Dhanu August Rashibhavishya 2026: धनु राशीचा स्वामी गुरू आहे. अधिकारप्रिय, सात्विक वृत्ती, न्यायी, उत्साही असे गुरुचे अनेक गुण धनु राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. आपण कर्तव्यतत्पर आहात. आशावादी आणि आनंदी वृत्ती असलेली धनु रास मर्यादशील आणि प्रामाणिक असते. समाजसेवेची आपणास विशेष आवड असते. आपण दिलदार, उदार आहात. आपणास ज्ञानलालसा असते. सर्वांना घेऊन पुढे जाणाऱ्या या धनु राशीला ऑगस्ट महिना कसा जाईल याचा आढावा घेऊया.
वर्षभरातील महत्वाच्या ग्रहांचे राशी बदल असे आहेत (Sagittarius August Horoscope 2026)
यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल वृषभ राशीत असेल. नेपच्यून आणि शनी चतुर्थातील मीन राशीतून भ्रमण करतील. द्वितीयातील मकरेतून प्लूटो भ्रमण करेल. सप्तमातील मिथुनेतून गुरू भ्रमण करेल. गुरुबल चांगले आहे. १ जूनला गुरू अष्टमातील कर्क राशीत प्रवेश करेल.
गुरू जरी उच्च राशीत असला तरी गुरुबल थोडे कमजोर होईल. पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू जेव्हा भाग्यातील सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा गुरुबल चांगले मिळेल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे द्वितीयातील मकरेत आणि अष्टमातील कर्क राशीत प्रवेश करतील.
धनु राशीचे ऑगस्ट महिन्याचे राशीभविष्य (Sagittarius Horoscope August 2026)
सणवारांचा हा महिना आपल्या उत्साहाला सतत खुणावेल. नव्या जोमाने कामाला लागाल. विद्यार्थी वर्ग अभ्यासासह कला, क्रीडा, साहित्यात नाव चमकवेल. हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला यशाची झालर शोभून दिसेल. नवीन विषयाचे आकलन चटकन होईल. नोकरी व्यवसायात रक्षाबंधनाच्या सुमारास मोठी उलाढाल होईल.
एकंदरीत आपल्यासाठी ही गोष्ट लाभकारक असेल. विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन आनंददायी असेल. एकमेकांच्या विचारांचा, मतांचा आदर केल्याने उत्तम सूर जुळतील. अभ्यासपूर्वक गुंतवणूकीमुळे आर्थिक भार पडणार नाही. आर्थिक नियोजन चांगले करता येईल. घर खरेदी, वाहन खरेदी याबाबत योग्य निर्णय घ्याल. उत्साहाच्या भरात केलेल्या कामांचा आनंद टिकवण्यासाठी विश्रांती गरजेची आहे.. शारीरिक आणि वैचारिक देखील.
– ज्योतिषी सोनल चितळे
