Dhanu September Rashibhavishya 2026: धनु राशीचा स्वामी गुरू आहे. अधिकारप्रिय, सात्विक वृत्ती, न्यायी, उत्साही असे गुरुचे अनेक गुण धनु राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. आपण कर्तव्यतत्पर आहात. आशावादी आणि आनंदी वृत्ती असलेली धनु रास मर्यादशील आणि प्रामाणिक असते. समाजसेवेची आपणास विशेष आवड असते. आपण दिलदार, उदार आहात. आपणास ज्ञानलालसा असते. सर्वांना घेऊन पुढे जाणाऱ्या या धनु राशीला सप्टेंबर महिना कसा जाईल याचा आढावा घेऊया.
वर्षभरातील महत्वाच्या ग्रहांचे राशी बदल असे आहेत… (Sagittarius September Horoscope 2026)
यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल वृषभ राशीत असेल. नेपच्यून आणि शनी चतुर्थातील मीन राशीतून भ्रमण करतील. द्वितीयातील मकरेतून प्लूटो भ्रमण करेल. सप्तमातील मिथुनेतून गुरू भ्रमण करेल. गुरुबल चांगले आहे.
१ जूनला गुरू अष्टमातील कर्क राशीत प्रवेश करेल. गुरू जरी उच्च राशीत असला तरी गुरुबल थोडे कमजोर होईल. पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू जेव्हा भाग्यातील सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा गुरुबल चांगले मिळेल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे द्वितीयातील मकरेत आणि अष्टमातील कर्क राशीत प्रवेश करतील.
धनु राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशिभविष्य (Sagittarius Horoscope September 2026)
कृष्ण जन्माष्टमी आर्थिक लाभ देणारी आहे. तर गणेशोत्सव उत्साह आणि आनंद देणारा असेल. विद्यार्थी वर्ग सांस्कृतिक माध्यमातून आयोजन, नियोजन, तंत्रज्ञान यांचे प्रत्यक्ष धडे घेईल. अभ्यासावरील लक्ष ढळू देऊ नका. परदेशी शिक्षणाचे प्रयत्न सुरू ठेवा. नोकरी व्यवसायात नाविन्यपूर्ण संकल्पना अमलात आणाल. वरिष्ठांच्या सल्ल्याने हिरीरीने आगेकूच कराल. त्यांचा विश्वास सार्थ ठरवाल.
विवाहित मंडळींच्या मागण्या पूर्ण होतील. सुख स्वप्ने आकार घेतील. गुंतवणूकदारांनी थोडा ब्रेक लावावा. अपेक्षित परतावा मिळण्यासाठी वाट बघावी लागेल. जमिनीच्या कागदपत्रांसाठी कोर्टाची मदत घ्यावी लागेल. व्यवहार पारदर्शक असावा. लघवीचे विकार सतावतील. ओटीपोटाचे दुखणे आटोक्यात ठेवावे.
-सोनल चितळे
