Abhishek Sharma Numerology: टीम इंडियाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या आपल्या तुफानी फलंदाजीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक एकदिवसीय सामन्यात त्याने अवघ्या ९१ चेंडूत २३३ धावांची अविश्वसनीय खेळी साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावरही त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. पण, अंकशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या मते, त्याच्या यशामागे आणखी एक रंजक कारण असू शकतं. ते नेमकं काय? जाणून घेऊया…

अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा जन्मांक किंवा मूलांक हा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर, निर्णयक्षमतेवर आणि आयुष्यातील संधींवर काही प्रमाणात प्रभाव टाकतो अशी मान्यता आहे, त्यामुळे अनेक जण यशस्वी व्यक्तींच्या जन्मांकाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. अभिषेक शर्माचं नावही अशाच चर्चांमध्ये घेतलं जात आहे.

अंकशास्त्रातील मान्यतेनुसार, एका विशिष्ट मूलांकाच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास, धाडस, मेहनत आणि नवनवीन गोष्टी करण्याची वृत्ती अधिक दिसून येते. अडचणींना न घाबरता पुढे जाण्याची मानसिकता आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची जिद्द ही या मूलांकाची वैशिष्ट्ये मानली जातात, त्यामुळे अशा व्यक्तींना आयुष्यात मोठं नाव आणि प्रसिद्धी मिळण्याची शक्यता असल्याचं अंकशास्त्र सांगतं.

या मूलांकाच्या व्यक्तींना सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागू शकतो. मात्र, एकदा योग्य संधी मिळाली की ते आपल्या मेहनतीच्या जोरावर वेगाने पुढे जातात अशी श्रद्धा आहे. त्यांच्या कामात सातत्य, वेगळा विचार आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असल्यामुळे अनेक क्षेत्रांत त्यांना यश मिळू शकतं, असं मानलं जातं.

अंकशास्त्रानुसार या मूलांकाच्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्याही प्रगती करू शकतात. मेहनतीच्या जोरावर संपत्ती मिळवण्याची क्षमता त्यांच्यात असते अशी मान्यता आहे. मात्र, काही वेळा खर्चावर नियंत्रण ठेवणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतं, असंही या पद्धतीत सांगितलं जातं.

दरम्यान, अभिषेक शर्माने नुकत्याच एका स्थानिक एकदिवसीय सामन्यात अमृतसर संघाकडून खेळताना अवघ्या ९१ चेंडूत २३३ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने १५ चौकार आणि २५ षटकार ठोकत गोलंदाजांवर अक्षरशः वर्चस्व गाजवलं. या खेळीनंतर त्याच्या पुनरागमनाच्या चर्चांना आणखी वेग आला आहे.

अखेर अभिषेक शर्माचा मूलांक कोणता?

अभिषेक शर्माचा जन्म ४ सप्टेंबर २००० रोजी झाला आहे. अंकशास्त्रानुसार महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ४ असतो, त्यामुळे अभिषेक शर्माचाही मूलांक ४ आहे. या मूलांकावर राहूचा प्रभाव असल्याचं अंकशास्त्रात मानलं जातं. राहू हा धाडस, सर्जनशीलता, मेहनत आणि वेगळा विचार यांच्याशी संबंधित ग्रह मानला जातो.

(टीप : ही माहिती अंकशास्त्रातील श्रद्धा आणि ज्योतिषीय शक्यतांवर आधारित आहे. याला वैज्ञानिक आधार नाही. व्यक्तीचं यश, करिअर आणि भविष्य हे त्याची मेहनत, कौशल्य, परिस्थिती आणि इतर अनेक घटकांवर अवलंबून असतं.)