Chanakya Niti For Parents : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात जीवन यशस्वी, शिस्तबद्ध आणि आनंदी बनवण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे पालन करून आपल्याला यशस्वी आणि चांगले जीवन जगता येऊ शकते. त्यांनी यात पालकांच्या कर्तव्यांचेही सविस्तर वर्णन केले आहे.
पुत्राश्च विविधैः शीलैर्नियोज्याः सततं बुधैः।
नीतिज्ञाः शीलसम्पन्ना भवन्ति कुलपूजिताः ।।
चाणक्य नीतीच्या दुसऱ्या अध्यायातील दहाव्या श्लोकात, आई-वडिलांची कर्तव्ये कोणती यावर भाष्य करण्यात आले आहे. याविषयी त्यात म्हटले आहे की, सुज्ञ, बुद्धिमान लोकांनी आपल्या मुला-मुलींमध्ये विविध चांगले गुण रुजवावेत, त्यांना काय चूक आणि काय बरोबर ते शिकवावे. त्यांनी त्यांना चांगल्या कार्यात गुंतवून ठेवावे. कारण- जे नीतिमत्तेचे जाणकार, सद्गुणी व सौम्य स्वभावाचे असतात, त्यांनाच त्यांच्या कुटुंबात आदर मिळतो.
या श्लोकात आचार्य चाणक्य सांगतात की, मुलांना बालपणी मिळणारी शिकवण त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवते. त्यामुळे आपल्या मुलांना लहानपणीच हुशार आणि चांगला, सभ्य माणूस म्हणून घडवणे पालकांचे कर्तव्य आहे. कारण- सद्गुणी व्यक्तीच कुटुंबाचं वैभव ठरू शकते.
माता शत्रु पिता वैरी येन बालो न पाठितः।
न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा ।।
दुसऱ्या अध्यायाच्या ११ व्या श्लोकात असे म्हटले आहे की, जे पालक आपल्या मुलांना शिक्षण देत नाहीत, ते त्यांच्या मुलांचे शत्रूंसारखे असतात. निरक्षर मूल विद्वान लोकांमध्ये शोभत नाही तसेच त्यांचा नेहमीच तिरस्कार केला जातो. विद्वानांच्या गटात त्याचा अपमान केला जातो, जसा हंसांच्या थव्यात बगळ्याचा अनादर केला जातो.
आचार्य चाणक्य सांगतात की, केवळ मनुष्य म्हणून जन्माला आल्याने कोणी बुद्धिमान होत नाही. शिक्षण आवश्यक आहे. सर्व माणसे दिसायला आणि आकाराने सारखीच असतात; पण त्यांची बुद्धिमत्ता हेच त्यांचे वेगळे वैशिष्ट्य असते. ज्याप्रमाणे पांढऱ्या हंसांमध्ये बसलेला पांढरा बगळा हंस बनू शकत नाही, त्याचप्रमाणे अशिक्षित व्यक्ती सुशिक्षित लोकांमध्ये शोभून दिसत नाही. म्हणूनच आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे हे पालकांचे कर्तव्य आहे, ज्यामुळे त्यांचा सामाजिक दर्जा उंचावेल.
