Monthly Horoscope For November 2026 : नोव्हेंबर महिन्याची सुरुवात दिवाळीच्या उत्साहात होणार असून, या महिन्यात अनेक ग्रहांच्या स्थितीत महत्त्वाचे बदल घडणार आहेत. गुरुचे सिंह राशीतील स्थान आणि २५ नोव्हेंबरला होणारे राहू-केतूचे राशी परिवर्तन याचा परिणाम सर्व १२ राशींवर होताना पाहायला मिळू शकतो. काही राशींना आर्थिक लाभ, नोकरी-व्यवसायात प्रगती आणि विवाहाचे योग सुद्धा जुळून येताना दिसतील. तर काही राशींना आरोग्य, आर्थिक व्यवहार आणि नातेसंबंधांच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. तर मेष ते मीन या १२ राशींसाठी नोव्हेंबर महिना कसा असेल आणि कोणत्या राशींच्या नशिबात काय असेल? याबद्दल आपण सोनल चितळेंकडून जाणून घेऊया.
मेष
गुरूचा सिंह राशीतील प्रवेश आपणास लाभकारक ठरेल. दिवाळी उत्साह वाढवणारी असेल. अनपेक्षित खर्च समोर उभे ठाकतील. आर्थिक नियोजन इथे कामी येईल. विद्यार्थिवर्गाला त्याच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. उत्तम मार्गदर्शन मिळाल्याने अभ्यासाला आणि मेहनतीला उचित दिशा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना सद्य:स्थितीची वाजवी कल्पना द्याल. गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीचा भरघोस परतावा मिळेल. अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक लाभकारक ठरेल. २५ नोव्हेंबरला राहू वक्र गतीने मकर राशीत आणि केतू कर्क राशीत प्रवेश करतील. जमिनीचे व्यवहार लांबणीवर पडतील. मध्यस्थी व्यक्तीवर अवलंबून राहू नका. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींचीही दखल घ्या.
वृषभ
दिवाळीच्या सणाने तेजाळलेल्या या महिन्यात अनेक उलाढाली होतील. प्रगतिकारक पावले उचलली जातील. विद्यार्थी वर्गाला अनपेक्षित यश मिळाले तरी हुरळून जाऊ नका. मेहनतीला पर्याय नाही. नोकरीच्या निमित्ताने प्रवास योग येईल. नव्या क्षेत्रात पदार्पण कराल, विवाह जुळेल. नवे नाते खुलवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल आणि गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळेल.घराचे कागदपत्रं कायदेशीररीत्या पडताळून घ्याल. फसगत टळेल, सतर्क राहावे आणि गुरुबल कमजोर होईल. आरोग्याच्या तक्रारी डोकं वर काढतील. व्यायाम, आहार आणि विश्रांती यांचा समतोल साधला तरच आरोग्यात सुधारणा होईल. नातेवाईक, शेजारी आणि दोस्त मंडळींची खूप मदत होईल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे भाग्यातील मकर राशीत आणि तृतीयातील कर्क राशीत प्रवेश करतील. तर परदेशा संबंधित कामांना गती मिळेल.
मिथुन
गुरूचा सिंह राशीतील प्रवेश आपणासाठी लाभकारक असेल. दिवाळीच्या दिवसात जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. विद्यार्थ्यांना नवी प्रलोभने खुणावतील, पण अभ्यासावरील लक्ष विचलित होऊ देऊ नका. सराव करण्याचा खूप फायदा होईल. नोकरीतील बढतीसाठी परीक्षा द्याल. विवाहोत्सुक मंडळींचे विवाहयोग जुळून येतील. नातेसंबंध दृढ होण्यासाठी भेटीगाठी आणि संवाद होणे महत्त्वाचे आहे. जमीन जुमल्याच्या बाबतीत कोर्ट कचेरीची पायरी चढावी लागेल. निष्णात वकिलांचा सल्ला उपयोगी पडेल. २५ नोव्हेंबरला राहू वक्र गतीने अष्टमातील मकर राशीत प्रवेश करेल तर केतू द्वितीयातील कर्क राशीत प्रवेश करेल. प्रवासयोग येतील. परदेशासंबंधित कामांना गती मिळेल. खांदा आणि ओटीपोट यांच्या तक्रारी वाढतील.
कर्क
दिवाळीच्या उत्साहाने नटलेला हा महिना कौटुंबिक नातेसंबंध दृढ करणारा असेल. मेहनत, कष्ट, नियोजन व प्रवास यांनी हा महिना भरून जाईल. विद्यार्थीवर्गाने आपले स्वतःचे वेळापत्रक बनवून त्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नोकरीच्या ठिकाणीदेखील उच्च पदासाठीच्या परीक्षांचा अभ्यास अतिशय मेहनत घेऊन करावा लागणार आहे. विवाहोत्सुक मंडळींनी संशोधन कार्य चालू ठेवावे. नक्की यश मिळेल. कौटुंबिक समस्या चव्हाट्यावर आणू नका. जोडीदारासह बोलताना गैरसमज करून घेऊ नका. गुंतवणूकदारांनी थोडी विश्रांती घ्यावी. अनिश्चितता आणि जोखीम यांचा नीट विचार करावा. घरच्या व्यवहारात पक्का निर्णय घेणे कठीण जाईल. २५ नोव्हेंबरला राहू सप्तमातील मकर राशीत प्रवेश करेल; तर केतू आपल्या कर्क राशीत प्रवेश करील.
