Chanakya Niti For Friends And Family : आचार्य चाणक्यांच्या नीतीमध्ये (नीतिमूल्ये) मानसिक शांती आणि यशस्वी जीवनासाठी अनेक महत्त्वपूर्ण सल्ले आहेत. या नीतीमध्ये, आचार्य चाणक्य यात, काही लोक अचानक तुम्हाला का सोडून जातात याची काही कारणं देखील सांगितली आहे. जे लोक कालपर्यंत तुमच्यासाठी नेहमीच हजर असायचे, ते अचानक तुमच्यापासून दूर जातात. जेव्हा असे घडते, तेव्हा आपल्याला दुःख होते आणि असे का घडले हे समजून घेण्यासाठी आपण धडपडतो. जर तुमच्याबरोबरही असे घडले असेल, तर खालील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. लोक अचानक तुम्हाला का सोडून जातात याची काही कारणं समजून घेऊ. एकदा तुम्ही ही कारणे समजून घेतली की, स्वतःला आणि आपल्या नात्यांना सांभाळणे सोपे होईल.

१) नात्यांमध्ये वाढलेला स्वार्थ

आचार्य चाणक्य यांच्या मते, काही नाती केवळ भावनांवरच नव्हे, तर स्वार्थावर आधारित असतात. अशा परिस्थितीत जोपर्यंत गरजेच्या वेळी मदत, लाभ किंवा आधार मिळत राहतो, तोपर्यंत ती व्यक्ती तुमच्याबरोबर राहण्यास तयार असते. मात्र, ज्या दिवशी तुम्ही त्यांची प्रत्येक गोष्ट सांभाळू लागता आणि त्यांना तुमच्याकडून काहीही मिळणे बंद होते, त्या दिवसापासून ते तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. समोरच्या व्यक्तीच्या स्वभावातील हा बदल अचानक वाटू शकतो, पण तो बहुधा खूप आधीच सुरू झालेला असतो.

२) विश्वासाचा अभाव

चाणक्य नीतीनुसार, कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर असतो. जर कोणत्याही कारणास्तव, समोरच्या व्यक्तीला असे वाटले की, तुम्ही त्यांचा विश्वास तोडला आहे, मग ते कितीही लहान असले तरी, तुमचे नाते कमकुवत होऊ लागते. चाणक्यांच्या मते, कधीकधी अगदी लहानसा गैरसमज, अपूर्ण राहिलेले संभाषण किंवा वरवर पाहता सोपे वाटणारे खोटेसुद्धा एका मोठ्या संघर्षात बदलू शकते. चाणक्य म्हणतात की, एकदा नात्यात विश्वास तुटला की, तो पुन्हा निर्माण करणे अत्यंत कठीण ठरू शकते. लोकांनी तुमच्यापासून दूर जाऊ नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा जपला पाहिजे.

३) बदलणारे काळ

आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य कायम सारखे राहत नाही. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या, विचार आणि जीवनातील ध्येये काळानुसार बदलतात. जसजशी तुमच्या आयुष्यात नवीन कामे येतात, नवीन माणसे भेटतात आणि नवीन जबाबदाऱ्या निर्माण होतात, तसतसे जुन्या नात्यांसाठी तुमच्याकडे वेळ कमी उरतो. कधीकधी, इच्छा नसतानाही, माणसे परिस्थितीपुढे हार मानतात आणि एकमेकांपासून दूर जातात.

४) खूप जास्त अपेक्षा ठेवणे

कधीकधी, जेव्हा आपण इतरांकडून अवाजवी अपेक्षा ठेवू लागतो, तेव्हा नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. चाणक्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या मर्यादा असतात आणि ती आपल्या सर्व अपेक्षा कधीच पूर्ण करू शकत नाही. जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा नात्यांमध्ये नाराजी आणि दुरावा वाढतो. चाणक्य नीतीनुसार, जर नाती टिकवायची असतील, तर सर्व अपेक्षांमध्ये संतुलन राखले पाहिजे.

५) सतत नकारात्मक वर्तन किंवा वातावरण

आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या नात्यात वारंवार होणारी भांडणे, रागाने बोललेले शब्द किंवा अपमान असतील, तर अशा नात्यात कोणीही जास्त काळ राहू इच्छित नाही. प्रत्येकाला आदर, शांतता आणि आपलेपणाची भावना हवी असते. जेव्हा नात्यातून हे गुण नाहीसे होऊ लागतात, तेव्हा लोक हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागतात.

(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)