Chanakya Niti about Silence Power: आचार्य चाणक्य यांना भारताचे सर्वांत ज्ञानी गुरू मानले जाते. त्यांच्या ‘चाणक्य नीती’ या ग्रंथात त्यांनी यशासाठी अनेक मंत्र दिले आहेत. त्यापैकी एक मंत्र म्हणजे कमी बोलणे. आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की, जी व्यक्ती शांत राहते आणि कमी बोलते, ती सर्वांत यशस्वी व्यक्ती बनू शकते. आजकाल असे दिसते की, जे शांत राहतात, त्यांचा प्रभाव जास्त असतो; पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, चाणक्य कमी बोलणाऱ्यांना इतरांपेक्षा अधिक बुद्धिमान आणि ज्ञानी का मानत होते? चला तर मग, चाणक्य नीतीनुसार, जे कमी बोलतात, ते विशेष का असतात आणि कमी बोलण्याचे फायदे काय आहेत, ते समजून घेऊया.
१) कमी बोलल्याने शब्दांचे मूल्य वाढते
चाणक्यांच्या मते, जी व्यक्ती सतत बोलत असते, तिच्याकडे लोक लक्ष देत नाहीत. मात्र, जी व्यक्ती खूप कमी बोलते, ती कधी बोलायला लागली की, लोक तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतात. चाणक्य म्हणतात की, कमी बोलण्यामुळे माणसाच्या शब्दांचे मूल्य वाढते आणि समाजात त्याला अधिक आदर मिळतो.
२) विचारशक्ती वाढवते
चाणक्य नीतीनुसार, जे लोक कमी बोलतात, ते आपल्या बुद्धीचा जास्त वापर करतात. ते प्रतिसाद देण्याची घाई करत नाहीत. ते आधी संपूर्ण परिस्थिती समजून घेतात आणि मग विचारपूर्वक निर्णय घेतात. त्यामुळेच त्यांचे निर्णय अनेकदा योग्य ठरतात आणि समाज त्यांना शहाणे मानतो.
३) आत्मविश्वास येतो
चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य म्हणतात की, जे लोक कमी बोलतात ते स्वतःबद्दल कधीच जास्त मोठेपणा सांगत बसत नाहीत. त्यांना स्वतःवर पूर्ण विश्वास असतो आणि त्यामुळे ते इतरांना प्रभावित करण्यासाठी वायफळ बडबड करत नाहीत. चाणक्य म्हणतात की, हाच शांत स्वभाव त्यांची खरी शक्ती बनतो. जेव्हा तुम्ही कमी बोलता, तेव्हा तुमच्या सीक्रेट गोष्टी कोणाला समजत नाहीत आणि लोक तुमच्याकडे सन्मानपूर्वक पाहतात.
४) इतरांना समजून घेण्याची संधी
आचार्य चाणक्यांच्या मते, कमी बोलण्याचा सर्वांत मोठा फायदा हा आहे की, तुम्हाला इतरांचे ऐकण्याची संधी मिळते. चाणक्यांचा विश्वास होता की, केवळ एक चांगला श्रोताच इतरांच्या कमकुवतपणा आणि गरजा समजू शकतो. जेव्हा तुम्ही शांत राहून इतरांचे ऐकता, तेव्हा तुम्हाला त्यांच्या विचारांची अंतर्दृष्टी मिळते, जी यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
(टीप – वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
