Kumbh November Rashibhavishya 2026: कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. कुशाग्र बुद्धी, संशोधक वृत्ती, ज्ञानलालसा हे शनीचे गुण कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा आपल्यात असतो. आपल्या आकलनशक्तीला आणि पृथक्करण शक्तीला तोड नाही. स्मरणशक्ती देखील उल्लेखनीय असते. अशा शांत, सोशिक आणि बुद्धिजीवी कुंभ राशीला नोव्हेंबर महिना जाईल याचा आढावा घेऊया…

वर्षभरातील महत्वाच्या ग्रहांचे राशी बदल असे आहेत (Aquarius November Horoscope)

यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल चतुर्थातील वृषभ राशीतून भ्रमण करेल. नेपच्यून आणि शनी द्वितीयातील मीन राशीतून भ्रमण करतील. कुंभ राशीला शनीच्या साडेसातीचा हा शेवटचा टप्पा आहे. प्लूटो पूर्ण वर्ष मकरेतून भ्रमण करेल.

गुरू पंचमातील मिथुनेतून भ्रमण करत आहे. गुरुबल उत्तम आहे. १ जूनला गुरू षष्ठातील कर्क राशीत प्रवेश करेल. गुरुबल थोडे कमजोर झाले तरी गुरू त्याच्या उच्च राशीतून भ्रमण करत असल्याने लाभकारक असेल. पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू सप्तमातील सिंह राशीत प्रवेश करेल. गुरुबल चांगले होईल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे मकर राशीत आणि कर्क राशीत प्रवेश करतील.

कुंभ राशीचे नोव्हेंबर महिन्याचे राशीभविष्य (Aquarius Horoscope November 2026)

गुरूचा सिंह राशीतील प्रवेश चांगले गुरुबल देईल. दिवाळीच्या निमित्ताने उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल. विद्यार्थी वर्गाच्या कलागुणांचे चीज होईल. अभ्यासासह इतर विषयातही प्राविण्य मिळवाल. हरहुन्नरी विद्यार्थी सामाजिक कार्यात विशेष रस घेतील. नोकरीच्या निमित्ताने प्रवास कराल. ओळखी वाढतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल.

अनुभवाची शिदोरी समृद्ध होत जाईल. विवाहोत्सुक मंडळींचे विवाह जुळतील. मनपसंत जोडीदाराची भेट होईल. विवाहित दाम्पत्यांना सुखी सहजीवनाचा लाभ होईल. कुटुंबात आपल्या शब्दांना किंमत असेल. समाजात मानसन्मान मिळेल. गुंतवणूक करताना उतावळेपणा नको. अभ्यासपूर्वक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलेली गुंतवणूक भरघोस संपत्ती देईल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे मकर व कर्क राशीत प्रवेश करतील.

– ज्योतिषी सोनल चितळे