोचवत असतो. यातूनच तो आपलं भक्ष्य, तसंच साथीदाराची चाहूल घेत असतो. भित्यापाठी ब्रह्मराक्षस या उक्तीप्रमाणे सापाची प्रत्येक कृती आपल्याला धोकादायक वाटत असते. साप जिभेने संमोहित करून दंश करतात हा गरसमज यातूनच जोपासला गेला आहे. मांडुळासारख्या निरुपद्रवी सापाला शेपटी आणि तोंडाच्या साम्यामुळे दुतोंडय़ा संबोधलं जातं. पण कुठल्याही सापाला दोन तोंड नसतात हेच खरं.

29-shravan

अडगळीच्या जागा, दगडधोंडे, पडक्या वास्तू जिथे मानवी वावर नसतो अशा जागा म्हणजे सापांची पारंपरिक वसतीस्थानं समजली जातात. कधीकाळी चुकून अशा ठिकाणी धन सापडल्यामुळे साप गुप्त धनाची राखण करतात ही अंधश्रद्धा जन्माला आली. सापाकडे कुठलाही नागमणी नसतो. त्याच्या पित्ताशयात तयार होऊन विष्ठेद्वारे बाहेर फेकले गेलेले बेन्झाइन अ‍ॅसिडचे खडे नागमणी म्हणून विकले जातात. व्यक्ती तितक्या अंधश्रद्धा ही उक्ती सापाबाबतीत लागू पडते. सापासारख्या गरीब जीवाभोवती मानवी भावनांचे इतके इमले रचले गेलेत की बस रे बस. या सर्व अंधश्रद्धांच्या जोडीला सापाच्या प्रजननाबाबतीत अनेक गरसमज भले भले बाळगून असतात. साप सेक्स म्हणजे शारीरिक प्रेम कसं करतात? त्यांना आपल्यासारख्या भावभावना असतात का? किती काळ त्यांचा सेक्स चालतो? असे प्रश्न आजही बहुतांश वेळा अनुत्तरित सोडले जातात.

निसर्गातल्या प्रत्येक सजीवाची प्रजनन ही अगदी सहजसुलभ भावना आहे. फक्त मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या मानाने जास्त प्रगत झाल्याने त्या सहज क्रियेभोवती आपल्या भावभावनांचे इमले रचले गेले आहेत. अगदी स्पष्ट बोलायचं तर निसर्गात मनुष्य हा एकच असा प्राणी आहे जो इतरांच्या प्रजनन क्रियेबद्दल कुतूहल बाळगतो. प्रत्येक प्रजातीला आपला वंश पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रजनन करणे गरजेचे असते. मनुष्येतर प्राण्यांसाठी प्रजननासाठी समागम ही निव्वळ गरज असते. निसर्गात वंशवृद्धीच्या गरजेपोटी शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात. मनुष्यप्राणी म्हणजे अगदी मांजरच. दिसेल त्या उघडय़ा भांडय़ात डोकावलंच पहिजे या वृत्तीने वागणारा. या कुतूहलातूनच सापाच्या प्रजननाबद्दल गरसमज निर्माण झाले आहेत.

सापांचे सामाजिक जीवन हे निव्वळ पुनरुत्पादनापुरतेच मर्यादित असते. सस्तन प्राणी किंवा पक्ष्यांप्रमाणे ते आपल्या पिल्लांची अजिबात काळजी घेत नाहीत. यामुळे त्यांच्याकडे अर्थातच कुटुंबसंस्थादेखील अस्तित्वात नसतेच. भारतासारख्या विविध ऋतूंच्या देशात बहुतांश सापांचा पावसाळा हा मेटिंगचा म्हणजेच मिथुनाचा काळ असल्याने बरेचदा सजातीय साप जोडीने दिसून येतात. मादीला गर्भधारणा झाल्यानंतर ही जोडी शक्यतो फुटून जाते. वर उल्लेखल्याप्रमाणे सापांमध्ये कुटुंबसंस्था नसल्याने एकमेकांबद्दल प्रेम, स्नेह नसतोच. याच विधानाला धरून सांगायची बाब म्हणजे साथीदाराला मारल्यास दुसरा डूख धरतो आणि माग काढत येतो असं जे म्हटलं जातं ते साफ चुकीचं आहे. समागमाच्या काळात नराला आमंत्रण देण्यासाठी मादीच्या त्वचेतून अथवा गुदद्वाराजवळील ग्रंथीतून झिरपणाऱ्या विशिष्ट स्रावामुळे नर मागोवा घेत मादीच्या दिशेने येतो. पूर्वी सापाला मारण्यासाठी वापरण्यात आलेले अस्त्र म्हणजे काठी, चप्पल इ. परसातच ठेवले जायचे. एखाद्या मादीला त्या अस्त्राने मारलं गेलं असेल आणि मादीच्या शरीराच्या विशिष्ट गंधाचे कण या अस्त्राला लागलेले असतील तर त्याचा माग काढत नर तिथे पोहोचायचे नि आपलं भित्रं मन लगेच समजूत करून घ्यायचं की हत्येचा बदला घ्यायला डूख धरलेला साप आला आहे. सापाची सतत आत-बाहेर होणारी जीभ हवेतील वेगवेगळे गंधकण गोळा करून सभोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान  करून घेत असते. समागमाला तयार असलेल्या साथीदाराचा मागोवा हा त्यातला एक भाग आहे. हल्ली अशा भीतीने सापांना मारायचे प्रमाण कमी झाले असले तरीही ग्रामीण भागांमध्ये अजूनही या गोष्टी सुरू आहेतच.

