Chanakya Niti On Husband Wife Relationship : आचार्य चाणक्य यांना भारतीय इतिहासातील सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि नीतिशास्त्रज्ञ मानले जाते. त्यांच्या ‘चाणक्य नीती’ या ग्रंथात जीवनाच्या प्रत्येक पैलूचे सविस्तर भाष्य करण्यात आले आहे. त्यांनी मांडलेली तत्त्वे शतकांपूर्वी जितकी समर्पक होती, तितकीच ती आजही आहेत. चाणक्यांचे वैवाहिक जीवन आणि स्त्री-पुरुष संबंधांविषयीचे विचार अत्यंत गहन आहेत.

आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की, माणसाचे यश आणि त्याच्या कुटुंबाचे कल्याण हे मोठ्या प्रमाणात त्याच्या पत्नीवर अवलंबून असते. त्यांनी काही विशिष्ट गुणांचे वर्णन केले आहे, जे स्त्रीमध्ये असल्यास ती घराला स्वर्ग बनवू शकते.

कर्तव्यनिष्ठ स्त्री

चाणक्यांच्या मते, जी स्त्री धर्माच्या मार्गाने चालते आणि सुसंस्कारी असेल, तर ती संपूर्ण कुटुंबाचा उत्कर्ष करते. स्त्री सदगुणी असणे म्हणजे तिने केवळ आपल्या जीवनाप्रति निष्ठेने वागणे नव्हे, तर आपल्या कर्तव्यांप्रतिही निष्ठेने वागणे होय. अशी स्त्री घरात शिस्त आणि सभ्यता राखते, ज्यामुळे कुटुंबात शांतता आणि आनंद टिकून राहतो.

समाधानी आणि गोड बोलणारी

आचार्य सांगतात की, गोड बोलणारी स्त्री अत्यंत कठीण काळातही कुटुंबाला तुटण्यापासून वाचवते. कठोर बोलणारी स्त्री घरात कलह निर्माण करते. गोड बोलणारी स्त्री अनोळखी लोकांनाही आपलेसे करू शकते. इतकेच नाही, तर प्रतिकूल परिस्थितीतही संयम राखणारी आणि अधिक मिळवण्याची इच्छा न बाळगता, समाधानी कसे राहायचे हे जाणणारी स्त्री पुरुषाचे जीवन तणावमुक्त करते.

बचत आणि कुशलतेने घराचा कारभार सांभाळणारी

चाणक्य नीतीनुसार, ज्या पुरुषाची पत्नी बचत करण्यात पारंगत असते, त्याच्या घरात गरिबी कधीच शिरत नाही. देवी लक्ष्मीचा अवतार मानली जाणारी अशी स्त्री घरखर्चामध्ये संतुलन राखते. संकटाच्या काळात जेव्हा पुरुष असहाय होतो, तेव्हा स्त्रीने वाचवलेला पैसा कुटुंबाचे रक्षण करतो.

सुशिक्षित आणि बुद्धिमान

एक समजूतदार आणि बुद्धिमान पत्नी ही पुरुषाची सर्वांंत मोठी सल्लागार असते. चाणक्यांच्या मते, सुशिक्षित आणि व्यवहारज्ञान असलेली स्त्री आपल्या पतीला योग्य-अयोग्य यतील फरक समजावून सांगू शकते. अशा स्त्रिया आपल्या मुलांना उत्तम संस्कारही देतात, ज्यामुळे भावी पिढ्या समृद्ध होतात. ज्याप्रमाणे रथ पुढे जाण्यासाठी त्याची दोन्ही चाके सुस्थितीत असणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे सुखी जीवनासाठी पुरुषाला एका सदगुणी आणि सुसंस्कृत पत्नीची सोबत मिळणे आवश्यक असते.