Kumbh Rashibhavishya October 2026: कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. कुशाग्र बुद्धी, संशोधक वृत्ती, ज्ञानलालसा हे शनीचे गुण कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा आपल्यात असतो. आपल्या आकलनशक्तीला आणि पृथक्करण शक्तीला तोड नाही. स्मरणशक्ती देखील उल्लेखनीय असते. अशा शांत, सोशिक आणि बुद्धिजीवी कुंभ राशीला ऑक्टोबर महिना कसा जाईल याचा आढावा घेऊया…
वर्षभरातील महत्वाच्या ग्रहांचे राशी बदल असे आहेत (Aquarius Horoscope October 2026)
यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल चतुर्थातील वृषभ राशीतून भ्रमण करेल. नेपच्यून आणि शनी द्वितीयातील मीन राशीतून भ्रमण करतील. कुंभ राशीला शनीच्या साडेसातीचा हा शेवटचा टप्पा आहे.
प्लूटो पूर्ण वर्ष मकरेतून भ्रमण करेल. गुरू पंचमातील मिथुनेतून भ्रमण करत आहे. गुरुबल उत्तम आहे. १ जूनला गुरू षष्ठातील कर्क राशीत प्रवेश करेल. गुरुबल थोडे कमजोर झाले तरी गुरू त्याच्या उच्च राशीतून भ्रमण करत असल्याने लाभकारक असेल. पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू सप्तमातील सिंह राशीत प्रवेश करेल. गुरुबल चांगले होईल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे मकर राशीत आणि कर्क राशीत प्रवेश करतील.
कुंभ राशीचे ऑक्टोबर महिन्याचे राशिभविष्य (Aquarius October Horoscope)
पितृपक्षात गरजूंना मदतीचा हात पुढे कराल. सामाजिक बांधिलकी जपाल. विद्यार्थी वर्ग अनेक क्षेत्रात कार्यरत असतील. अभ्यासात देखील मन रमेल. परीक्षा, मुलाखती, प्रात्यक्षिके यात विशेष चमकाल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची पावले उचलाल. घटस्थापना आणि दसरा विशेषतः लाभकारक असतील. हितशत्रूंचे डाव हाणून पाडाल.
साडेसातीचा प्रभाव अगदी कमी असेल. गुरुचे चांगले पाठबळ मिळेल. गुंतवणूक लाभकारक ठरेल. अविचाराने कोणत्याही ठिकाणी आपण गुंतवणूक करणार नाहीत. विवाहोत्सुक मंडळींनी वधुवर संशोधन सुरू ठेवावे. कौटुंबिक गरजा भागवताना स्वतःकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.
जमिनीच्या कागदपत्रात असलेल्या त्रुटी, कमतरता भरून काढण्यासाठी सरकारी कार्यालयात खेपा घालाल. रक्ताभिसरण संस्थेच्या कार्यात बिघाड झाल्याने पेटके येणे, हातापायाला मुंग्या येणे असे त्रास उदभवतील. ३१ ऑक्टोबरला गुरू सिंह राशीत प्रवेश करेल.
– ज्योतिषी सोनल चितळे
