Chanakya Niti for Modern Parents: प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने भविष्यात यशस्वी व्हावे, त्याला आदर मिळावा आणि तो एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून घडावी, अशी इच्छा असते; पण यासाठी फक्त चांगले शिक्षण, पैसा आणि संपत्तीच पुरेशी नसते. त्याऐवजी योग्य संगोपन, मजबूत मूल्ये आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. याबाबतच आचार्य चाणक्यांनी मुलांच्या संगोपनाबाबत काही स्पष्ट आणि व्यावहारिक तत्त्वे सांगितली आहेत, जी आजदेखील तितकीच उपयुक्त आहेत. जर तुम्ही ही तत्त्वे स्वीकारली, तर तुम्ही तुमच्या मुलांना केवळ यशस्वीच नाही, तर एक चांगला माणूस म्हणून घडवू शकाल.
चाणक्य नीती काय सांगते?
१) शिस्त शिकवा
आचार्य चाणक्य यांच्या मते, मुलाच्या आयुष्यातील पहिली पाच वर्षं फार महत्त्वाची असतात. या काळात त्यांच्यावर खूप प्रेम केलं पाहिजे, प्रेमामुळे भावनिक शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. त्यानंतर पुढील १० वर्षं त्यांना चांगली शिस्त लावा, योग्य व अयोग्य यांतील फरक समजावून सांगा, नियमांचे महत्त्व समजावून सांगा, जबाबदारी घ्यायला शिकवा, जेव्हा मुले १६ वर्षांची होतील तेव्हा त्यांच्याशी मित्राप्रमाणे वागा, हुकूमशाहीऐवजी त्यांना समजून घ्या, त्यांचे ऐका आणि मार्गदर्शन करा, त्यामुळे ते तुमच्यासमोर मनमोकळेपणाने बोलू शकतील, चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता कमी होईल.
२) चांगले शिक्षण द्या
चाणक्य नीतीनुसार, ज्ञान ही सर्वांत मोठी संपत्ती आहे, जी कोणीही कुणाकडून चोरू शकत नाही, त्यामुळे केवळ चांगल्या शाळेत अॅडमिशन करून चालणार नाही. मुलांना आधी जीवनातील वास्तव शिकवा. त्यांना महत्त्वाचे निर्यर्य कसे घ्यावेत, इतरांशी कसे बोलावे, कठीण परिस्थितीत शांत कसे राहावे हे शिकवा, त्यांना प्रश्न विचारू द्या आणि विचार करण्याची क्षमता विकसित करू द्या, जेव्हा मूल योग्य प्रकारे निर्णय घेण्यास शिकते तेव्हा ते जीवनात प्रगती करू शकते.
३) चारित्र्य घडवण्यावर लक्ष केंद्रित करा
काळानुसार संपत्ती, पद, प्रसिद्धी बदलू शकते; पण चारित्र्य आयुष्यभराची संपत्ती आहे म्हणून लहानपणापासून तुमच्या मुलांना सत्य, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम करण्याची सवय लावा. चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश टिकत नाही हे सांगा. जेव्हा मुलांना सत्य बोलण्याची आणि योग्य गोष्ट करण्याची सवय लागते तेव्हा ती प्रत्येक परिस्थितीत मजबूत अन् खंबीरपणे उभी राहतात. मुले घरी जी पाहतात, तेच ती शिकतात म्हणून आई- वडिलांनीदेखील वर्तन योग्य ठेवा.
४) योग्य संगतीत ठेवा
मुले ज्या लोकांबरोबर वेळ घालवतात, त्यांचा त्याच्या व्यक्तिमत्त्व, विचारसरणी यांवर खोलवर परिणाम होतो म्हणून त्यांच्या सहवासाकडे लक्ष द्या. चांगल्या मित्रांचे महत्त्व समजावून सांगा. जर तुम्हाला मुले वाईट संगतीत सापडल्याचे लक्षात आले, तर त्यांना फटकारण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगा. त्यांच्या मित्रांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि असे वातावरण तयार करा की, तुमची मुले तुमच्याशी सर्व काही शेअर करू शकतील. त्यांना चांगल्या संगतीत वाढण्यास आणि योग्य दिशेने मार्गदर्शन मिळावे यासाठी मदत करा.
५) स्वावलंबी बनवा
जास्त लाड केल्याने मुले कमकुवत बनतात. तुमच्या मुलाला प्रत्येक लहान समस्येपासून वाचण्याऐवजी त्यांना त्याचा सामना कसा करायचा ते शिकवा, त्यांना स्वत:हून छोटे निर्णय घेऊ द्या. मुले चुका करतील तेव्हा त्यांना समजावून सांगा. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना जीवनातील आव्हानांसाठी तयार केले जाईल. कारण- केवळ एक स्वावलंबी मूलच एक यशस्वी व्यक्ती बनू शकते.
