Kark October Rashibhavishya 2026: चंद्राची रास कर्क आहे. त्यामुळे चंद्राची कोमलता, हळुवारपणा, भावूकपणा कर्क राशीच्या लोकांमध्ये असतो. आपल्यातील कलात्मकता आणि सर्जनशीलता वाखाणण्याजोगी असते. कोणालाही मदत करायला आपण सदैव तत्पर असता. एकटं-एकटं राहण्यापेक्षा आपण समूहासोबत राहणे पसंत करता. कधी उत्साह, तर कधी मरगळ, अशी दोलायमान स्थिती असते. अशा या कर्क राशीच्या लोकांसाठी पुढचा येणारा ऑक्टोबर महिना कसा असेल याचा आढावा घेऊया.

वर्षभरातील महत्त्वाच्या ग्रहांचे राशिबदल असे आहेत…

यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल लाभ स्थानातील वृषभ राशीतून भ्रमण करेल. नेपच्युन आणि शनी भाग्यातील मीन राशीत असेल. प्लुटो सप्तमातील मकर राशीतून भ्रमण करेल. गुरू व्यय स्थानातील मिथुन राशीत असेपर्यंत गुरुबल कमजोर असेल. पण १ जूनला गुरू आपल्या कर्क राशीत प्रवेश करेल. चांगले गुरुबल प्राप्त होईल.

पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू द्वितीयातील सिंह राशीत प्रवेश करील. हा राशिबदलदेखील आपल्यासाठी चांगला असणार आहे. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे मकर आणि कर्क राशीत प्रवेश करतील. प्लुटो वर्षभर मकर राशीत असेल.

कर्क राशीचे ऑक्टोबर महिन्याचे राशीभविष्य (Cancer Horoscope October 2026)

१० ऑक्टोबरपर्यंतचा पितृ पंधरवडा माणुसकीचे धडे शिकवणारा असेल. गरजवंतांना सढळ हाताने मदत कराल. विद्यार्थ्यांना प्रचंड मेहनतीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मित्रमंडळ, प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे यांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची तयारी कराल. घटस्थापना नवे बळ देईल. दसऱ्याला व्यवसायातील नवे करार होतील. कामकाजाच्या निमित्ताने दूरचे प्रवास कराल.

उपवर वधू-वरांचे विवाह जुळतील. सुयोग्य स्थळ मिळेल. कोजागिरी पौर्णिमेला आनंदाचे चांदणे पसरेल. संततीसाठी प्रयत्न केलेत, तर यश मिळेलच. जमिनीचे करार होतील. वाटाघाटी, चर्चा यांना भांडणाचे रूप देऊ नका. गुंतवणूक करताना फार मोठी जोखीम घेतलीत, तर व्यवहार डोईजड होईल. मनाविरुद्ध घटना घडल्यास जीवाला लावून घ्याल. त्यामुळे आरोग्य बिघडेल. ३१ ऑक्टोबरला गुरू आपल्या द्वितीयातील सिंह राशीत प्रवेश करेल.

– ज्योतिषी सोनल चितळे