May 2026 Aries Horoscope : मेष ही मंगळाची रास आहे. कर्तृत्व, धडाडी, हिंमत हे मंगळाचे गुणधर्म मेष राशीच्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने आढळतात. हे लोक नेतृत्व उत्तम करतात. हवे ते मिळवण्याची जिद्द मनात ठेवतात. काही वेळा आरंभशूरपणा या लोकांमध्ये दिसून येतो. कामातील सातत्य टिकणे कठीण असले तरी ध्येयाने पछाडलेल्या मेष राशीच्या व्यक्ती आयुष्यात काही तरी अनोखं करताना दिसतात.

नवनवीन आव्हाने स्वीकारणे आपणास आवडते. किंबहुना त्याच त्याच रटाळवाण्या कामाचा, चाकोरीबद्ध जगण्याचा आपल्याला कंटाळा येतो. कामे रेंगाळत करण्यापेक्षा झटपट उरकणे त्यांना आवडते. मनात असेल ते स्पष्टपणे बोलणे त्यांना सहज जमते. मनाविरुद्ध तडजोड करताना मात्र त्यांना फारच त्रास होतो. अशा या मेष राशीला येणारा मे महिना कसा जाणार याबद्दल आपण सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेणार आहोत…

१ मेच्या बुद्ध पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे कामाला नवी दिशा देऊन जाणार आहे. उत्साहवर्धक वातावरणात योग्य निर्णय घेण्यास मदत मिळणार आहे. शनैश्वर जयंतीनिमित्त केलेली उपासना साडेसातीदरम्यान विशेष लाभकारक ठरणार आहे. रवी-मंगळाची ऊर्जा आत्मविश्वास वाढवेल. गुरूचे पाठबळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल.

उच्च शिक्षणासंबंधीत योग्य दिशा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी स्वतःमधील क्षमता जगाला दाखवून द्याल. विवाह जुळण्यासाठी प्रयत्न करीत राहा. यश मिळेल, मित्रमंडळींकडून मदतीचा हात पुढे येईल. बुद्धिमत्तेला व्यावहारिकतेची जोड मिळेल. जागेची कामे पुढे सरकतील. गुंतवणूकदारांना विशेष लाभ मिळेल. अभ्यासपूर्वक गुंतवणूक कराल. डोकेदुखीचा त्रास संभवतो, पण वेळीच काळजी घ्या.