Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात यशस्वी, शांततापूर्ण आणि सूज्ञ जीवन जगण्यासाठी अनेक तत्त्व सांगितली आहेत. ही तत्त्वे अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. प्रत्येक लहान-मोठ्या परिस्थितीवर लगेच प्रतिक्रिया न देणं यावरही त्या ग्रंथात माहिती दिली आहे. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं ही एक वाईट सवय आहे. कधीकधी जेव्हा आपण विचार न करता प्रतिक्रिया देतो, तेव्हा लोक आपल्याचा जज करतात. चाणक्यांच्या मते, सूज्ञ व्यक्ती ती आहे जी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी योग्य वेळ आणि योग्य शब्द निवडते. पण, लहान किंवा मोठ्या गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया दिल्यास काय होते आणि ही सवय चुकीची का मानली जाते याविषयी जाणून घेऊ…

रागाच्या भरात घेतलेले निर्णय

चाणक्य नीतीनुसार, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटते, तेव्हा आपण भावनेच्या भरात पटकन प्रतिक्रिया देतो. यावेळी आपले मन अनेकदा पूर्णपणे शांत नसते आणि हेच एक प्रमुख कारण आहे की, आपण गोष्टींचा नीट विचार करू शकत नाही. रागाच्या भरात काही बोलल्यास नंतर फक्त पश्चात्तापच होतो. आचार्य चाणक्यांच्या मते, रागाच्या भरात तुम्ही दाखवलेला संयम हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी आपले मन पूर्णपणे शांत असल्याची खात्री करा.

नात्यांमध्ये वाढू शकते अंतर

आचार्य चाणक्यांच्या मते, अगदी लहानसहान गोष्टींवरही लगेच प्रतिक्रिया दिल्याने पुढे मोठे वाद निर्माण होऊ शकतात. कधीकधी समोरची व्यक्ती फक्त विनोद करत असते, पण आपण त्याचा चुकीचा अर्थ घेतो. असे केल्याने तुमच्या कौटुंबिक, मैत्रीच्या आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो. मात्र, जर तुम्ही परिस्थिती समजून घेण्यासाठी थोडा वेळ घेतला आणि मग प्रतिसाद दिला, तर तुमचे नातेसंबंध दृढ राहतील.

कमजोरी

चाणक्य नीतीनुसार, जर एखादी व्यक्ती प्रत्येक लहानसहान गोष्टीवर रागावते किंवा पटकन प्रतिक्रिया देते, तर इतरांच्या ही सवय लक्षात येते, यामुळे लोक कधीकधी मुद्दाम तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आचार्य चाणक्यांच्या मते, शहाणा माणूस नेहमी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो. प्रत्येक लहानसहान गोष्टीवर प्रतिक्रिया न देणे हे तुमचे सामर्थ्य आणि परिपक्वता दर्शवते.

मानसिक शांतीला धक्का

आचार्य चाणक्यांच्या मते, जर तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली आणि प्रत्येक लहानसहान गोष्टीला प्रतिसाद देण्याची गरज वाटू लागली तर तुमचे मन सतत अस्वस्थ होते. या सवयीमुळे तणाव, चिंता आणि चिडचिड वाढते. जेव्हा तुम्ही लहानसहान गोष्टींवर लक्ष केंद्रित करू लागता, तेव्हा तुम्ही मोठे मोठे आनंदही गमावून बसता. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. जेव्हा तुम्ही असे करता, तेव्हा तुमचे मन शांत आणि आनंदी होते.

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)