aries to pisces march horoscope in marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. येत्या मार्च महिन्यात सुद्धा काही महत्त्वपूर्ण ग्रह गोचर करून भ्रमण करणार आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार, हा महिना खूप खास मानला जातो. कारण – मार्च महिन्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. त्याचबरोबर हा महिना फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीपासून सुरु होऊन चैत्र महिन्याच्या त्रयोदशी तिथीला संपतो आहे. या महिन्यात होळी, चंद्रग्रहण, चैत्र नवरात्र, रंगपंचमी, शीतला अष्टमी आणि कामदा एकादशी सारख्या सणांचा समावेश आहे. हा येणारा मार्च महिना तुमच्या राशीसाठी कसा असणार आहे हे पाहूया. प्रसिद्ध ज्योतिषतशास्त्र अभ्यासक सोनल चितळे यांच्या माहितीनुसार मार्च महिन्यातील १२ राशींचे भविष्य खालीलप्रमाणे…
मेष
२ मार्चला येणारी होळी आळस झटकून नवी प्रेरणा देईल. रंगपंचमी नव्या विचारांचे घेऊन येईल. गुढीपाडव्याला नव्या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवाल आणि रामनवमीच्या सुमारास यशाच्या दिशेने वाटचाल कराल. विद्यार्थ्यांना नावीन्याची ओढ वाटेल. परीक्षेच्या दृष्टीने केलेली मेहनत फळास येईल. नोकरी किंवा व्यवसायात मांडलेले आराखडे योग्य ठरतील. उत्तम निर्णय घ्याल. सर्वांच्या हिताचा विचार कराल. जोडीदाराची निवड सुयोग्य ठरेल. घराच्या व्यवहारात चौकशी केल्याशिवाय घाईने निर्णय घेऊ नका. प्रवास लाभकारक आणि सुखकर होईल. विचारांना सकारात्मक दिशा मिळेल. गुरुबल चांगले आहे. साडेसातीची तीव्रता जाणवणार नाही. ऋतुबदलानुसार त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागेल.
वृषभ
२ मार्चची होळी विविध रंगांची उधळण करणारी असेल. १९ मार्चला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अपेक्षित लाभ होईल. अर्थात जे आधी पेरले होते ते उगवले आहे हे ध्यानात असावे. विद्यार्थ्यांना आता अभ्यासात गढून जाण्याशिवाय तरणोपाय नाही. नोकरीत प्रगती कराल. आर्थिक उन्नती अपेक्षित आहे. अनुभवी वरिष्ठांचे मार्गदर्शन कामी येईल. विवाहोत्सुक मंडळींना वधुवर संशोधनाचा लाभ होईल. गुंतवणूक करताना पैशाची योग्य प्रकारे विभागणी कराल. याचा भविष्यात खूप फायदा होईल. जमिनीच्या व्यवहारात लहान मोठ्या गोष्टी नजर चुकीने निसटून जातील. सतर्क राहणे आवश्यक. डोकेदुखी आणि त्वचेची ऍलर्जी याची काळजी घ्यावी.
मिथुन
या महिन्यातील होळी आणि रंगपंचमी आपल्याला उत्साह देणारी असेल. गुढीपाडव्याला नव्या संकल्पांनी मुहूर्तमेढ रोवाल. बुध, शुक्राची विशेष साथ लाभेल. कलात्मक दृष्टीने आणि व्यावहारिक दृष्टीने मोठी मजल माराल. विद्यार्थ्यांना एकंदरीत ग्रहमान लाभकारक आहे. परीक्षेच्या दिवसात अभ्यासाचा ताण घेऊ नका. वर्षभराच्या मेहनतीचा कस लागणार आहे हे ध्यानात ठेवावे. नोकरी व्यवसायात नव्या संकल्पना अमलात आणाल. वरिष्ठांच्या पाठबळाने कामाला वेग येईल. विवाहोत्सुकांना सुयोग्य जोडीदार मिळेल. बुद्धी आणि व्यवहार चातुर्य यांचा सुंदर मिलाप दिसेल. गुंतवणुकीबाबतचे आपले आराखडे खरे ठरतील. लाभाचा आलेख वरवर चढेल. देश विदेशात कामानिमित्त प्रवास कराल. जाल तिथे आपल्या कामाची छाप पाडाल. आरोग्यपूर्ण, उत्साहवर्धक असा हा महिना असेल.
