Baba Vanga Prediction 2027: २०२६ हे वर्ष संपायला आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. हे वर्ष जगभरातील युद्धजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल आणि AIच्या वाढत्या प्रभावामुळे चर्चेत राहिलं. आता नजर लागली आहे ती २०२७ या नव्या वर्षाकडे. याचदरम्यान बल्गेरियातील प्रसिद्ध भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांच्या नावाने जोडली जाणारी एक कथित भविष्यवाणी सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

या भाकितानुसार, २०२७ मध्ये एखाद्या रहस्यमय आजारामुळे किंवा जेनेटिक प्रयोगामुळे काही माणसांमध्ये ‘सुपरह्यूमन’सारख्या क्षमता विकसित होऊ शकतात. ही गोष्ट ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटाच्या कथेसारखी वाटते. मात्र, बाबा वेंगा यांनी प्रत्यक्षात अशी भविष्यवाणी केली होती, याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही.

नेमकी काय आहे २०२७ ची कथित भविष्यवाणी?

बाबा वेंगा यांच्या समर्थकांच्या मते, २०२७ मध्ये एखादा रहस्यमय आजार किंवा वैज्ञानिक प्रयोग मानवजातीसमोर अनपेक्षित परिस्थिती निर्माण करू शकतो. याच प्रक्रियेत काही व्यक्तींमध्ये सामान्य माणसांपेक्षा वेगळ्या क्षमता विकसित होण्याची शक्यता असल्याचा दावा केला जातो. मात्र, या कथित भविष्यवाणीत या ‘सुपरपॉवर’ नेमक्या कोणत्या असतील, त्या कशा निर्माण होतील किंवा किती लोकांवर त्याचा परिणाम होईल, याबाबत स्पष्ट माहिती नाही. त्यामुळे ही भविष्यवाणी सध्या केवळ चर्चेपुरतीच मर्यादित आहे.

बाबा वेंगांच्या अनेक भविष्यवाण्या खरंच खऱ्या ठरल्या?

बाबा वेंगा या बल्गेरियातील प्रसिद्ध भविष्यवक्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे १९९६ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांच्या नावाने अनेक भविष्यवाण्या इंटरनेटवर आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या समर्थकांकडून ९/११ हल्ले, कोविड-१९ महामारी आणि प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू यांसारख्या घटनांचा अंदाज बाबा वेंगांनी आधीच व्यक्त केला होता असा दावा केला जातो. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे, या कथित भविष्यवाण्यांचे विश्वसनीय मूळ दस्तऐवज किंवा त्यांच्या स्वतःच्या लिखित नोंदी उपलब्ध नसल्याने, त्यांनी या घटना प्रत्यक्षात भाकीत केल्या होत्या का, हे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणूनच बाबा वेंगांच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक भविष्यवाणीबाबत सावध राहण्याची गरज आहे.

२०२६ बद्दलही करण्यात आले होते धक्कादायक दावे

बाबा वेंगांच्या नावाने २०२६ साठीही अनेक धक्कादायक भविष्यवाण्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यामध्ये मोठ्या युद्धाचा धोका, हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्ती, तंत्रज्ञानाचा वाढता धोका आणि एलियनशी संबंधित घटना यांचा समावेश असल्याचे दावे करण्यात आले. काही कथित भविष्यवाण्यांमध्ये पूर्वेकडून सुरू होणाऱ्या संघर्षाचा पश्चिमेकडे विस्तार होईल, असाही दावा केला जातो.

तसंच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भविष्यात अधिक प्रभावशाली जागतिक नेते म्हणून उदयास येतील, असा दावाही बाबा वेंगांच्या नावाने केला जातो. मात्र, अशा दाव्यांना पुष्टी देणारे विश्वसनीय पुरावे उपलब्ध नसल्याने त्याकडे तथ्य म्हणून पाहता येत नाही.

AIमुळे नोकऱ्या जाणार, एलियन येणार?

२०२६ मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता प्रभाव हा जगभरातील चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. अनेक कंपन्यांमध्ये AIच्या वापरामुळे कामाच्या पद्धती बदलत आहेत आणि काही क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाची गरज कमी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर बाबा वेंगांच्या नावाने AI आणि तंत्रज्ञानाशी संबंधित भविष्यवाण्यांचीही चर्चा होत आहे.

याशिवाय नोव्हेंबर २०२६ मध्ये एक मोठे स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या दिशेने येईल, असा दावाही त्यांच्या कथित भविष्यवाण्यांमध्ये असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी या घटनेचा संबंध एलियनशी जोडला जात आहे. मात्र, एलियन पृथ्वीवर येणार असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे हा दावा देखील भविष्यवाणी म्हणूनच पाहणे योग्य ठरेल.

मग २०२७ मध्ये खरंच ‘सुपरह्यूमन’ तयार होणार?

सध्या तरी याचे उत्तर नाही असेच म्हणावे लागेल. २०२७मध्ये एखाद्या आजारामुळे किंवा जेनेटिक प्रयोगामुळे माणसांना सुपरपॉवर मिळतील, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय संशोधनामध्ये मोठी प्रगती होत असली, तरी त्याचा अर्थ माणसांमध्ये चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे अचानक अलौकिक शक्ती निर्माण होतील, असा होत नाही. त्यामुळे बाबा वेंगांच्या नावाने प्रसिद्ध झालेली ही भविष्यवाणी सध्या कुतूहल निर्माण करणारा दावा म्हणूनच पाहणे योग्य ठरेल.