Budh Gochar Benefits: वैदिक ज्योतिषानुसार बुध ग्रह साधारणपणे दर १ महिन्याने रास बदलतो आणि त्याचा परिणाम पृथ्वीवर तसेच मानवी जीवनावर दिसून येतो. हा बदल काहींसाठी चांगला तर काहींसाठी थोडा कठीण ठरू शकतो.
फ्युचर पंचांगानुसार ग्रहांचा राजकुमार बुध ३० एप्रिलला मेष राशीत प्रवेश करणार आहे. ही रास मंगळाच्या अधिपत्याखाली येते. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला शिक्षण, गणित, लेखन, अकाउंट्स, शेअर बाजार, व्यापार, बुद्धिमत्ता, अर्थकारण आणि तर्कशक्तीचा कारक मानले जाते.
म्हणून बुधाच्या या गोचराचा परिणाम या सर्व क्षेत्रांवर आणि १२ही राशींवर दिसून येईल. पण मिथुन, कर्क आणि मेष राशीच्या लोकांना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. या लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि आर्थिक स्थिती सुधारू शकते.
फ्युचर पंचांगानुसार ३० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी व्यापार आणि बुद्धीचा कारक बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे.
मेष रास ही अग्नी तत्त्वाची मानली जाते. ही रास जलद निर्णय घेणे, नेतृत्व करणे आणि नवीन गोष्टीची पुढाकार घेणे यासाठी ओळखली जाते. अशावेळी बुधसारखा तर्क आणि बुद्धीचा ग्रह या राशीत आल्यावर व्यक्तीची विचार करण्याची गती वाढते, पण स्थिरता थोडी कमी होऊ शकते. म्हणजेच व्यक्ती पटकन निर्णय घेऊ लागते, जोखीम घ्यायला तयार राहते, पण कधी कधी पूर्ण योजना न करता पाऊल उचलते. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि संयम राखणे खूप गरजेचे असते.
मेष राशी (Aries Zodiac Sign)
बुधाचे हे गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या राशीच्या लग्न भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वावर आणि विचारांवर त्याचा चांगला प्रभाव पडेल.
या वेळेत तुमचे संवाद कौशल्य मजबूत होऊ शकते, त्यामुळे लोक तुमच्यामुळे सहज प्रभावित होऊ शकतात. तुमची विचारसरणीही सकारात्मक राहू शकते. नवीन प्रोजेक्ट सुरू करणे, व्यवसाय वाढवणे आणि स्वतःची ओळख मजबूत करणे यासाठी हा काळ खूप अनुकूल ठरू शकतो. या काळात तुम्हाला मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. तसेच वैवाहिक जीवनही आनंदी आणि सुखद राहू शकते.
मात्र, या वेळेत घाईगडबड टाळणे खूप गरजेचे आहे. कधी कधी तुम्ही थोडे अहंकारी होऊ शकता. तसेच पूर्ण माहिती न घेता काम किंवा व्यवसायाबाबत निर्णय घेणे, किंवा इतरांचा सल्ला दुर्लक्षित करणे टाळा.
नाहीतर यामुळे नातेसंबंध आणि काम या दोन्ही ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संयम आणि धैर्य हीच या काळात तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. याकडे विशेष लक्ष द्या.
मिथुन राशी (Gemini Zodiac Sign)
तुमच्यासाठी बुध ग्रहाचे हे गोचर चांगले ठरू शकते. कारण बुध हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. तसेच बुध तुमच्या राशीच्या लाभ आणि उत्पन्न स्थानात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात तुमची बुद्धिमत्ता, लोकांशी संपर्क वाढवण्याची कला आणि बोलण्याची पद्धत खूप प्रभावी राहू शकते.
या दरम्यान तुम्ही नवीन लोकांशी ओळखी वाढवू शकता. नवीन कल्पनांवर काम करू शकता आणि काम पुढे नेण्यासाठी चांगली योजना तयार करू शकता. तसेच या काळात उत्पन्न वाढण्याचेही संकेत आहेत.
मात्र, या काळात एखाद्या गोष्टीमुळे मन थोडे अस्वस्थ राहू शकते. तुम्ही एकाच वेळी अनेक कामांची सुरुवात करू शकता, पण ती पूर्ण करताना लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. म्हणून या वेळी फोकस टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे असेल. नातेसंबंधांमध्येही स्पष्टता ठेवा, कारण गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे.
कर्क राशी (Cancer Zodiac Sign)
कर्क राशीसाठी बुधाचे हे गोचर करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकते. कारण हे गोचर तुमच्या राशीच्या कर्म भावात होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्ही तुमच्या काम आणि व्यवसायाबाबत अधिक गंभीर आणि सक्रिय राहू शकता.
या वेळेत तुमच्यात पुढे जाण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ शकते आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तुम्ही भरपूर मेहनत घ्याल. नोकरी करणाऱ्या लोकांचे अधिकारी आणि वरिष्ठांसोबत चांगले संबंध राहू शकतात, त्यामुळे नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
पण कर्क राशीचा स्वभाव भावनिक असल्यामुळे बुधाचा वेगवान प्रभाव कधी कधी तुमच्यात घाईगडबड निर्माण करू शकतो. त्यामुळे या काळात पटकन निर्णय घेणे टाळा. तसेच या काळात जास्त भावनिक होण्यापासून स्वतःला सांभाळणेही खूप महत्त्वाचे असेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