कर्क
२ मार्चला येणारी होळी आनंद आणि उत्साह घेऊन येणार आहे. १९ मार्चला येणारा गुढीपाडवा भाग्यकारक बातमी देईल. एकंदरीत गुरुबल कमी असले तरी इतर ग्रहांची साथ मिळेल. विद्यार्थिवर्गाची आता खरी कसोटी आहे. सातत्य आणि मेहनतीचे योग्य गणित साधलेत, तर मोठी मजल गाठाल. नोकरी-व्यवसायात आपली चुणूक दाखवण्याची सुवर्णसंधी मिळेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. विवाहोत्सुक मंडळींनी थोडा धीर धरावा. विवाहितांना प्रवास योग येतील. एकमेकांची उणीधुणी काढण्यापेक्षा दोघांमधील चांगले गुण पाहिलेत, तर सहजीवन आनंदी होईल. गुंतवणूक करताना सावधानी बाळगलीत, तर नुकसान टळेल. अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक तुम्हाला मालामाल करील. जमिनीचा व्यवहार लाभदायक ठरेल. विश्वासू माणसांकडून काम पुढे सरकेल. ऋतुबदलानुसार त्वचेच्या तक्रारी वाढतील.
सिंह
२ मार्चला येणारी होळी विविध रंग घेऊन येईल. कधी अतिउत्साह वाटेल तर कधी थोडी मरगळ वाटेल. विद्यार्थी वर्गाला आता जोमाने परीक्षेची तयारी करायला लागेल. उच्च शिक्षणासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. ध्येय नक्की गाढाल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे मोठी मजल माराल. दूरदृष्टीने भविष्याचा विचार कराल. गुढीपाडव्याच्या नंतर लाभकारक घटना घडतील. विवाहोत्सुक मुला मुलींचे विवाह जुळतील. गुरुबल चांगले आहे. संतान प्राप्तीसाठी विवाहितांनी प्रयत्न करावे. वैद्यकीय मदत उपयोगी पडेल. गुंतवणूकदारांना अर्थ नियोजनाचा आकर्षक लाभ उपभोगता येईल. घर आणि जमिनीचे व्यवहार करताना ओळखीच्या मध्यस्थीची मदत होईल. परदेशगमन योग आहे. परदेशाबाबतची कामे आकार घेतील. कागदपत्रे तयार होतील. कामाच्या ताणामुळे पोटऱ्या आणि तळपाय दुखतील.
कन्या
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा एकदा नव्या योजना राबवण्याचा विचार कराल. मित्र मंडळी मदतीचा हात पुढे करतील. विद्यार्थी वर्गाने आता फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. एकावेळी अनेक गोष्टींमध्ये सहभाग न घेता एकेक गोष्ट व्यवस्थित पार पाडत जावे. नोकरी व्यवसायात आपल्या वेगाने सगळेच धावतील अशी अपेक्षा करू नका. आर्थिक उन्नती होईल. गुंतवणूकीतून पैशाने पैसा वाढेल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा उत्तम उपयोग होईल. विवाहितांचे सूर जुळतील. घराबाबतचे निर्णय घ्याल. वडिलोपार्जित जमीन जुमला वकिली कारवाई करून सोडवावा लागेल. महत्वाच्या कागदपत्रांची कामे मार्गी लागण्यासाठी खूप मेहनत घ्याल. पचन, उत्सर्जन याबाबतचे प्रश्न लपवू नका. योग्य वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक आहे.
तूळ
होळी आणि रंगपंचमी उत्साह वाढवणारी असेल. नवे विचार, संकल्पना यांवर इतरांसोबत चर्चा कराल. समविचारी मंडळींमध्ये आपण अतिशय रममाण व्हाल. विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासावर प्रसार माध्यमांचा परिणाम दिसून येईल. अभ्यासावरील लक्ष ढळू देऊ नका. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने आवश्य असे दौरे काढाल. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवा प्रकल्प उभाराल. विवाहोत्सुक मुलामुलींनी जीवनसाथी शोधावा. विवाह योग सुरू आहे. विवाहित मंडळी आपल्या जोडीदाराच्या गुणांची कदर करतील. एकमेकांप्रती प्रेम आणि आदर वाढेल. संतती प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहावे. गुंतवणूकदारांना अपेक्षित परतावा मिळणार नाही. सुरक्षित गुंतवणूक केल्यास समतोल साधाल. वडिलोपार्जित जमिनीचे व्यवहार फार काळ रेंगाळतील. लहानश्या गोष्टीसाठी कामे अडकतील. तज्ज्ञांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. ओटीपोटाचे दुखणे वाढेल. पावले दुखतील.
वृश्चिक
होळी या राशीच्या व्यक्तींसाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हाल. विद्यार्थी वर्गाला नवनवीन क्षेत्रं खुणावतील. नोकरी-व्यवसायात मनाजोगते काम करण्याचा आनंद मिळेल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. अडचणी, समस्या पार होतील; पण यात अधिक ऊर्जा खर्ची पडेल. विवाहित मंडळींना कौटुंबिक समारंभात सहभागी होता येईल. गरजूंना मदतीचा हात पुढे करणे आपणास मनापासून आवडते. गुंतवणूकदारांच्या कष्टाचे चीज होईल. धनप्राप्तीचे योग आहेत. घरदार, जमिनीबाबतचे करार होतील. गुढीपाडव्याला महत्त्वाची कामगिरी फत्ते होईल. परदेशातील प्रवास, परदेशासंबंधित कागदपत्रे यांची कामे मार्गी लागतील.
