Kumbh Rashibhavishya September 2026: कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. कुशाग्र बुद्धी, संशोधक वृत्ती, ज्ञानलालसा हे शनीचे गुण कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा आपल्यात असतो. आपल्या आकलनशक्तीला आणि पृथक्करण शक्तीला तोड नाही. स्मरणशक्ती देखील उल्लेखनीय असते. अशा शांत, सोशिक आणि बुद्धिजीवी कुंभ राशीला सप्टेंबर महिना कसा जाईल याचा आढावा घेऊया…
वर्षभरातील महत्वाच्या ग्रहांचे राशी बदल असे आहेत (Aquarius Horoscope September 2026)
यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल चतुर्थातील वृषभ राशीतून भ्रमण करेल. नेपच्यून आणि शनी द्वितीयातील मीन राशीतून भ्रमण करतील. कुंभ राशीला शनीच्या साडेसातीचा हा शेवटचा टप्पा आहे.
प्लूटो पूर्ण वर्ष मकरेतून भ्रमण करेल. गुरू पंचमातील मिथुनेतून भ्रमण करत आहे. गुरुबल उत्तम आहे. १ जूनला गुरू षष्ठातील कर्क राशीत प्रवेश करेल. गुरुबल थोडे कमजोर झाले तरी गुरू त्याच्या उच्च राशीतून भ्रमण करत असल्याने लाभकारक असेल. पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू सप्तमातील सिंह राशीत प्रवेश करेल. गुरुबल चांगले होईल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे मकर राशीत आणि कर्क राशीत प्रवेश करतील.
कुंभ राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशिभविष्य (Aquarius September Horoscope)
कृष्ण जन्माष्टमीच्या सुमारास मानसिक स्थिती दोलायमान असेल. गणेशोत्सवात पुन्हा नवा उत्साह वाटेल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासाची ओढ वाटेल. विषयांचे आकलन चांगले होईल. शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल. नोकरी व्यवसायात मेहनत आणि चिकाटीचे फळ मिळेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. विवाहोत्सुकांचा विवाह योग जुळून येईल.
थोडी तडजोड केलीत तर सुयोग्य जोडीदारासह नाते जुळेल. विवाहितांच्या सहजीवनाची गाडी रुळावर येईल. वैचारिक मतभेद दूरच ठेवावेत. गुंतवणूकदारांचे भाग्य फळफळेल. पैशाने पैसा वाढेल. बक्कळ धनसंपत्ती कमवाल. घराचे आणि जमिनीचे व्यवहार करताना काही अडचणी येतील. तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रश्नांची उकल सापडेल. छाती भरून येणे, अपचन होणे असे त्रास दुर्लक्षित करू नका.
– ज्योतिषी सोनल चितळे
