Most Revengeful Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रात ९ ग्रह आणि १२ राशी यांचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंध मानला जातो. प्रत्येक राशीवर तिच्या स्वामी ग्रहाचा विशेष प्रभाव असतो. प्रत्येक राशीच्या लोकांचा स्वभाव वेगळा असतो आणि त्यामुळे ते इतर राशीच्या लोकांपेक्षा वेगळे ठरतात. काही लोक शांत असतात, तर काहींचा स्वभाव रागीट असतो. त्याचप्रमाणे काही राशीचे लोक असेही असतात की ते बदला घेतल्याशिवाय शांत बसत नाहीत. कधी ना कधी ते आपल्या शत्रूला धडा शिकवतात.
तर काही राशीच्या लोकांचा स्वभाव खूपच उग्र असतो, तर काही लोक शांत असतात. या लेखात आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की, कोणत्या ३ राशीचे लोक बदला घेण्यापासून कधीही मागे हटत नाहीत आणि योग्य वेळ येताच आपल्या शत्रूला धडा शिकवून बदला पूर्ण करतात.
वृषभ रास
शुक्र ग्रहाच्या स्वामित्वाखाली असलेल्या वृषभ राशीचे लोक सामान्यतः शांतपणे आयुष्य जगतात, संयमाने वागतात आणि शक्य तितके वाद टाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जर कोणी त्यांना कमकुवत समजून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का दिला किंवा त्यांचे नुकसान केले, तर हे लोकही समोरच्याला चांगलाच धडा शिकवतात. अनेक वर्षांपूर्वी झालेला अपमानही ते विसरत नाहीत आणि योग्य वेळी त्याचा पूर्ण हिशोब चुकता करतात.
सिंह रास
सूर्य ग्रहाच्या स्वामित्वाखाली असलेल्या सिंह राशीचे लोक राजासारखे आयुष्य जगणे पसंत करतात आणि त्यांना स्वतःच्या स्वाभिमानाची खूप जाणीव असते. त्यांच्या अहंकाराला धक्का लागला किंवा कोणासमोर झुकावे लागले, तर ते त्यांना अजिबात आवडत नाही. कोणी त्यांची थट्टा करून निघून गेले, तर ही गोष्ट ते सहज विसरत नाहीत आणि प्रत्येक अपमानाचा बदला घेतात. आपल्या शत्रूवर वर्चस्व गाजवत आणि आक्रमकपणे ते आपला बदला पूर्ण करतात.
वृश्चिक रास
मंगळ ग्रहाच्या स्वामित्वाखाली असलेल्या वृश्चिक राशीचे लोक रहस्यमय आणि जिद्दी स्वभावाचे असतात. त्यांच्या मनात काय सुरू आहे, हे सहज कोणालाही समजत नाही. मात्र, जर कोणी त्यांना नात्यात फसवले, त्यांचा अपमान केला किंवा कोणत्याही प्रकारे त्यांचे नुकसान केले, तर हे लोक ती गोष्ट सहज माफ करत नाहीत. योग्य वेळेची वाट पाहून आणि पूर्ण तयारीनिशी ते आपला बदला घेतात. इतकेच नाही, तर समोरच्याला असा धडा शिकवतात की पुन्हा त्यांच्याशी वाद घालण्याचा विचारही तो करत नाही.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