सिंह
गुरूचा सिंह राशीत प्रवेश झाल्याने सिंहस्थ सुरू झाले आहे. आपल्या राशीला गुरुबल आहे. सणवार, उत्सव, नातेवाईकांच्या भेटीसाठी यांत महिना भुर्रकन जाईल. महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी. विद्यार्थी वर्गाने परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी सज्ज राहावे. न समजलेले विषय वैयक्तिक पातळीवर समजावून घ्यावेत. नोकरी व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. दिवाळी लाभकारक ठरेल. विवाहित दाम्पत्यांची सुख स्वप्ने साकार होतील. मनाजोगती खरेदी कराल. गुंतवणूक दारांना धन लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. प्रॉपर्टीचे कामकाज तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आकार घेईल. कोर्टाच्या कामांना योग्य दिशा मिळेल. मित्र मंडळींची उत्तम साथ मिळेल. २५ नोव्हेंबराला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे मकर आणि कर्क राशीत प्रवेश करतील. उत्सर्जन संस्थेचे विकार त्रास देतील.
कन्या
दिवाळीच्या निमित्ताने मनपसंत खरेदी कराल. फसव्या ऑफर, सूट यांच्या नादी लागू नका. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावरून लक्ष ढळू देऊ नये. वेळात वेळ काढून कठीण विषय आत्मसात कराल. नोकरी व्यवसायत थोड्या थोडक्या गोष्टींवरून वाद होतील. प्रकरण विकोपाला नेऊ नका. गुरुबल कमजोर असल्याने डोक्याचे ताप वाढतील. विवाहित दाम्पत्यांमध्ये रुसवा फुगवा वाढेल. एकमेकांची समजून घालण्यातील समाधान अनुभवाल. गुंतवणूकदारांच्या पैशाचा म्हणावा तसा परतावा मिळणार नाही. थोडक्या अनुभवातून शहाणपण आले तरी पुष्कळ ! घर, जमीन यांचे निर्णय लांबणीवर पडतील. अचानक काहीतरी नव्या समस्या उद्भवतील. डोक्याचा ताप वाढेल. याचा आरोग्यावर परिणाम होईल. रक्तदाब, साखरेचे प्रमाण वरखाली होईल.
तूळ
लाभ स्थानातील सिंहस्थ गुरू आपल्यासाठी हितकारकच ठरेल. दिवाळीत विशेष धनलाभ होईल. विद्यार्थी वर्गाच्या कलागुणांना वाव मिळेल. अभ्यास आणि इतर छंद जोपासाल. व्यक्तिमत्त्वातील विशेष पैलूंचा विकास होईल. नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळाल्याने आनंदाला उधाण येईल. उत्साह वाढेल. आपले विचार प्रभावीपणे मांडाल. विवाह जुळण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत. मनपसंत जोडीदार मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक समारंभात आपल्या गुणांनी चमकाल. नातेवाईकांना आपल्या मौलिक सल्ल्याचा लाभ होईल. गुंतवणुकीतून भरघोस संपत्ती मिळेल. अभ्यासपूर्वक गुंतवणूक चांगला परतावा देईल. वाहन सुख, गृह सुख चांगले मिळेल. महत्त्वाची कागदपत्रे नीट सांभाळा. कोर्ट कचेरीची कामे मार्गस्थ होतील. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे मकर आणि कर्क राशीत प्रवेश करतील.
वृश्चिक
कष्टाचे चीज होऊन उत्साह वाढवणारा असा हा महिना असेल. सणावारांनी सजलेल्या या महिन्यात आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. परंतु, सगळ्याच भेटी आनंददायक नसतील. त्यामुळे जास्त त्रास करून घेऊ नका. विद्यार्थी वर्गाचे अभ्यासावरील लक्ष ढळेल. कला, साहित्य, क्रीडा, मनोरंजन या विश्वातून बाहेर पडणे कठीण जाईल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाची कामगिरी करू शकाल. वरिष्ठांचे पाठबळ कामी येईल. विवाहित दाम्पत्यांना उत्तम सहजीवन मिळेल. एकत्र प्रवास करण्याची संधी दवडू नका. कामानिमित्तही लहान-मोठे प्रवास कराल. गुंतवणूकदाराच्या खात्यातील पैसे वाढतील. गुंतवणुकीवरचा परतावा जबरदस्त मिळेल. इस्टेटीबाबतचे दस्तऐवज तज्ज्ञांकडून पडताळून घ्यावेत. जखम चिघळेल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने मकर आणि कर्क राशीत प्रवेश करतील.
