Budh Gochar 2026 Impact on Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचाली मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या शक्यता निर्माण करतात. अशाच एका महत्त्वाच्या घडामोडीकडे सध्या ज्योतिषतज्ज्ञांचे लक्ष वेधले गेले आहे. शनिवार, १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजून २७ मिनिटांनी बुध ग्रह धनू राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार आहे. विशेष बाब म्हणजे बुध या राशीत ३ फेब्रुवारीपर्यंत विराजमान राहील आणि त्यानंतर तो शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल.

ज्योतिष मान्यतेनुसार मकर राशीत असलेला बुध अनेकदा शुभ फल देणारा मानला जातो. हा गोचर विशेषतः तीन राशींच्या लोकांसाठी करिअर, प्रतिष्ठा, संधी व निर्णयक्षमता या बाबतीत सकारात्मक संकेत देणारा ठरू शकतो. अर्थात, हे सर्व ज्योतिषशास्त्रीय शक्यतांवर आधारित अंदाज असून, प्रत्यक्ष परिणाम व्यक्तीच्या कुंडलीवर अवलंबून असू शकतात.

बुध ग्रहाचे राशी बदल होताच काही राशींसाठी आर्थिक दिलासा आणि संधीचे संकेत

मेष

बुध मेष राशीच्या लोकांसाठीदहाव्या स्थानात गोचर करणार आहे. जन्मकुंडलीतील दहावे स्थान हे करिअर, कार्यक्षेत्र, अधिकार व सामाजिक ओळख यांच्याशी संबंधित मानले जाते. त्यामुळे या काळात कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता दिसते. नवीन प्रकल्प, पदोन्नतीसारख्या संधी किंवा वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याचे संकेतही काही ज्योतिषीय गणनांमध्ये दिसून येतात.

या काळात मेष राशीच्या लोकांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची ओढ वाढू शकते. विशेषतः तांत्रिक, संरक्षण, शस्त्रसामग्री, यंत्रसामग्री किंवा प्रशासकीय क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. वडिलांशी संबंधित बाबींमध्येही प्रगती किंवा सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता काही ज्योतिषतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

वृषभ

बुध वृषभ राशीच्या लोकांसाठी नवव्या स्थानात भ्रमण करणार आहे. नववे स्थान हे भाग्य, धर्म, दीर्घ प्रवास, उच्च शिक्षण व जीवनदृष्टी यांच्याशी संबंधित मानले जाते. त्यामुळे या काळात नशीब साथ देत असल्याची भावना अनेक वृष राशीच्या जातकांना जाणवू शकते. अचानक आर्थिक लाभ, रखडलेली कामे मार्गी लागणे किंवा वरिष्ठांचा पाठिंबा मिळणे अशा शक्यता ज्योतिषशास्त्रात मांडल्या जातात.

कौटुंबिक सहकार्य वाढण्याची शक्यता असून, धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढू शकते. आरोग्याच्या बाबतीतही सकारात्मक स्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी लाभण्याची शक्यता आहे. या काळात प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढू शकतो.

मकर

हा गोचर मकर राशीच्या लोकांसाठी विशेष मानला जातो. कारण- बुध थेट लग्न म्हणजेच पहिल्या स्थानात प्रवेश करणार आहे. हे स्थान व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, आरोग्य व संवादशैली यांच्याशी संबंधित असते. त्यामुळे या काळात मकर राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला दिसू शकतो. समाजात मान-सन्मान, आर्थिक लाभ आणि ओळखी वाढण्याच्या शक्यता ज्योतिषशास्त्रात नमूद केल्या जातात.

प्रेमसंबंधांमध्ये संवाद सुधारण्याची, नात्यात स्पष्टता येण्याची चिन्हे दिसू शकतात. काहींच्या बाबतीत संतानाशी संबंधित कायदेशीर किंवा औपचारिक बाबींमध्ये सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, बुधाच्या प्रभावामुळे थोडी स्वार्थी किंवा खोडकर वृत्ती वाढू शकते, असा इशाराही काही ज्योतिषतज्ज्ञ देतात. त्यामुळे या काळात संयम आणि समतोल राखणे फायदेशीर ठरू शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)