Kumbh Rashibhavishya August 2026: कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. कुशाग्र बुद्धी, संशोधक वृत्ती, ज्ञानलालसा हे शनीचे गुण कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा आपल्यात असतो. आपल्या आकलनशक्तीला आणि पृथक्करण शक्तीला तोड नाही. स्मरणशक्ती देखील उल्लेखनीय असते. अशा शांत, सोशिक आणि बुद्धिजीवी कुंभ राशीला ऑगस्ट महिना कसा जाईल याचा आढावा घेऊया…

वर्षभरातील महत्वाच्या ग्रहांचे राशी बदल असे आहेत (Aquarius Horoscope August 2026)

यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल चतुर्थातील वृषभ राशीतून भ्रमण करेल. नेपच्यून आणि शनी द्वितीयातील मीन राशीतून भ्रमण करतील. कुंभ राशीला शनीच्या साडेसातीचा हा शेवटचा टप्पा आहे.

प्लूटो पूर्ण वर्ष मकरेतून भ्रमण करेल. गुरू पंचमातील मिथुनेतून भ्रमण करत आहे. गुरुबल उत्तम आहे. १ जूनला गुरू षष्ठातील कर्क राशीत प्रवेश करेल. गुरुबल थोडे कमजोर झाले तरी गुरू त्याच्या उच्च राशीतून भ्रमण करत असल्याने लाभकारक असेल. पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू सप्तमातील सिंह राशीत प्रवेश करेल. गुरुबल चांगले होईल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे मकर राशीत आणि कर्क राशीत प्रवेश करतील.

कुंभ राशीचे ऑगस्ट महिन्याचे राशिभविष्य (Aquarius August Horoscope)

या महिन्यात कामे अपेक्षित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कार्यपूर्तीचा आनंद मिळेल. विद्यार्थी वर्ग अभ्यासात विशेष प्रगती करेल. शिक्षक आणि मार्गदर्शकांकडून शाब्बासकी मिळवेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपला शब्द फिरवतील. कामाचा ताप आणि व्याप वाढेल. परदेशातील व्यवहार मार्गी लागतील. काही निर्णय स्वतःच्या हिमतीवर घ्याल.

विवाह योग सुरू आहेत. चांगल्या स्थळाला होकार द्याल. विवाहितांचे वैवाहिक जीवन अनुभवातून समृद्ध होईल. नातेसंबंध जपाल. गुंतवणूकीवर बक्कळ परतावा कमवाल. आपल्या अभ्यासपूर्वक कृतीचे हे फळ असेल. जमीन जुमल्याच्या व्यवहारात सरकारी अधिकारी मार्गदर्शन करतील. नारळी पौर्णिमेला मन विचलित होईल. काहीसा उत्साह कमी वाटला तरी नातेवाईकांच्या भेटीतून उभारी मिळेल. मानापमान बाजूला ठेवलात तर डोक्याचा ताप कमी होईल.

– ज्योतिषी सोनल चितळे