Budh Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राला अत्यंत शुभ नक्षत्र मानले जाते. बुद्धी, वाणी, तर्कशक्ती, संवाद आणि व्यापाराचा कारक असलेला बुध ग्रह आता पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे अनेक राशींच्या आयुष्यात या काळात महत्त्वाचे बदल घडू शकतात. निर्णय, आर्थिक व्यवहार, नोकरी-व्यवसाय आणि नातेसंबंधांच्या बाबतीत या काळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.
दृक पंचांगानुसार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजून २३ मिनिटांनी बुध पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २ वाजून १९ मिनिटांपर्यंत बुध याच नक्षत्रात राहील. त्यानंतर बुध अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. म्हणजेच जवळपास ८ दिवसांचा हा काळ काही राशींसाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो.
ज्योतिषाशास्त्रानुसार, बुध आणि शनि हे मित्र ग्रह मानले जातात. मात्र बुध वेग, बुद्धी, संवाद आणि निर्णयांचे प्रतिनिधित्व करतो, तर शनि संयम, कर्म आणि विलंबाचा कारक आहे. त्यामुळे या काळात काही राशींना निर्णय घेताना घाई टाळावी लागेल. मिथुन, कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी १६ ऑगस्टपर्यंत अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.
मिथुन राशी – छोट्या गैरसमजातून मोठा वाद होण्याची शक्यता
मिथुन राशीचा स्वामी बुध असल्याने या नक्षत्र गोचराचा प्रभाव तुमच्यावर विशेष जाणवू शकतो. या काळात संवादातील छोटी चूक किंवा गैरसमज मोठ्या वादाचे कारण बनू शकतो. त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरणे महत्त्वाचे ठरेल. कोणत्याही विषयावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी समोरच्या व्यक्तीचे म्हणणे नीट समजून घ्या. अनावश्यक वाद आणि चर्चांपासून दूर राहणे फायदेशीर ठरेल.
व्यावसायिकांसाठीही हा काळ काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाबींची पडताळणी करा. आर्थिक व्यवहारांमध्ये घाई केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नका.
कन्या राशी – मेहनत भरपूर, पण अपेक्षित यशासाठी प्रतीक्षा
कन्या राशीच्या व्यक्तींना या काळात एखादे काम पूर्ण करण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. मेहनत करूनही लगेच त्याचे अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत तर निराश होऊ नका.
या काळात काही चांगल्या संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. मात्र योग्य वेळी निर्णय न घेतल्यास या संधी हातातून निसटण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना अतिविचार न करता परिस्थितीचा शांतपणे आढावा घ्या.
न्यायालय संबंधित प्रकरण सुरू असल्यास संयम राखणे योग्य ठरेल. परिस्थिती पुढील काळात तुमच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबतीतही खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
कुंभ राशी – प्रवासाचा बेत अचानक रद्द होऊ शकतो!
कुंभ राशीच्या व्यक्तींनी या काळात कोणतेही नवीन काम सुरू करताना विशेष सावधगिरी बाळगावी. घाईघाईने गुंतवणूक करणे किंवा शॉर्टकटचा मार्ग स्वीकारणे टाळा. चुकीचा निर्णय आर्थिक नुकसान घडवू शकतो.
या काळात प्रवासाचे योग असले तरी प्रवासाशी संबंधित काही अडथळे निर्माण होऊ शकतात. अगदी शेवटच्या क्षणी ट्रॅव्हल प्लॅन रद्द किंवा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी व्यवस्था तयार ठेवणे फायद्याचे ठरेल.
मित्र किंवा जोडीदारासोबत एखाद्या छोट्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. त्यामुळे नात्यांमध्ये संवाद साधताना संयम ठेवा आणि क्षुल्लक गोष्टींचे मोठे रूप होऊ देऊ नका.
बुधाचे पुष्य नक्षत्रातील हे सुमारे ८ दिवस काही राशींसाठी सावधगिरीचे ठरू शकतात. मिथुन, कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी संवाद, आर्थिक व्यवहार, प्रवास आणि महत्त्वाचे निर्णय घेताना घाई टाळावी.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
