Kark May Rashibhavishya 2026: चंद्राची रास कर्क आहे. त्यामुळे चंद्राची कोमलता, हळुवारपणा, भावूकपणा कर्क राशीच्या लोकांमध्ये असतो. आपल्यातील कलात्मकता आणि सर्जनशीलता वाखाणण्याजोगी असते. कोणालाही मदत करायला आपण सदैव तत्पर असता. एकटं-एकटं राहण्यापेक्षा आपण समूहासोबत राहणे पसंत करता. कधी उत्साह, तर कधी मरगळ, अशी दोलायमान स्थिती असते. अशा या कर्क राशीच्या लोकांसाठी पुढचा येणारा मे महिना कसा असेल याचा आढावा घेऊया.
वर्षभरातील महत्त्वाच्या ग्रहांचे राशिबदल असे आहेत…
यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल लाभ स्थानातील वृषभ राशीतून भ्रमण करेल. नेपच्युन आणि शनी भाग्यातील मीन राशीत असेल. प्लुटो सप्तमातील मकर राशीतून भ्रमण करेल. गुरू व्यय स्थानातील मिथुन राशीत असेपर्यंत गुरुबल कमजोर असेल. पण १ जूनला गुरू आपल्या कर्क राशीत प्रवेश करेल. चांगले गुरुबल प्राप्त होईल.
पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू द्वितीयातील सिंह राशीत प्रवेश करील. हा राशिबदलदेखील आपल्यासाठी चांगला असणार आहे. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे मकर आणि कर्क राशीत प्रवेश करतील. प्लुटो वर्षभर मकर राशीत असेल.
कर्क राशीचे मे महिन्याचे राशीभविष्य (Cancer Horoscope May 2026)
१ मे रोजी येणारी बुद्ध पौर्णिमा आत्मविश्वास अधिक बळकट करील. विचारांमध्ये स्थैर्य येईल. कामे पुढे सरकतील. १७ मेपासून अधिक महिना सुरू होत आहे. विद्यार्थी आपल्या मनाजोगता अभ्यासक्रम निवडतील. उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करताना विशेष मेहनत घ्यावी लागेल. नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने उचललेले नवे पाऊल प्रगतीच्या दिशेने पुढे पडेल.
मित्रांच्या मदतीला तोड नाही याची पुन्हा एकदा प्रचिती येईल. ध्यानात असू द्या… कोणालाही आपल्या चांगुलपणाचा फायदा घ्यायला देऊ नका. उघड्या डोळ्यांनी गुंतवणूक करा. भूलथापांना बळी पडू नका. विवाहित दाम्पत्य कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकून पडतील. नातेवाइकांच्या मदतीने परिस्थिती आटोक्यात आणाल. जमीनजुमल्याचे निर्णय १४ मेच्या आधी झाले, तर फायद्याचे ठरतील. उष्णतेचे विकार, पित्त प्रकोप, डोकेदुखी असे त्रास वारंवार झाल्यास वैद्यकीय उपचार सुरू करावेत.
– ज्योतिषी सोनल चितळे
