Budhaditya Yoga 2026: सप्टेंबर महिन्याचे शेवटचे १५ दिवस ग्रहांच्या हालचालींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे बुध आधीपासूनच कन्या राशीत विराजमान असतील. त्यामुळे सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर बुध तुला राशीत प्रवेश करेल आणि हा योग समाप्त होईल.
विशेष म्हणजे बुधाची स्वतःची राशी असलेल्या कन्येत हा योग तयार होत आहे. बुधाला बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, लेखन, गणित, व्यापार आणि संवादाचा कारक मानलं जातं. तर सूर्य हा नेतृत्व, पद, प्रतिष्ठा, प्रशासन आणि आत्मविश्वासाशी संबंधित ग्रह मानला जातो. त्यामुळे या काळात काही राशींना करिअर, आर्थिक स्थिती आणि यशाच्या बाबतीत सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरू शकतो…
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी कन्या राशी पाचव्या भावात येते. हा भाव शिक्षण, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, संतती आणि नियोजनाशी संबंधित मानला जातो. बुधादित्य योगामुळे विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा एखादं नवीन कौशल्य शिकण्याच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरू शकतो. लेखन, माध्यम, शिक्षण, डिझाइन आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. याशिवाय पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून किंवा एखाद्या जुन्या योजनेतून फायदा होण्याचे संकेत आहेत.
सिंह राशी
सिंह राशीसाठी बुधादित्य योग दुसऱ्या भावात तयार होईल. हा भाव पैसा, बचत, कुटुंब आणि वाणीशी संबंधित मानला जातो. त्यामुळे आर्थिक बाबतीत हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ, प्रोत्साहन किंवा अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. विशेषतः योग्य संवाद आणि हुशारीने केलेली सौदेबाजी आर्थिक फायदा करून देऊ शकते. मात्र बोलताना शब्द जपून वापरणं महत्त्वाचं ठरेल.
कन्या राशी
कन्या राशीतच बुधादित्य योगाची निर्मिती होत असल्याने या राशीच्या लोकांवर त्याचा विशेष प्रभाव पडू शकतो. बुध हा कन्या राशीचा स्वामी असल्यामुळे व्यक्तिमत्त्व, विचारशक्ती आणि निर्णयक्षमता अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळणे, पदोन्नती किंवा चांगली संधी मिळण्याचे संकेत आहेत. लेखन, संपादन, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, माध्यम आणि विश्लेषणाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करण्याऐवजी योग्य वेळी निर्णय घेणं फायदेशीर ठरेल.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीसाठी कन्या अकराव्या भावात येते. हा भाव उत्पन्न, लाभ, इच्छांसंबंधित मानला जातो. त्यामुळे बुधादित्य योगाच्या काळात आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होऊ शकतात. जुन्या ओळखी किंवा संपर्कांमधून फायदा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत पगारवाढ किंवा पदोन्नतीबाबत चर्चा पुढे सरकू शकते. व्यावसायिकांना नवीन ग्राहक मिळणे किंवा एखादा मोठा व्यवहार निश्चित होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ या काळात मिळू शकतं, अशी ज्योतिषीय मान्यता आहे.
धनु राशी
धनु राशीसाठी कन्या दहाव्या भावात येते. दहावा भाव करिअर, पद, प्रतिष्ठा आणि व्यवसायाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे या राशीसाठी बुधादित्य योग विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. पद, जबाबदारी किंवा पदोन्नतीशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना करार, ग्राहकांशी संवाद आणि नवीन व्यावसायिक रणनीतीचा फायदा होऊ शकतो. मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळण्याची शक्यता असल्याने हा काळ करिअरसाठी सकारात्मक ठरू शकतो.
मकर राशी
मकर राशीसाठी कन्या नवव्या भावात येते. नववा भाव भाग्य, उच्च शिक्षण, परदेश आणि मोठ्या संधींशी जोडला जातो. या काळात स्पर्धा परीक्षा, प्रशिक्षण किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी किंवा प्रशासनाशी संबंधित क्षेत्रात तयारी करणाऱ्यांसाठीही काळ अनुकूल ठरू शकतो. परदेश किंवा दुसऱ्या शहराशी संबंधित कामांमध्ये सकारात्मक घडामोडी होण्याचे संकेत आहेत.
बुधादित्य योग म्हणजे काय?
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि बुध एकाच राशीत आल्यावर बुधादित्य योग तयार होतो. बुद्धिमत्ता आणि संवादाचे प्रतिनिधित्व करणारा बुध तसेच नेतृत्व आणि आत्मविश्वासाचा कारक मानला जाणारा सूर्य यांची युती असल्याने हा योग शिक्षण, करिअर, व्यवसाय आणि निर्णयक्षमता यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. यंदा हा योग कन्या राशीत तयार होत असल्याने बुधाच्या प्रभावामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त होत असल्याचे ज्योतिषशास्त्रात मानले जाते.
