Uddhav Thackeray Kundali Predictions: उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत लग्नेश व दशमात बु असल्यामुळे त्यांचे राजकारणातील बौद्धीक बळ वाढेल असं म्हणत ज्योतिष तज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी लोकसभा निवडणूक निकालाच्या आधीच मोठी भविष्यवाणी केली होती. १ मे २०२४ पासून ठाकरेंच्या कुंडलीत मोठ्या बदलाचे संकेत असल्याचे सुद्धा ज्योतिष अभ्यासकांनी म्हटले होते. गुप्ते यांच्या भविष्यवाणीत अनेक मुद्दे हे आजच्या लोकसभा निवडणूक निकालात प्रतिबिंबित होत असल्याचे दिसतेय. ठाकरेंच्या प्रभावामुळे महाविकास आघाडीला सुद्धा कितपत यश मिळतंय, त्यामागची ज्योतिषीय समीकरणे कशी आहेत येत्या काळात हे यश टिकवून ठेवण्यासाठी ठाकरे गटाला नेमकी कोणती राजनीती अवलंबावी लागेल याविषयी सविस्तर माहिती पाहूया..

उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीतील बदलाचे परिणाम

ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत चतुर्थात धनु राशीतील शनि- गुरु दशम स्थानाकडे सातव्या दृष्टीने पाहत आहे. संधी मिळताच विरोधकांना कसे हरवायचे याचे कसब आपल्या गाठीशी असेल. बुध महादशेमध्ये केतूची अंतर्दशा लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवून देईल. यापुढे २७ सप्टेंबर २०२७ पर्यंत शिवसेना महाराष्ट्राला आपल्या अस्तित्वाची प्रकर्षाने जाणीव करून देऊ शकते. शिवसेनेची लोकशक्ती वाढू शकते.रवी मंगळ त्रिएकादश योगातून उद्धव ठाकरे यांना मात्र राजकीय यश प्राप्त होईल. इतकेच नव्हे तर गोचरीचा षष्ठातील शनी व जोडीने येणारा मंगळ अधिक बलवान होऊन विरोधकांना पराजयाची वाट दाखवून देईल. तसेच १ मे २०२४ ला नवमात येणारा गुरु निवडणुकीत घडणाऱ्या यशाच्या घटनांचा साक्षीदार असेल.

लोकसभा निवडणूक निकालात कशी आहे मविआची स्थिती?

उद्धव ठाकरे यांच्या गटातील तब्बल १८ उमेदवार यंदा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले होते. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार उद्धव ठाकरे गटाला ९ व शरद पवार गटाला ३ जागा मिळतील असं अपेक्षित होतं. अद्याप मतमोजणी पूर्ण झालेली नाही पण काही फेऱ्या पूर्ण होत असताना मुंबईत तरी महाविकास आघाडी अनेक ठिकाणी महायुतीवर मात करत असताना दिसतेय. भाजपा व उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार प्रत्येकी ११ जागी आघाडीवर आहेत. इतक्या मोठ्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाने भाजपाशी केलेली बरोबरी ही आश्वासक दिसत आहे.

हे ही वाचा<< “महाराष्ट्रात भाजपाच्या नावे १८ हुन अधिक विजय, तर ठाकरे, शरद पवार गटाला.. “, ज्योतिषांची निकालासाठी मोठी भविष्यवाणी

ठाकरेंना यश राखण्यासाठी काय करावे लागेल?

शिवसेना पक्षाच्या कुंडलीत कुटुंब स्थानात राहू मंगल असल्याने संघटना चालवताना येणाऱ्या अडचणी, संघटना मधूनच सोडून जाणारी मंडळी हे प्रकार कमी- जास्त प्रमाणात घडतच राहू शकतात. संघटनेतील प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार कामे दिल्यासच संघटना स्थिर राहू शकते. दया- भावुकता पक्ष चालवताना दूरच ठेवणे हिताचे ठरेल. प्रामाणिक सेनाप्रेमी सहकाऱ्यांकडून विश्वासाची कामे करून घ्यावीत. सध्या बुधाची महादशा सुरु आहे. बुध स्वगृही पंचमात असल्याने कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना स्वबळावर घेणे आवश्यक ठरेल.