Dhanu Horoscope March: धनु राशीचा स्वामी गुरू आहे. अधिकारप्रिय, सात्विक वृत्ती, न्यायी, उत्साही असे गुरुचे अनेक गुण धनु राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. आपण कर्तव्यतत्पर आहात. आशावादी आणि आनंदी वृत्ती असलेली धनु रास मर्यादशील आणि प्रामाणिक असते. समाजसेवेची आपणास विशेष आवड असते. आपण दिलदार, उदार आहात. आपणास ज्ञानलालसा असते. सर्वांना घेऊन पुढे जाणाऱ्या या धनु राशीला येणारा मार्चचा महिना कसा जाईल याचा आढावा घेऊया.
वर्षभरातील महत्वाच्या ग्रहांचे राशी बदल असे आहेत… (Sagittarius March Horoscope)
यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल वृषभ राशीत असेल. नेपच्यून आणि शनी चतुर्थातील मीन राशीतून भ्रमण करतील. द्वितीयातील मकरेतून प्लूटो भ्रमण करेल. सप्तमातील मिथुनेतून गुरू भ्रमण करेल. गुरुबल चांगले आहे.
१ जूनला गुरू अष्टमातील कर्क राशीत प्रवेश करेल. गुरू जरी उच्च राशीत असला तरी गुरुबल थोडे कमजोर होईल. पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू जेव्हा भाग्यातील सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा गुरुबल चांगले मिळेल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे द्वितीयातील मकरेत आणि अष्टमातील कर्क राशीत प्रवेश करतील.
धनु राशीसाठी असा असेल मार्च महिना…
मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने नवा उत्साह निर्माण होईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. विद्यार्थीवर्गाला स्वतःच्या क्षमतेची मर्यादा समजेल. त्यानुसार अधिक मेहनत घ्याल. उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी किंवा परदेशी जाण्याचे योग येतील. मनाजोगता अभ्यासक्रम शिकता येईल.
नोकरी व्यवसायात कार्यप्रणालीमध्ये काही बदल होतील. या बदलांचा स्वीकार करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. विवाहोत्सुक मुलामुलींच्या विवाहाच्या चर्चांना जोर येईल. मित्रमंडळी पुढाकार घेतील. विवाहित दाम्पत्यांच्या प्रश्नांना उत्तरे सापडतील. नातेवाईकांची मदत होईल. संतान प्राप्तीच्या प्रयत्नांना यश मिळेल. गुंतवणूकीचा उत्तम परतावा मिळेल. शाश्वत गुंतवणूक, दीर्घकालीन गुंतवणूक विशेष लाभदायक ठरेल.
– ज्योतिषी सोनल चितळे
