Calendar Direction as Per Vastu: नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं की घराघरांत एक वेगळाच उत्साह असतो. जुने वर्ष मागे टाकत आपण नव्या आशा, नवी स्वप्नं आणि नवे संकल्प घेऊन पुढे जातो. याच उत्साहात अनेक जण घरातील जुने कॅलेंडर काढून टाकून नवीन कॅलेंडर भिंतीवर लावतात. मात्र, हे कॅलेंडर नेमकं कुठे आणि कशा पद्धतीने लावायचं याबाबत वास्तुशास्त्रात काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. हे नियम पाळले नाहीत तर चुकून घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, असं वास्तुशास्त्र सांगतं.

जुने कॅलेंडर ठेवणं शुभ की अशुभ?

वास्तुशास्त्रानुसार, जुन्या वर्षाचं कॅलेंडर घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. अनेक लोक जुन्या कॅलेंडरवरच नवीन कॅलेंडर लावतात किंवा जुने कॅलेंडर बाजूला न काढता तसेच टांगून ठेवतात. मात्र, ज्योतिषाचार्यांच्या मते असं करणं टाळायला हवं. जुने कॅलेंडर म्हणजे भूतकाळात अडकलेली ऊर्जा. ती ऊर्जा घरात राहिल्यास नवीन संधी, नवीन प्रगती आणि सकारात्मक बदल अडचणीत येऊ शकतात, म्हणूनच वर्ष बदलल्यावर जुने कॅलेंडर पूर्णपणे काढून टाकणं आवश्यक मानलं जातं. असं केल्याने नव्या वर्षात सकारात्मक विचार, नवी ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो.

कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कोणती?

वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक वस्तूला एक योग्य दिशा असते. कॅलेंडरही त्याला अपवाद नाही.
वास्तुशास्त्र सांगतं की कॅलेंडर लावण्यासाठी पूर्व दिशा किंवा उत्तर-पश्चिम दिशा सर्वात शुभ मानली जाते.

विशेषतः पूर्व दिशा अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण पूर्व दिशेचा स्वामी सूर्यदेव आहे. सूर्य हा ऊर्जा, तेज, प्रगती आणि यशाचं प्रतीक मानला जातो, त्यामुळे घराच्या पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्यास प्रगतीचे मार्ग खुले होतात असं मानलं जातं. त्यामुळे आर्थिक स्थैर्य, करिअरमध्ये वाढ आणि घरातील वातावरण सकारात्मक राहण्यास मदत होते.

उत्तर-पश्चिम दिशेलाही वास्तुशास्त्रात चांगलं स्थान दिलं गेलं आहे. या दिशेला कॅलेंडर लावल्यास नवे संबंध, संधी आणि सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता वाढते.

कॅलेंडर लावताना ‘या’ चुका टाळा

  • तुटलेलं, फाटलेलं किंवा खराब कॅलेंडर लावू नये
  • भिंतीवर उलटं किंवा वाकडं कॅलेंडर टांगू नये
  • कॅलेंडर स्वयंपाकघरात किंवा बाथरूमजवळ लावणं टाळावं
  • नकारात्मक, उदास किंवा हिंसक चित्र असलेलं कॅलेंडर वापरू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

थोडक्यात सांगायचं झालं तर…

नवीन वर्षात केवळ नवीन कॅलेंडर आणणं पुरेसं नाही, तर ते योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने लावणंही तितकंच महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्रातील हे छोटे नियम पाळले तर घरात सकारात्मक ऊर्जा, सुख-समृद्धी आणि समाधान नांदण्याची शक्यता नक्कीच वाढू शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)