Angarak Yog 2026 Impact on Zodiac Signs: सकाळी किरकोळ वादाने दिवसाची सुरुवात होते आणि संध्याकाळपर्यंत कामांमध्ये अडथळेच अडथळे येतात, तेव्हा नेमकं बिनसलं कुठे, असा प्रश्न अनेकांना पडतो. ज्योतिषशास्त्र मानणाऱ्यांच्या मते, अशा काळामागे ग्रहांची विशिष्ट मांडणी कारणीभूत असू शकते. सध्या चर्चा आहे मंगळाच्या गोचराची आणि राहूसोबत होणाऱ्या त्याच्या युतीची. या संयोगातून तयार होणाऱ्या अंगारक योगाचा परिणाम फेब्रुवारीच्या अखेरपासून एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत जाणवू शकतो, अशी शक्यता ज्योतिषांनी वर्तवली आहे. या काळात चिडचिड, उतावळेपणा, चुकीचे निर्णय किंवा अनपेक्षित घटना वाढू शकतात, असे मानले जाते.
ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ऊर्जा, धैर्य व कृतीचा कारक ग्रह मानला जातो; तर राहू अचानक वळण घेणारा, संभ्रम निर्माण करणारा आणि मर्यादा भेदणारा ग्रह म्हणून ओळखला जातो. हे दोन्ही ग्रह एकत्र आल्यास परिस्थिती वेगवान, थोडी अस्थिर आणि कधी कधी गोंधळलेली वाटू शकते. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार असून, तेथे आधीपासून राहू असल्याने हा योग तयार होणार आहे. २ एप्रिल २०२६ पर्यंत त्याचा प्रभाव राहू शकतो, असे सांगितले जाते. या काळात मेहनत जास्त आणि परिणाम उशिरा मिळण्याची भावना वाढू शकते. छोट्या चुका मोठ्या अडचणींत रूपांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही काहींचे मत आहे.
अंगारक योगाचा प्रभाव! एप्रिलपर्यंत ‘या’ ३ राशींसाठी अडचणी?
मेष
मंगळाचा मेष राशीवर विशेष प्रभाव असतो, असे मानले जातो. त्यामुळे या युतीचा परिणाम अधिक ठळकपणे जाणवू शकतो, अशी शक्यता वर्तवली जाते. करिअरमध्ये अचानक तणाव निर्माण होऊ शकतो. अहंकारामुळे वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांसोबत संघर्ष होण्याची शक्यता आहे. स्वतःची बाजू पटवून देताना नकारात्मक शब्दांचा अतिरेक होऊ शकतो आणि त्याचे विपरीत परिणाम पुढे भोगावे लागू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांनी जलद नफ्याच्या आशेने मोठा धोका पत्करू नये, असा सल्ला दिला जातो. नात्यांमध्ये ‘मीच बरोबर’ ही भूमिका दुरावा वाढवू शकते. संयम आणि संवाद यांना प्राधान्य दिल्यास परिस्थिती नियंत्रणात राहू शकते.
वृश्चिक
मंगळाचा वृश्चिक राशीवरही प्रभाव असल्याने घरगुती वातावरणात तणाव जाणवू शकतो, अशी शक्यता आहे. संपत्ती, पैशांचे व्यवहार किंवा जुन्या मुद्द्यांवरून वाद वाढू शकतो. छोट्या गोष्टींचे मोठे रूपांतर होण्याची शक्यता असल्याने शब्दांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरू शकते. भावनिक पातळीवर अस्वस्थता जाणवू शकते आणि त्यामुळे काही जण अध्यात्म किंवा शांततेच्या मार्गाकडे वळू शकतात. कुटुंबीयांशी मोकळेपणाने संवाद साधल्यास गैरसमज कमी होऊ शकतात, असे मानले जाते.
कुंभ
हा योग कुंभ राशीतच तयार होत असल्याने त्याचा प्रभाव अधिक थेट असू शकतो, अशी चर्चा आहे. वैवाहिक किंवा प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. संशय, चिडचिड किंवा भावनिक अंतर जाणवू शकते. आरोग्याच्या बाबतीत झोपेचा त्रास, पचनाशी संबंधित समस्या किंवा ताण वाढू शकतो. आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे योग्य ठरू शकते. मोठे गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलण्याचा विचार काही जण करू शकतात.
कुंभ राशीचा संबंध तंत्रज्ञान, समाज आणि व्यापक बदलांशी जोडला जातो. त्यामुळे या काळात डिजिटल क्षेत्रात किंवा सामाजिक घडामोडींमध्येही अचानक हालचाली दिसू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, हे सर्व केवळ ज्योतिषशास्त्रीय अंदाजांवर आधारित असून, प्रत्येकाच्या वैयक्तिक पत्रिकेनुसार परिणाम वेगळे असू शकतात. त्यामुळे घाबरण्यापेक्षा सजग राहणे आणि निर्णय घेताना शांतपणे विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरू शकते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)

