Chandra Grahan Date and Time 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य व चंद्र ग्रहणांचा प्रभाव केवळ वैयक्तिक जीवनापुरता मर्यादित नसून सामाजिक, नैसर्गिक आणि जागतिक घडामोडींशीही जोडला जातो. प्रत्येक ग्रहणाला धार्मिक तसेच ज्योतिषीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्व दिलं जातं. वर्ष २०२६ मधील पहिलं चंद्रग्रहण पूर्णिमेच्या दिवशी लागणार असून, याच दिवशी होलिका दहनाचाही योग आहे. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण शनीच्या स्वामित्वाखालील कुंभ राशीत होणार आहे.

चंद्रग्रहण म्हणजे काय (What is Lunar Eclipse)

जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि त्या खगोलीय घटनेला चंद्रग्रहण म्हटलं जातं. वैदिक पंचांगानुसार ही घटना अशुभ मानली जाते. त्यामुळे ग्रहणाच्या काळात कोणतीही शुभ किंवा मंगल कार्ये टाळण्याची परंपरा आहे.

चंद्रग्रहणाची तारीख आणि वेळ (Chandra Grahan Date and Time 2026)

पंचांगानुसार ३ मार्च २०२६ रोजी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण सायंकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी सुरू होऊन ६ वाजून ४५ मिनिटांपर्यंत राहील. हे ग्रहण भारतातून स्पष्टपणे दिसणार असल्याने धार्मिक मान्यतेनुसार त्याचा सूतक काळही ग्राह्य धरला जाईल. भारतासह युरोप, आशिया, उत्तर व दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतील काही भागांमध्येही हे ग्रहण पाहता येणार आहे.

कुंभ राशीतील चंद्रग्रहणाचा प्रभाव (Impact of Lunar Eclipse in Aquarius)

हे चंद्रग्रहण सुर्याच्या सिंह राशीत असल्यामुळे त्याचा प्रभाव सामाजिक व्यवस्था, प्रशासन, तंत्रज्ञान आणि सामूहिक निर्णयप्रक्रियांवर अधिक जाणवू शकतो, असं ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.

सूतक काळ कधी सुरू होईल (Sutak Kaal Timing)

धार्मिक परंपरेनुसार चंद्रग्रहणापूर्वी सूतक काळ पाळला जातो. ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांपासून सूतक काळ सुरू होईल. या काळावधीत देवपूजा, हवन, धार्मिक विधी किंवा कोणत्याही नव्या कार्याची सुरुवात करणं वर्ज्य मानलं जातं.

चंद्रग्रहण काळातील धार्मिक नियम (Religious Rules During Lunar Eclipse)

चंद्रग्रहण आणि सूतक काळात अन्नग्रहण टाळावं, अशी मान्यता आहे. या काळात चाकू, सुई, कात्री यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करणं निषिद्ध मानलं जातं. नखं कापणं, केस कापणंही अशुभ समजलं जातं. ग्रहणाच्या वेळी मंदिरांमध्ये पूजा केली जात नाही आणि घरातील देवघराचे दरवाजे बंद ठेवण्याची परंपरा आहे. तसेच या काळात ब्रह्मचर्य पाळण्यावर भर दिला जातो.

धार्मिक श्रद्धा आणि आधुनिक दृष्टिकोन (Faith and Modern Perspective)

आजच्या काळात विज्ञानाने ग्रहणांची अचूक माहिती दिली असली, तरी भारतीय संस्कृतीत ग्रहणांशी निगडित धार्मिक संकेत आणि परंपरा अजूनही पाळल्या जातात. अनेकजण याकडे मानसिक शुद्धता आणि आत्मसंयमाचा काळ म्हणून पाहतात.

टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.