धनु
दिवाळीच्या उत्साहात ग्रहांच्या अनुकूलतेची भर पडेल. गुरुबल चांगले आहे. विद्यार्थी वर्गाच्या कलागुणांना वाव मिळेल. अभ्यासेतर विषयात प्राविण्य मिळवाल. नोकरी व्यवसायात प्रगतिकारक घटना घडतील. आर्थिक धनलाभ होईल. विवाहोत्सुक मुलामुलींनी वधुवर संशोधन सुरू करावे. विवाहित मंडळींना जोडीदाराच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील. समजूतदारपणा दाखवाल. संतती सुखासाठी प्रयत्नशील राहाल. वैद्यकीय उपचार लाभकारक ठरतील. गुंतवणूकदारांना बक्कळ धनलाभ मिळेल. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीचा वरदहस्त लाभेल. लहानमोठे प्रवास कराल. घर, जमीन याबाबतच्या कागदपत्रांची कसून तपासणी करावी लागेल. माहितगार व्यक्तींची आणि त्यांच्या अनुभवाची मदत होईल. ऋतुबदलानुसार तब्येतीची कुरकुर वाढेल. डोळ्यांवर ताण येईल. वैद्यकीय उपचार घ्यावा लागेल. 25 नोव्हेंबरला राहू वक्र गतीने मकरेत तर केतू कर्केत प्रवेश करेल.
मकर
अष्टमातील सिंहस्थ गुरुचे गुरुबल कमजोर होईल. दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी होईल. विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासेतर कलागुणांना वाव मिळेल. अभ्यासावरील लक्ष विचलित होऊ देऊ नका. नोकरीच्या ठिकाणी आपल्या शब्दाला मान मिळेल. वरिष्ठांकडून कामाची पोचपावती मिळेल. विवाहित मंडळींनी योजलेल्या गोष्टी विनाकारण लांबणीवर पडतील. समजूतदारपणा दाखवाल. गुंतवणूकदारांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. आधी झालेल्या चुका परत करू नका. घर, जमीन, प्रॉपर्टी यांबाबत सध्या विचार नको. कामातील अडचणी सतर्कतेने दूर कराल. नातेवाइकांची मदत होईल. भेटीगाठी लाभकारक ठरतील. अति विचार आणि कामाच्या ताणामुळे डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागेल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे मकर राशीत व कर्क राशीत प्रवेश करतील.
कुंभ
गुरूचा सिंह राशीतील प्रवेश चांगले गुरुबल देईल. दिवाळीच्या निमित्ताने उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल. विद्यार्थी वर्गाच्या कलागुणांचे चीज होईल. अभ्यासासह इतर विषयातही प्राविण्य मिळवाल. हरहुन्नरी विद्यार्थी सामाजिक कार्यात विशेष रस घेतील. नोकरीच्या निमित्ताने प्रवास कराल. ओळखी वाढतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. अनुभवाची शिदोरी समृद्ध होत जाईल. विवाहोत्सुक मंडळींचे विवाह जुळतील. मनपसंत जोडीदाराची भेट होईल. विवाहित दाम्पत्यांना सुखी सहजीवनाचा लाभ होईल. कुटुंबात आपल्या शब्दांना किंमत असेल. समाजात मानसन्मान मिळेल. गुंतवणूक करताना उतावळेपणा नको. अभ्यासपूर्वक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलेली गुंतवणूक भरघोस संपत्ती देईल. 25 नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे मकर व कर्क राशीत प्रवेश करतील.
मीन
सिंहस्थ गुरुचे बल मध्यम असेल. साडेसातीचा सौम्य प्रभाव जाणवेल. विद्यार्थी वर्गाची मनस्थिती द्विधा होईल. अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक व्यवधाने सांभाळाल. सामाजिक उपक्रमात रस घ्याल. उच्च शिक्षणासाठी, परदेश गमनासाठी विशेष मेहनत घ्याल. नोकरी व्यवसायातील टप्पे टोणपे सहन करत पुढे जात रहाल. वरिष्ठांचे पाठबळ कामी येईल. विवाहित दांपत्यांनी विनाकारण वाद घालू नये. दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी नाती जपाल. गुंतवणूकदारांनी थोडी विश्रांती घ्यावी. शाश्वत मिळकत सुरू राहील असा पर्याय निवडाल. घर, बंगला, जमीन, शेती याबाबतच्या व्यवहाराची बोलणी होतील. कामानिमित्त थोडा फार प्रवास कराल. थंड, उष्ण हवामानाचा प्रकृतीवर परिणाम होईल. 25 नोव्हेंबरला राहू मकर राशीत आणि केतू कर्क राशीत प्रवेश करेल.