धनु
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने नवा उत्साह निर्माण होईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. विद्यार्थीवर्गाला स्वतःच्या क्षमतेची मर्यादा समजेल. त्यानुसार अधिक मेहनत घ्याल. उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी किंवा परदेशी जाण्याचे योग येतील. मनाजोगता अभ्यासक्रम शिकता येईल. नोकरी व्यवसायात कार्यप्रणालीमध्ये काही बदल होतील. या बदलांचा स्वीकार करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. विवाहोत्सुक मुलामुलींच्या विवाहाच्या चर्चांना जोर येईल. मित्रमंडळी पुढाकार घेतील. विवाहित दाम्पत्यांच्या प्रश्नांना उत्तरे सापडतील. नातेवाईकांची मदत होईल. संतान प्राप्तीच्या प्रयत्नांना यश मिळेल. गुंतवणूकीचा उत्तम परतावा मिळेल. शाश्वत गुंतवणूक, दीर्घकालीन गुंतवणूक विशेष लाभदायक ठरेल.
मकर
होळीचा उत्साह मित्रांच्या भेटींमुळे द्विगुणीत होईल. गुढीपाडव्याला नव्या संकल्पना अमलात आणाल. विद्यार्थ्यांना आता थकून चालणार नाही. जोमाने अभ्यास कराल. तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिके, मुलाखती यांत आपली विशेष छाप पाडाल. नातेवाईक आणि मित्रांना मदतीचा हात पुढे कराल. नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने कल्पकतेला वाव मिळेल. शिस्तप्रिय आयुष्यात कलेलाही महत्त्व आहे याची जाण होईल. विवाहित मंडळींनी आपल्या जोडीदाराच्या विचारांना मान द्यावा. आपली मते त्याच्यावर लादू नका. दोघांना एकमेकांचा सहवास आनंददायी वाटेल. गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यामुळे आर्थिकदृष्ट्या सबळ व्हाल. आहार, व्यायाम, विश्रांती या त्रिसूत्रीच्या अवलंबाने प्रकृती स्वस्थ राहील. मध्यम गुरुबलाचा लाभ चांगला मिळेल.
कुंभ
होळी आणि रंगपंचमी मिश्र रंगांची असेल. आनंदासोबत ताण असेल तर अडचणीसह मार्गही दिसेल. विद्यार्थी वर्गाला हिमतीने पुढे जायचे आहे. खचून चालणार नाही. अभ्यास, सातत्य आणि चिकाटी यांचे चांगले फळ मिळेल. नोकरी व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. परदेशगमनाचा योग आहे. गुढीपाडवा नवी उमेद आणि आत्मविश्वास जागरूक करेल. विवाहोत्सुकांचे विवाह जुळतील. सुयोग्य स्थळाकडून होकार येईल. नाते फुलेल. विवाहित दाम्पत्यांच्या जबाबदाऱ्या वाढतील. संतती प्राप्तीच्या प्रयत्नांना यश मिळेल. कौटुंबिक अडचणींना तोंड देत आगेकूच करत रहाल. मित्र परिवार हाकेसरशी धावून येईल. गुंतवणूकदारांना उत्तम गुरुबलाचा लाभ मिळेल. भरघोस परतावा मिळेल. जागेचे व्यवहार फायदेशीर होतील. ओळखीतून झालेल्या व्यवहारात लाभ होईल. वाहन सुख मिळेल.
मीन
होळी आणि रंगपंचमी नवा उत्साह, नवी आशा घेऊन येतील. अनेक गोष्टीत मनापासून सहभागी व्हाल. सामाजिक जीवन अत्यंत उत्तम असेल. विद्यार्थी वर्ग अभ्यासात तर लक्ष घालेलच पण इतर कलात्मक बाबी आत्मसात करेल. यश मिळवेल. नोकरी व्यवसायात गुढीपाडवा एक वेगळे आव्हान घेऊन येईल. प्रॉपर्टीची कागदपत्रं तज्ज्ञांकडून पडताळून घ्यावीत. विवाहितांना कौटुंबिक बाबींकडे लक्ष देणे कठीण जाईल. वेळापत्रक शिस्तबद्ध ठेवले तरच ठरवलेली कामे पूर्ण होतील अन्यथा सगळे व्यवहार फक्त कागदावरच राहतील. गुंतवणूकदारांना अपेक्षित परतावा मिळणे कठीण असेल. मोठी जोखीम पत्करू नका. कामानिमित्त आणि फिरण्यासाठी परदेशी प्रवास कराल. कमजोर गुरुबल आणि साडेसाती यामुळे काही गोष्टींवर प्रतिबंध येतील. पित्त आणि वातविकार सतावतील.
