Chanakya Niti for Habit Change : आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील सर्वांत ज्ञानी आणि बुद्धिमान पुरुषांपैकी एक म्हणून ओळखले जातात. असे म्हटले जाते की, जर तुम्हाला यशस्वी, समृद्ध आणि आनंदी जीवन हवे असेल, तर तुम्ही त्यांच्या शिकवणींचे पालन केले पाहिजे. त्यांच्या नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतात. या नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अशा काही सवयींचाही उल्लेख केला आहे, ज्या कोणत्याही व्यक्तीने आपले उत्पन्न वाढविण्यापूर्वी बदलल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही या सवयी सुधारता, तेव्हा तुमचा पैसा तुमच्याकडे टिकून राहील आणि तुम्हाला जीवनात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही.

पण जर तुम्ही या सवयी सुधारल्या नाहीत, तर तुम्ही लाखो रुपये कमावले तरी ते कधीच टिकणार नाहीत. त्यामुळे या सवयी कोणत्या ते जाणून घेऊ… (Chanakya Niti – Tips and Advice for Daily Life)

१) वेळ वाया घालवण्याची सवय

आचार्य चाणक्यांच्या मते, तुमचा वेळ हीच तुमची सर्वांत मोठी संपत्ती आहे. त्यामुळे जो कोणी वेळेला महत्त्व देत नाही, तो आयुष्यात कधीही मोठे यश मिळवू शकत नाही किंवा पैसे कमवू शकत नाही. जर तुम्ही दिवसभर नियोजन न करता, वेळ वाया घालवत असाल, तर ही सवय सुधारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या वेळेचा सदुपयोग करणे हे तुमचे उत्पन्न वाढविण्याचे पहिले पाऊल आहे. जेव्हा तुम्ही कोणतेही काम योग्य वेळी करायला शिकता, तेव्हा तुमची उत्पादकता आपोआप वाढते.

२) उधळपट्टी करण्याची सवय

लोक अनेकदा आपले उत्पन्न वाढवण्याआधीच निरुपयोगी वस्तूंवर पैसे खर्च करण्याची चूक करतात. आचार्य चाणक्यांच्या मते, पैसे कमावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते वाचवणेही महत्त्वाचे आहे. जर पैसा तुमच्या हातात राहिला नाही, तर उत्पन्न वाढवून काहीही फायदा होणार नाही. निरुपयोगी वस्तूंवर पैसे खर्च करणे, दिखावा करणे आणि अनावश्यक खरेदी करणे या सर्वांमुळे पैशाचा अपव्यय होतो. आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही यावर नेहमी नियंत्रण ठेवले पाहिजे.

३) आळशीपणाची सवय

तुमच्या यशाचा सर्वांत मोठा शत्रू तुमचा स्वतःचा आळस आहे. चाणक्य नीतीनुसार, जे अथक परिश्रम करतात, तेच जीवनात प्रगती करू शकतात. जर तुम्ही प्रत्येक काम पुढे ढकलणारे किंवा कष्टापासून दूर पळणारे असाल, तर तुमचे उत्पन्न कधीच वाढणार नाही. तुम्ही सर्वप्रथम तुमची रोजचं रुटीन सुधारा आणि कठोर परिश्रमाची सवय लावून घ्या. जेव्हा तुम्ही छोटी कामेसुद्धा योग्य वेळी पूर्ण कराल, तेव्हा तुम्हाला दीर्घकाळात उत्कृष्ट परिणाम मिळतील.

४) वाईट संगतीपासून दूर राहा

तुम्ही कोणत्या प्रकारच्या लोकांच्या संगतीत राहता, याचा थेट परिणाम तुमच्या विचार आणि कमाईवर होतो. चाणक्य नीतीनुसार, तुमची संगत तुमचे भविष्य ठरवते. जर तुम्ही तक्रार करणाऱ्या, कष्टापासून दूर पळणाऱ्या किंवा नकारात्मक विचार बाळगणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिलात, तर तुमची प्रगती लवकरच थांबेल. म्हणून पैसे कमावण्यापूर्वी आपली संगत सुधारणे आणि तुम्हाला कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त करणाऱ्या लोकांच्या सान्निध्यात राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)