Adhik Maas Ekadashi 2026 : प्रत्येक महिन्यात एकादशी तिथी असतेच. पण, अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासात येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. असे म्हटले जाते की, जे भक्त अधिक मासातील एकादशीचे व्रत पाळतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अनेक जन्मांच्या पापांपासून त्यांची मुक्ती होते. या एकादशी दुर्मिळ आहेत कारण त्या दर तीन वर्षांनी एकदाच येतात. चला तर मग जाणून घेऊया की, २०२६ च्या अधिक मासात कोणत्या एकादशी येतात आणि त्यांच्या नेमक्या तारखा कोणत्या आहेत.
१. अधिक मासाची पहिली एकादशी म्हणजे पद्मिनी एकादशी, जी अधिक मासातील शुक्ल पक्षात येते. तिला कमला एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी २७ मे २०२६ रोजी साजरी होईल. पद्मिनी एकादशी २६ मे २०२६ रोजी सकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सुरू होईल आणि २७ मे २०२६ रोजी सकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी समाप्त होईल. या एकादशीची उपवास सोडण्याची वेळ २८ मे २०२६ रोजी सकाळी ५ वाजून २५ मिनिटे ते ७ वाजून ५६ मिनिटे या वेळेत असणार आहे.
२. अधिक मासातील दुसरी एकादशी परम एकादशी जी ११ जून २०२६ रोजी असणार आहे. परम एकादशी १० जून २०२६ रोजी रात्री १२ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होईल आणि ११ जून रोजी रात्री १० वाजून ३६ मिनिटांनी वाजता समाप्त होईल. या एकादशीची उपवास सोडण्याची वेळ १२ जून रोजी सकाळी ५ वाजून २३ मिनिटे ते ८ वाजून १० मिनिटे या वेळेत असणार आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, अधिक मासात एकादशीचे व्रत पाळल्याने प्रचंड पुण्य मिळते. कारण – या एकादशी दुर्मिळ असतात. असे मानले जाते की, हे एकादशीचे व्रत पाळल्याने केवळ पुण्य मिळत नाही, तर मोक्षप्राप्तीही होते.
