Dhanteras 2026 5 Affordable Things to Buy Instead of Gold: दिवाळीचा सण जवळ आला की, घराघरांत उत्साहाचे वातावरण निर्माण होते. दिवाळीच्या तयारीसोबतच अनेकांना प्रतीक्षा असते, ती धनत्रयोदशीची! दिवाळीच्या दोन दिवस आधी साजरा केला जाणारा हा सण यंदा ६ नोव्हेंबर २०२६ रोजी, शुक्रवारी आहे. धनत्रयोदशीपासूनच दिवाळीच्या सणाला सुरुवात होते, अशी परंपरा आहे. या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर देवतेची पूजा केली जाते.
धनत्रयोदशी म्हटलं की, अनेकांच्या डोळ्यांसमोर सोनं, चांदी, नवीन वाहनं किंवा महागड्या वस्तूंची खरेदी येते. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जात असल्यानं बाजारपेठांमध्येही मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, प्रत्येकालाच सोनं-चांदी खरेदी करणं शक्य होतं, असं नाही. सध्याच्या महागाईच्या काळात अनेक जण बजेटचा विचार करूनच खरेदी करतात; पण त्यामुळे तुम्हाला धनत्रयोदशीचा आनंद घेता येणार नाही, असं अजिबात नाही.
धार्मिक परंपरेनुसार या दिवशी काही कमी किमतीच्या वस्तूंची खरेदीही शुभ मानली जाते. त्यामुळे मोठा खर्च करण्याऐवजी आपल्या बजेटनुसार या पाच वस्तूंचा खरेदीसाठी विचार करू शकता.
१. पितळ आणि तांब्याची भांडी
धनत्रयोदशीला सोनं-चांदी खरेदी करणं शक्य नसेल, तर पितळ किंवा तांब्याची एखादी छोटी वस्तू खरेदी करू शकता. धार्मिक परंपरेत या धातूंना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी पितळेची वाटी, तांब्याचा लोटा, ताट किंवा पूजेसाठी लागणारी भांडी खरेदी करण्याचा पर्याय निवडता येतो. विशेष म्हणजे या वस्तूंचा पुढे दैनंदिन वापरही करता येतो.
२. फुलांची किंवा गवताची झाडू
धनत्रयोदशीच्या खरेदीमध्ये झाडूलाही महत्त्व दिलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार झाडूचा संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो. त्यामुळे या दिवशी नवीन झाडू खरेदी करण्याची परंपरा काही ठिकाणी पाहायला मिळते. तुम्हीही घराच्या स्वच्छतेसाठी फुलांची झाडू किंवा गवताची झाडू खरेदी करू शकता. त्यासाठी फार मोठा खर्च करण्याचीही गरज नाही.
३. लक्ष्मी-गणेशाची मूर्ती
दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असतं. सुख-समृद्धी आणि मंगल कार्यासाठी देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी-गणेशाची छोटी मूर्ती खरेदी करू शकता. मातीची, पितळेची किंवा आपल्या बजेटनुसार उपलब्ध असलेली मूर्ती निवडता येईल. दिवाळीच्या पूजेसाठी ही खरेदी उपयोगी ठरू शकते.
४. गोमती चक्र आणि कवड्या
धार्मिक परंपरेमध्ये गोमती चक्र आणि कवड्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. काही घरांमध्ये या वस्तू लक्ष्मीपूजनाच्या वेळी पूजेत ठेवल्या जातात. धनत्रयोदशीच्या दिवशीही त्यांची खरेदी करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यानंतर काही जण या वस्तू लाल कापडात बांधून तिजोरीत किंवा देवघरात ठेवतात. मात्र, हा धार्मिक श्रद्धा आणि परंपरेचा भाग असल्यामुळे त्यापासून आर्थिक लाभ निश्चित होतो, असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
५. अख्खे धणे खरेदी करा
धनत्रयोदशीच्या खरेदीमध्ये अख्ख्या धण्यांचाही समावेश केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार अख्खे धणे देवी लक्ष्मीला अर्पण करण्याची परंपरा आहे. पूजेनंतर काही जण हे धणे मातीत पेरतात. धणे हे समृद्धी आणि चांगल्या पिकाचे प्रतीक मानले जाते. ही परंपरा पाळायची असल्यास अगदी कमी खर्चात अख्खे धणे खरेदी करू शकता.

खरेदी करताना बजेटचा विचार करा!
धनत्रयोदशी हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्याचा आहे. त्यामुळे केवळ शुभ मानलं जातं म्हणून महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक ताण घेऊ नका. आपल्या गरजा आणि बजेटनुसार छोटी खरेदी करणंही पुरेसं आहे. या दिवशी वस्तू खरेदी करण्यामागे धार्मिक श्रद्धा आणि परंपरा असल्या तरी कोणतीही वस्तू खरेदी केल्यानं धनलाभ होण्याची हमी नसते. त्यामुळे सणाचा आनंद घ्या आणि आर्थिक नियोजनालाही तितकंच महत्त्व द्या.
(टीप : या बातमीतील माहिती धार्मिक परंपरा आणि प्रचलित मान्यतांवर आधारित आहे. कोणत्याही वस्तूच्या खरेदीमुळे धनप्राप्ती किंवा आर्थिक समृद्धी निश्चित होते, असा दावा नाही.)
