भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. यंदा ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे सण साजरे केले जाणार आहेत. मात्र, यावर्षी ही पौर्णिमा दोन दिवसांची असल्याने रक्षाबंधनाच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. काही तज्ज्ञ ११ ऑगस्टला तर काही १२ ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करावा असे सांगत आहेत. तथापि, १२ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करणे खूप शुभ ठरेल, असे बहुतांश तज्ज्ञांचे मत आहे.

या वर्षी श्रावण महिन्याची पौर्णिमा ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांनी सुरू होत आहे. या वेळेत भद्राही होत असून ते रात्री ८ वाजून ५३ मिनिटांनी संपेल. शास्त्रानुसार भद्रकालमध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणे अशुभ मानले जाते. ११ ऑगस्ट रोजी, प्रदोष काळात, संध्याकाळी ५ वाजून १८ मिनिटे ते ६ वाजून १८ मिनिटांच्या दरम्यान राखी बांधता येईल.

Monthly Horoscope August 2022 : ऑगस्ट महिन्यात घडणार महत्त्वपूर्ण घडामोडी; जाणून घ्या तुमचे मासिक राशीभविष्य

यानंतर, भद्राच्या शेवटी, रात्री ८ वाजून ५४ मिनिटे ते ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत राखी बांधता येते. परंतु हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर राखी बांधण्यास मनाई आहे. याच कारणामुळे १२ ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ मानले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार राखी बांधताना भावाचे तोंड पूर्व दिशेला आणि बहिणीचे तोंड पश्चिम दिशेला असावे. सर्वप्रथम बहिणी आपल्या भावाला कुंकू आणि तांदूळ यांचा टीका लावावा. तुपाच्या दिव्याने भावाला ओवाळावे. त्यानंतर त्याला मिठाई भरवून भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)