30-shravan

ज्याप्रमाणे निसर्गातील कित्येक प्राण्यांमध्ये नर व मादी वेगवेगळी कळून येतात त्याप्रमाणे सापांमध्ये नर व मादीमध्ये असलेला शारीरिक फरक चटकन लक्षात येत नाही. त्यामुळे समागमाच्या काळात फक्त या गंधाद्वारेच दोन साथीदार एकत्र येऊ शकतात. सापांना आपण कट्टर जातीयवादी म्हणू शकतो. त्यांच्यात ‘खाप पंचायत’ नसूनही ते दुसऱ्या जातीच्या सापाशी जोडी जुळवत नाहीत. मिलनाच्या काळात एकदा आपला जोडीदार निवडल्यावर नर-मादी दोघेही भरपूर प्रणयलीला किंवा प्रणयचेष्टा करतात. नर मादीच्या सतत जवळ जवळ सरपटत राहतो जेणेकरून तिच्या सर्वागाला त्याचा स्पर्श होत राहील. मधेच तिला अडवून डोक्याने ढोसतो, डिवचल्यासारखे करतो आणि जिभेने डोक्यापासून शेपटीच्या टोकापर्यंत स्पर्श करत राहतो. याच्या जोडीला तिच्या अंगावरून शेपटीकडे सरपटत राहतो. याच काळात दुसरा प्रणयोत्सुक नर मध्ये आला तर दोन नरांमध्ये मादीवरून भांडणे होतात. पूर्वी ज्याला सापाची शृंगारनृत्ये समजली जायची ती दोन नरांची मारामारी असायची. एकमेकांना वेढे घालून आवळणे, पिरगाळणे, हूल देण्याच्या जोडीला शेपटीकडच्या मणक्यांच्या साहाय्याने उभे राहून मात करण्याचा प्रयत्न देखील हे नर करतात. या लढाया तासन्तास चालतात. गंमत म्हणजे मादीला याच्याशी अजिबात देणं घेणं नसतं. जो नर जिंकतो त्याबरोबर ती समागमासाठी तयार होते. पुन्हा एकदा प्रणयचेष्टांना ऊत आल्यावर नर आणि मादी प्रत्यक्ष समागमाला तयार होतात. दोन्ही साप एकमेकांच्या विरुद्ध तोंडे करून पडून राहातात. यानंतर नर आपल्या शेपटीचे मादीला विळखे घालून स्वत:जवळ ओढून घेतो. या क्रियेने दोघांची गुदद्वारे एकमेकांजवळ येतात. नर सापाला निसर्गाने अर्ध शिश्नांची जोडी दिलेली असते. नराच्या गुदद्वाराच्या किंचित मागे शेपटीच्या टोकाजवळ डाव्या व उजव्या बाजूला पोकळ नळीसारखे एक एक अर्धशिश्न असते. समागमाच्या वेळेस यालाच जोडलेल्या एका स्नायूच्या साहाय्याने ही शिश्ने बाहेर येऊन त्यांची आतली बाजू उकलली जाते. अशा वेळेस या अवयवाला जास्तीचा रक्तपुरवठा होऊन ती ताठरतात.

