Angaraki Sankashti Chaturthi 2026 : भगवान गणेशाला समर्पित संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. मे २०२६ मध्ये येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थीमुळे याचे महत्त्व आणखी वाढते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील आव्हाने दूर होतात अशी मान्यता आहे. तर नक्की ५ की ६ मे ला अंगारकी संकष्टी चतुर्थी असणार, शुभ वेळ आणि चंद्रोदयाची वेळ काय असणार याबद्दल बातमीतून जाणून घेऊयात…

अंगारकी संकष्टी चतुर्थी कधी आहे?

पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी ५ मे २०२६ रोजी सकाळी ५ वाजून २४ मिनिटांनी सुरू होईल आणि ६ मे रोजी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी संपेल. सूर्योदय आणि चंद्रोदयाच्या आधारावर ५ मे रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाईल आणि तुम्ही यावेळी उपवास करू शकता. ही मे महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी देखील असणार आहे.

या वर्षी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येत आहे, जी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी केलेले उपवास आणि पूजा अनेक पटींनी अधिक फलदायी ठरतात आणि विशेषतः संकटे दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

दोन शुभ योगांची निर्मिती

या दिवशी शिवयोग आणि सिद्धयोग जुळून येणार आहेत. शिवयोग रात्री उशिरापर्यंत टिकेल आणि त्यानंतर सिद्धयोग सुरू होईल, जो सर्व प्रयत्न यशस्वी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर ज्येष्ठ आणि मूळ नक्षत्रांचा प्रभाव यादिवशी असणार आहे.

पूजा आणि उपवासासाठी शुभ वेळ

सकाळी ब्रह्म मुहूर्तावर (सकाळी ४:१२ ते ४:५५) स्नान करून उपवास करू शकतात. गणेश पूजेसाठी सर्वोत्तम वेळ सकाळी ८:५८ ते दुपारी १:५८ पर्यंत असणार आहे. या काळात लाभ आणि अमृत मुहूर्त (चंद्राच्या वेळा) देखील तयार होत असतात, जे पूजेसाठी शुभ मानले जातात. दुपारी अभिजीत मुहूर्त देखील उपलब्ध असेल.

चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करणे आणि चंद्राला अर्घ्य देणे खूप महत्त्वाचे मानले जाते. ५ मे रोजी चंद्र रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी चंद्र दिसेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३९ मिनिटांनी मावळेल. चंद्रदर्शनानंतरच उपवास पूर्ण झाल्याचे मानले जाते.

एकदंत संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

या दिवशी भगवान गणेशाच्या एकदंत रूपाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, उपवास केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, कुटुंबात सुख-शांती नांदते आणि करिअरमध्ये यश मिळते. या उपवासामुळे अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, असा विश्वास आहे.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)