Dhanu June Rashibhavishya 2026: धनु राशीचा स्वामी गुरू आहे. अधिकारप्रिय, सात्विक वृत्ती, न्यायी, उत्साही असे गुरुचे अनेक गुण धनु राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. आपण कर्तव्यतत्पर आहात.

आशावादी आणि आनंदी वृत्ती असलेली धनु रास मर्यादशील आणि प्रामाणिक असते. समाजसेवेची आपणास विशेष आवड असते. आपण दिलदार, उदार आहात. आपणास ज्ञानलालसा असते. चला तर मग, सर्वांना घेऊन पुढे जाणाऱ्या या धनु राशीला जून महिना नेमका कसा जाईल याचा आढावा घेऊया.

वर्षभरातील महत्वाच्या ग्रहांचे राशी बदल असे आहेत… (Sagittarius June Horoscope 2026)

यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल वृषभ राशीत असेल. नेपच्यून आणि शनी चतुर्थातील मीन राशीतून भ्रमण करतील. द्वितीयातील मकरेतून प्लूटो भ्रमण करेल. सप्तमातील मिथुनेतून गुरू भ्रमण करेल. गुरुबल चांगले आहे.

१ जूनला गुरू अष्टमातील कर्क राशीत प्रवेश करेल. गुरू जरी उच्च राशीत असला तरी गुरुबल थोडे कमजोर होईल. पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू जेव्हा भाग्यातील सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा गुरुबल चांगले मिळेल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे द्वितीयातील मकरेत आणि अष्टमातील कर्क राशीत प्रवेश करतील.

धनु राशीचे जून महिन्याचे राशीभविष्य (Sagittarius Horoscope June 2026)

१ जूनला गुरू अष्टमातील कर्क राशीत प्रवेश करेल. आठव्या गुरुचे गुरुबल कमजोर असले तरी कर्क राशीतील गुरू उच्चीचा असल्याने त्याचे अप्रत्यक्ष पाठबळ मिळेल. विद्यार्थी वर्गाच्या कष्टाचे चीज होईल. अभ्यासावरील लक्ष अबाधित राहील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची तयारी कराल.

नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने श्रेष्ठ, प्रसिद्ध व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. जीवनात नवा मार्ग सापडेल. विवाहित दाम्पत्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल. घर खरेदी, जागेचे व्यवहार यांना गती मिळेल. गुंतवणूकदारांनी फसव्या आश्वासांनावर विश्वास ठेवू नये. मोठी आर्थिक उलाढाल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. खांदे, दंड आणि कंबर यांचे स्नायू आखडतील.

– ज्योतिषी सोनल चितळे