Aries September Month Horoscope : राशीचक्रातील पहिली रास म्हणजे मेष. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा ग्रह भरपूर ऊर्जा देणारा असा तप्त ग्रह आहे. त्यामुळे तुमच्यात देखील खूप ऊर्जा आणि उत्साह असतो. तुमच्या वागण्या-बोलण्यातही तेवढाच उत्साह दिसतो. तुम्हाला संथपणाने कामे करणे, रेंगाळणे तुम्हाला अजिबात पटत नाही. इतरांनीही रेंगाळत कामे केलेली तुम्हाला बिलकूल आवडत नाही. मनातील गोष्टी स्पष्टपणे सांगून मोकळी होणारी तुमची रास तडजोड करायला सहसा तयार नसते.
नावीन्यपूर्ण गोष्टींकडे तुमचा कल असतो. त्यामुळे बऱ्याचदा तुम्ही आरंभशूर असता. कर्तृत्व, धडाडी आणि हिंमत हे मंगळाचे गुणधर्म तुमच्यात प्रामुख्याने आढळतात. धाडसी वृत्ती असल्याने नवनवीन आव्हाने स्वीकारणे आपणास आवडते, तुम्ही उत्तम नेतृत्व करता, हवे ते मिळवण्याची जिद्द तुमच्यात असते. तुमच्यासाठी कामातील सातत्य टिकवणे कधीकधी आव्हानात्मक ठरते, मात्र एकदा ध्येय निश्चित केले की, ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करता.
मंगळाचे गुणधर्म उत्साह, धाडसी स्वभाव आणि काहीतरी नवीन करण्याची जिद्द तुम्हाला नेहमी पुढे जाण्यास प्रेरित करत असतो. पण, किंबहुना त्याच त्याच रटाळवाण्या कामाचा, चाकोरीबद्ध जगण्याचा आपल्याला कंटाळा येतो. आपल्याला जे पाहिजे, ते मिळवण्यात आपणास धन्यता वाटते. तर तुमच्या राशीसाठी सप्टेंबर महिना करिअर, आर्थिक स्थिती, नातेसंबंध आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असणार याबद्दल ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेऊ.
सप्टेंबर महिना मेषसाठी कसा असणार?
सण, उत्सव यांनी नटलेला हा महिना सामाजिक बांधिलकी शिकवेल. ४ तारखेची कालाष्टमी उत्साह निर्माण करेल. गणेशोत्सवादरम्यान श्रद्धा आणि सबुरी पणास लागेल. विद्यार्थिवर्गाला नव्या क्षेत्रात अभ्यास करता येईल. परदेशी शिकण्याचा योग येईल. नोकरी-व्यवसायात हितशत्रूंचा डाव हाणून पाडाल. आपल्या व्यक्तिमत्त्वाची प्रभावी चुणूक दाखवाल. विवाहित मंडळींना कुटुंबासाठी वेळ देता येईल. गुंतवणूकदारांनी थोडी विश्रांती घेणे योग्य ठरेल. घर, जमीन, वडिलोपार्जित इस्टेट यांबाबत सकारात्मक बोलणी होतील. पोटाचे आरोग्य सांभाळा. दूषित पाण्याचा त्रास होईल. अनंत चतुर्दशीला विशेष बातमी समजेल.
तर असा असणार मेष राशीसाठी सप्टेंबर महिना…
