Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार, तुमच्या काही सवयी तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांपासून आणि नातेवाईकांपासून दूर करू शकतात. या सवयींमुळे प्रत्येकजण तुमच्यापासून दूर जाऊ लागतो यामुळे गर्दीतही तुम्हाला एकटेपणा जाणवतो. जर तुम्हाला अशा सवयी असतील, तर तुम्ही त्या ताबडतोब सुधारल्या पाहिजेत. अन्यथा तुमची जवळची लोकही तुम्हाला गरज असेल तेव्हा सोबत नसतील.

१) स्वार्थी स्वभाव

चाणक्यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात स्पष्ट केले की, जे लोक स्वार्थापोटी नातेसंबंध जोडतात, त्यांना ते कधी ना कधी तोडावेच लागतात. नातेसंबंधांमधील स्वार्थामुळे प्रिय व्यक्तीदेखील दुरावू शकतात. म्हणून कोणत्याही नात्याचा पाया स्वार्थावर आधारित असता कामा नये.

२) संवादाचा अभाव

ज्या नात्यांमध्ये संवादाचा अभाव असतो, ती नाती तुटणे अटळ असते. आचार्य चाणक्य सांगतात, यशस्वी नात्यांसाठी इतरांचे ऐकणे आणि त्यांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही इतरांचे न ऐकता किंवा त्यांना न समजून घेता सतत स्वतःबद्दलच बोलत राहिलात, तर नाती तुटू शकतात.

३) राग

आचार्य चाणक्य रागाची तुलना अग्नीशी करतात, जो इतरांना जाळण्यापूर्वी तुम्हालाच जाळतो.रागामुळे नातेसंबंध बिघडतात.कोणतेही नातेसंबंध दृढ करण्यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. राग आला तरी तुमचे वर्तन असे नसावे की त्यामुळे तुमचे प्रियजन तुमच्यापासून दुरावतील.

४) अहंकार

जर तुमच्यावर अहंकार हावी झाला, तर लोक नेहमीच तुमच्यापासून दूर राहतील. चाणक्यांच्या मते, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे आणि सतत स्वतःची स्तुती करणे ही एक वाईट सवय आहे. ही सवय तुमच्या जवळच्या लोकांना दूर नेते. मात्र, जर तुम्ही जमिनीवर पाय ठेवून राहिलात, तर लोक आपोआप तुमच्या जवळ येतील.

५) विश्वासघातकी स्वभा

आचार्य चाणक्य सांगतात की, विश्वास हा काचेसारखा असतो; एकदा तो तुटला की नात्यात एक अशी भेग पडते जी कधीही भरून येत नाही. विश्वासघातकी व्यक्तीच्या जवळ कोणीही राहू इच्छित नाही आणि असे लोक अनेकदा गर्दीतही एकटे पडतात. म्हणून जर तुम्हाला तुमचे नातेसंबंध दृढ करायचे असतील, तर तुम्ही कधीही कोणाचा विश्वासघात करू नये.

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)