adhik maas sankashti chaturthi : हिंदू पंचांगामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. जेव्हा ही संकष्टी चतुर्थी अधिक मासात (पुरुषोत्तम मास) येते, तेव्हा तिला विभुवन संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. भगवान गणेशाची पूजा, उपवास आणि चंद्रदर्शनासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. असा विश्वास आहे की, या दिवशी योग्य विधींसह गणपती बाप्पाची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुख, समृद्धी व सुदैव प्राप्त होते. अधिक मासात येत असल्यामुळे, या संकष्टी चतुर्थीचे पुण्य अनेक पटींनी वाढते आणि भक्तांना विशेष आध्यात्मिक लाभ मिळतो. यावर्षी संकष्टी चतुर्थी दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत असल्याने, या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. चला, तर पूजेची तारीख आणि शुभ वेळ जाणून घेऊयात…

तारीख

पंचांगानुसार, अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ३ जून २०२६ रोजी रात्री ९ वाजून २२ मिनिटांनी सुरु होईल. ही चतुर्थी तिथी गुरुवारी ४ जून २०२६ रोजी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी संपणार आहे. उदय तिथी लक्षात घेता, विभुवन संकष्टी चतुर्थी ३ जून रोजी असणार आहे.

शुभ वेळ

यावर्षी, विभुवन संकष्टी चतुर्थीला सकाळी ५ वाजून २८ मिनिटांपासून ते ११ वाजून ४६ मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल. जर तुम्ही उपवास करणार असाल तर सकाळी ५ वाजून २३ मिनिटे ते ८ वाजून ५१ मिनिटे या वेळेत बाप्पांची पूजा करू शकतात.

चंद्रोदय वेळ

पंचांगानुसार ३ जून रोजी चंद्र रात्री १० वाजून ४ मिनिटांनी दिसेल. त्यामुळे उपवास ठेवणारे रात्री १० वाजून ४ मिनिटे ते १० वाजून ४३ मिनिटे या वेळेत चंद्राला पाणी अर्पण करून पूजा करू शकतात.

विभुवन संकष्टी चतुर्थीचे धार्मिक महत्त्व

धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी भक्तिभावाने उपवास करणे, गणेश मंत्रांचा जप करणे आणि रात्री चंद्राला पाणी अर्पण केल्याने सर्व प्रकारचे दुःख, अडथळे आणि नकारात्मक प्रभाव दूर होतात. अधिक मास हा स्वतः भगवान विष्णूला समर्पित मानला जातो, त्यामुळे या महिन्यात उपवास, दान आणि पूजेचे महत्त्व अधिकच वाढते. असे मानले जाते की, जे भक्त भक्तिभावाने आणि नियमितपणे हा उपवास करतात, त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि त्यांना सुख, शांती, कीर्ती आणि यश प्राप्त होते.