Chanakya Niti For Powerful Parenting Lessons : प्रत्येक पालकाची इच्छा असते की, त्यांच्या मुलाने आयुष्यात खूप प्रगती करावी, प्रसिद्धी मिळवावी. आई-वडिलांचे नाव मोठे करावे, सगळ्यांचा आदर करावा. पण, अनेकदा पालक नकळत अशा काही चुका करतात की, त्याचे दुष्परिणाम मुलांवर होतात. दरम्यान, आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ‘चाणक्य नीती’ ग्रंथात अशा काही परिस्थितींचा उल्लेख केला आहे, ज्यात पालक स्वतःच आपल्या मुलांचे सर्वांत मोठे शत्रू कसे बनतात याविषयी भाष्य केले आहे.
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ‘चाणक्य नीती’मध्ये आई-वडिलांच्या कर्तव्यांचे सविस्तर वर्णन केले आहे. दुसऱ्या अध्यायाच्या ११ व्या श्लोकात, त्यांनी आई-वडिलांना त्यांच्या मुलांचे शत्रू म्हटले आहे. त्यांनी मुलांच्या स्थितीची तुलना हंसांच्या थव्यातील एका बगळ्याशी केली आहे.
१. चांगल्या गुणांमधील गुंतवणूक (संस्कृती हीच खरी संपत्ती आहे)
पुत्राश्च विविधैः शीलैर्नियोज्याः सततं बुधैः।
नीतिज्ञाः शीलसम्पन्ना भवन्ति कुलपूजिताः ।।
‘चाणक्य नीती’च्या दुसऱ्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकात असे म्हटले आहे की, जे पालक आपल्या मुलांना (मुलगा आणि मुलगी दोघांनाही) लहानपणापासूनच चांगले गुण आणि नैतिकता शिकवतात, तेच सुज्ञ पालक असतात.
चाणक्यांचा असा विश्वास आहे की, जी मुलं नीतीवान (नियमांचे जाणकार) आणि शिलवान (सदगुणी) असतात, ती केवळ स्वतःच्याच जीवनात यशस्वीच होत नाहीत, तर संपूर्ण कुटुंबालाही अभिमान हेवा वाटावा, असे काम करतात. समाज अशा सदगुणी मुलांची पूजा करतो. म्हणून आपल्या मुलांचे केवळ लाड करू नका; त्यांना शिस्त आणि नैतिकतासुद्धा शिकवा.
२. शिक्षणाचा अभाव हा सर्वांत मोठा शत्रू
माता शत्रु पिता वैरी येन बालो न पाठितः।
न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा ।।
सर्वांत कटू आणि सत्य वचन दुसऱ्या अध्यायातील ११ व्या श्लोकात आहे . चाणक्य म्हणतात की, जे पालक आपल्या मुलांना शिक्षण देत नाहीत, ते त्यांच्याच मुलांचे सर्वांत मोठे शत्रू असतात.
निरक्षर व्यक्तीला विद्वानांच्या मेळाव्यात कधीच आदर मिळू शकत नाही. चाणक्यांनी याची तुलना ‘हंसांच्या थव्यात बसलेल्या बगळ्याशी’ केली आहे. ज्याप्रमाणे बगळा हंसांमध्ये उठून दिसतो आणि क्षुल्लक वाटतो, त्याचप्रमाणे शिक्षण नसलेली व्यक्ती विद्वानांमध्ये हास्यास्पद ठरते. शिक्षण हेच एकमेव शस्त्र आहे, जे मुलाला समाजात ताठ मानेने जगायला शिकवते.
