Chandra Grahan 2026: हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. पंचांगानुसार (आज) ०३ मार्च २०२६ रोजी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण दुपारी ०३ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल ६ वाजून ४५ मिनिटांपर्यंत राहील. भारतामध्ये चंद्रोदय ०५ वाजून ५९ मिनिटांनी होईल. हे चंद्रग्रहण पूर्णपणे भारतात दिसणार नाही. कारण- ग्रहणाचा बराचसा भाग तेव्हा होईल, जेव्हा भारतात चंद्र उगवलेला नसेल. म्हणून भारतातील लोकांना या ग्रहणाचा फक्त शेवटचा टप्पा (अंतिम भाग) पाहता येईल. भारतामध्ये बहुतेक ठिकाणी चंद्र सायंकाळी सुमारे ६:१० ते ६:२० च्या दरम्यान उगवतो. त्यामुळे सूर्यास्तानंतर थोड्या वेळासाठी ग्रहणाचा शेवटचा भाग दिसू शकतो. विशेषतः पूर्व भारत आणि ईशान्य राज्यांमध्ये ते जास्त स्पष्टपणे दिसण्याची शक्यता आहे.
चंद्र ग्रहणात काय करायला हवं?
- चंद्र ग्रहणात देवांच्या मंत्र, स्तोत्रांचे पठण केल्याने त्याचे फळ अनेक पटींने वाढते. त्यामुळे या काळात तुम्ही श्री विष्णूंच्या आणि चंद्राच्या मंत्रांचा जप करू शकता. यामुळे चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभावही आयुष्यावर पडत नाही.
- तसेच या काळात तुम्ही महामृत्यूंजय या मंत्राचादेखील जप करू शकता, या मंत्राचा जप केल्याने तुमच्यासह तुमच्या कुटुंबातील व्यक्तिंना सुख-समाधान आणि दीर्घायुष्य प्राप्त होईल.
- चंद्रग्रहणात पिण्याच्या पाण्यात आणि अन्नात तुळशीचे पाण टाकावे.
- चंद्रग्रहण समाप्त झाल्यावर अंघोळ करून घरात गंगाजल शिंपडावे.
- चंद्रग्रहणानंतर गरीब-गरजूंना अन्न दान करू शकता.
चंद्र ग्रहणात ‘या’ गोष्टी करू नये
- चंद्र ग्रहणात देवी-देवतांची पूजा करू नये तसेच मूर्तीला स्पर्श करू नये.
- या काळात अन्न ग्रहण करू नये.
- नवीन वस्तूंची खरेदी करू नये.
- धारदार वस्तूंचा वापर करू नये.
- गर्भवती महिलांनी घरातून बाहेर जाऊ नये.
- या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
