Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्र या ग्रंथात माणसाचं जीवन सोपं करणाऱ्या अनेक नीती सांगितल्या आहेत. या सर्व नीती मानवी जीवनातील विविध पैलूंशी संबंधित आहेत. चाणक्यांच्या नीती आजही तितक्याच महत्त्वाच्या मानल्या जातात.
कठीण काळ असो किंवा अपयशाचा सामना करावा लागत असो, चाणक्यांच्या नीती माणसाला यश मिळवण्याचा आणि जिंकण्याचा आत्मविश्वास देतात. एका नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी सांगितलं आहे की, धन, पत्नी (कुटुंब) आणि स्वतःचं रक्षण यापैकी आधी कोणाची काळजी घ्यावी आणि कोणाला सर्वात जास्त महत्त्व द्यावं. जाणून घेऊया आजची चाणक्य नीती.
श्लोक
आपदर्थे धनं रक्षेद्दारान् रक्षेद्धनैरपि।
आत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि।।
श्लोकाचा अर्थ
चाणक्य नीतीनुसार, संकट किंवा अडचणीच्या काळासाठी धनाची बचत करून ठेवावी. गरज पडल्यास धन खर्च करून पत्नी किंवा कुटुंबाचं रक्षण करावं. मात्र धन आणि कुटुंबापेक्षाही स्वतःचं रक्षण अधिक महत्त्वाचं आहे.
श्लोकाचं सार
आचार्य चाणक्यांच्या मते, प्रत्येकाने संकटाच्या काळासाठी काही ना काही धन साठवून ठेवावं. कारण अडचणी किंवा वाईट परिस्थिती कधी येईल हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे अशा काळात उपयोगी पडण्यासाठी बचत आवश्यक असते.
नीतिशास्त्रानुसार, गरज पडल्यास आपल्या कुटुंबाच्या (पत्नीच्या) रक्षणासाठी धनाचा त्याग करायला मागेपुढे पाहू नये. चाणक्यांचं मत आहे की, कुटुंबाची सुरक्षितता ही धनापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे कुटुंबावर संकट आलं तर धनापेक्षा आधी त्यांचं रक्षण करावं.
आचार्य चाणक्यांच्या मते, जेव्हा स्वतःच्या जीवावर बेतण्याची वेळ येते, तेव्हा स्वतःचं रक्षण सर्वात आधी करावं. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी गरज पडल्यास धन आणि कुटुंबाचाही त्याग करावा लागला, तरी मागे हटू नये. कारण “जान है तो जहान है.”
श्लोक:
आपदर्थे धनं रक्षेच्छ्रीमतां कुत आपदः।
कदाचिच्चलते लक्ष्मीः सञ्चितोऽपि विनश्यति।।
श्लोकाचा अर्थ
चाणक्य नीतीनुसार, संकटाच्या काळासाठी धनाची बचत करावी. “आपण श्रीमंत आहोत, आपल्यावर संकट कसं येईल?” असा विचार करू नये. कारण माता लक्ष्मी चंचल आहेत. त्या कायम एका ठिकाणी राहत नाहीत. साठवलेलं धनही कधी नष्ट होऊ शकतं.
श्लोकाचं सार
चाणक्य नीतीनुसार, प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार थोडं-थोडं धन नक्की साठवावं. अनेकदा ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो, ते “आपल्यावर संकट येणार नाही” असा समज करून घेतात. पण तसं नसतं. संकट कोणावरही, कधीही येऊ शकतं. तसेच माता लक्ष्मीची कृपा कायम राहीलच, याची खात्री नसते. कारण त्यांचा स्वभाव चंचल असल्याने त्या एका ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करत नाहीत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
