Ganesh Chaturthi 2026 Date : “गणपती बाप्पा मोरया…” च्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने अवघा महाराष्ट्र दुमदुमून जाण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला आपल्या लाडक्या बाप्पाचे घरोघरी आणि थाटामाटात सजलेल्या मंडपांमध्ये आगमन होते. संपूर्ण १० दिवस भक्तिमय वातावरणात रंगणाऱ्या या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाने होते. तुम्हीही यंदा बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असाल, तर २०२६ मधील गणेश चतुर्थीची अचूक तारीख, मूर्ती स्थापनेची वेळ आणि विसर्जनाची तारीख खालीलप्रमाणे नक्की जाणून घ्या.
गणेश चतुर्थी २०२६ तारीख (Ganesh Chaturthi 2026 Date)
पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७:०६ वाजता सुरू होईल. चतुर्थी तिथी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७:४४ वाजता संपेल. उदयतिथीनुसार, गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर, २०२६ रोजी साजरी केली जाईल. १० दिवसांचा गणेशोत्सव १४ सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि अनंत चतुर्दशीपर्यंत चालेल. अनंत चतुर्दशी २५ सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल.
णपतीच्या स्थापनेसाठी शुभ मुहूर्त (Ganesh Chaturthi Ganpati Sthapana Muhurat)
गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना आणि पूजा करण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११:२० ते दुपारी १:४८ ही सर्वोत्तम दुपारची वेळ असेल. या वेळेत, भक्त योग्य विधींसह आपल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करू शकतात. धार्मिक मान्यतेनुसार, गणपतीचा जन्म दुपारच्या वेळी झाला होता. त्यामुळे, जर तुम्ही गणेश चतुर्थीला घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करणार असाल, तर ती याच शुभ मुहूर्तावर करु शकता.
गणेश चतुर्थीचे महत्त्व (Ganesh Chaturthi 2026 Important)
हिंदू धर्मात, गणपतीला सर्वात आधी पूजले जाणारे दैवत मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. गणपती बाप्पा हा बुद्धी, सुख आणि समृद्धी देणारा देवता आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या मध्यान्ह काळात जन्माला आलेल्या श्री गणेशाची या मुहूर्तावर पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होते. बाप्पाची उपासना केल्याने आयुष्यातील सर्व संकटे आणि अडचणी दूर होऊन सुख-समृद्धी लाभते.
गणेश चतुर्थी पूजा विधी (Ganesh Chaturthi Puja Vidhi 2026)
गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वप्रथम पूजेची जागा स्वच्छ करून चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे आणि त्यावर अक्षता ठेवून बाप्पाची मूर्ती विराजमान करावी. त्यानंतर दिवा लावून पूजेचा संकल्प करावा आणि ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करत बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करावी. मूर्तीला जानवे, हळद-कुंकू, अक्षता, अष्टगंध आणि लाल जास्वंदीचे फूल वाहावे; तसेच गणपतीला अत्यंत प्रिय असणारी २१ दुर्वांची जुडी अर्पण करावी. यानंतर धूप-दीप दाखवून बाप्पाला २१ मोदक किंवा लाडूंचा नैवेद्य दाखवावा आणि संपूर्ण कुटुंबासह मनोभावे आरती करून पूजेत झालेल्या चुकांसाठी क्षमा मागून सुख-समृद्धीची प्रार्थना करावी.