सापाला हात व पाय नसल्याने समागमाच्या वेळेस आपल्या साथीदाराला धरण्यासाठी नर सापांच्या या जोडी शिश्नाची सोय निसर्गाने केलेली असते. समागमाच्या अत्युत्कट क्षणांमध्ये या दोन्ही अर्धशिश्नांचा वापर होत नाही. मादी नराच्या ज्या बाजूला असेल त्या बाजूचे अर्धशिश्न मादीच्या इंद्रियात सारले जाते. या आत शिरलेल्या इंद्रियाला मादीच्या इंद्रियात रोवता यावे म्हणून पुढील भाग थोडासा काटेरी व चाशकांचा (त्वचेवरचे पांढरे ठिपके) बनवलेला असतो. एकदा का हे अर्धशिश्न मादीच्या इंद्रियात शिरले की त्या अवस्थेत दोन्ही साप काही मिनिटांपासून ते कित्येक तासांपर्यंत अगदी निपचित पडून राहातात. समागम पूर्ण झाला की एकमेकांपासून वेगळं होण्याची क्रिया सुरू होते. यात बरेचदा मादीच नराला दूपर्यंत फरफटत नेते. यानंतर नर-मादी वेगवेगळे झाल्यावर नर सापाला आपल्या पूर्वपदावर येण्यास काही काळ लागतो. बाहेर आलेली अर्धशिश्नांची ही जोडी आत जाईपर्यंत नर अवघडलेला असतो. यानंतर मादी गर्भार राहण्याची क्रिया सुरू होते. साप अंडज म्हणजे अंडी जन्माला घालणारे असतील तर समागमानंतर अंदाजे चार ते आठ आठवडय़ांनी मादी अंडी घालते. साप ‘जारज’ म्हणजेच पिल्लांना जन्म देणारे असतील तर साधारण १५ ते २४ आठवडय़ांनी पिल्ले जन्माला येतात. अंडज तसंच जारज दोन्ही बाबतीत, मादी साप पिल्लांना वा अंडय़ांना वाऱ्यावर सोडून निघून जाते.

सापाचे जीवनचक्र हे असे आहे. पण आपल्या कोणत्याही अज्ञानाचा गरफायदा कसा घेतला जातो याचं साप हे मूíतमंत उदाहरण आहे. या प्राण्याभोवती एवढे अज्ञानाचे व गरसमजाचे वेटोळे आहेत की बास रे बास. स्वत:च्या या अर्धशिश्नाच्या जोडीमुळे नर सापाला स्वत:चा जीव गमवावा लागतो, यातूनच, या शिश्नांमुळे मादीला दुप्पट सुख मिळते व हे शिश्न जो खाईल तो आपल्या मादीला दुप्पट शरीरसुख देऊ शकतो हा गरसमज निर्माण झाला आहे. जडीबुटी झाडपाला करणारे भोंदू वैदू यातून स्वत:ची तुंबडी भरून घेतात. समागमानंतर नर सापाची ताठरलेली अर्धशिश्ने पूर्वपदावर येण्यास लागणारा वेळ कधी कधी जास्त असतो. अशा वेळेस तो लोकांच्या नजरेस पडला तर असा अवघडलेला साप अफवेचा नि कुतूहलाचा बळी ठरतो. लोक अशा सापाला पाहण्यासाठी गर्दी करतात नि शेवटी मारून टाकतात.

आजमितीलाही आपलं स्वत:च्या शरीराबद्दलचं ज्ञान खूप अद्ययावत नसतंच. शाळेत असताना शिकलेल्या धमनिका नि जवनिका या शुद्ध रक्त वाहून नेतात की अशुद्ध हे अजूनही आपण ठामपणे सांगू शकत नाही, तर सापाच्या शरीराबद्दल आपण काय बोलणार? वास्तविक आपण सगळे जाणिवा प्रगत झालेले जीव आहोत. पण निसर्ग साखळीतल्या अतिशय उपयोगी असलेल्या या शांत, लाजऱ्या जीवाकडे पाहताना आपल्या या प्रगत जाणिवा जणू बोथट होतात. एकविसाव्या आणि विज्ञानाच्या शतकात, चंद्रावर जाण्याच्या गप्पा मारताना, कुणाचे जगण्याचे अधिकार आपण कळत नकळत हिरावून घेत नाही ना हे पाहाणं गरजेचं आहे. भारतीय वन्यजीव कायद्याने सापाला संरक्षित केले असून, साप जवळ बाळगणे, मारणे, पकडणे अथवा त्याद्वारे मनोरंजन करणे हा गुन्हा आहे. आपण आजपर्यंत शतकानुशतकं भावनिक नागपंचमी साजरी करतच आलो आहोत, आता वैज्ञानिक नागपंचमी साजरी करू या. ‘आसमंतातून’ नागपंचमीच्या मनस्वी शुभेच्छा मित्रांनो…
रुपाली पारखे-देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2016 1:02 am

Web Title: scientific nag panchami
Next Stories
1 उंबर आणि सुगरण
2 बाहेरचे आणि आतले…
3 जांब आणि मुंग्या..
Just Now!
X