ganesh chaturthi 2026 shubh muhurat : ‘ताशाचा आवाज तारारारा झाला र, गणपती माझा नाचत आला…’ असं म्हणत आता लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. येत्या सोमवारी, १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहेत, त्यामुळे घराघरांत आणि सार्वजनिक मंडपांमध्ये सजावटीची तयारी जोरात सुरू आहे.
जर यंदा पहिल्यांदाच तुमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार असतील किंवा गणपती बाप्पांची स्थापना कशी करायची, स्थापना मुहूर्त कोणता आणि पूजा कशी करायची याबाबत तुमच्या मनात प्रश्न असतील, तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत नक्की वाचा.
शुभ मुहूर्त (Ganesh Chaturthi 2026 Date Shubh Muhurat)
पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ४३ मिनिटांनी संपेल.
बाप्पाच्या स्थापनेसाठी शुभ वेळ (Ganesh Chaturthi 2026 Murti Sthapana Shubh Time)
भारतातील कोट्यवधी घरात गणपती बाप्पाची मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना केली जाते, तर गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना आणि पूजेसाठी सर्वोत्तम वेळ १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून २१ मिनिटांनी सुरू होईल ते दुपारी १ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असणार आहे. या काळात भक्त योग्य विधी करून आपल्या घरी गणपतीची मूर्ती स्थापित करू शकतात.
गणेश चतुर्थीला कोणते शुभ योग तयार होणार? (Ganesh Chaturthi 2026 Shubh Yog)
पंचांगानुसार, गणेश चतुर्थीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी रवी योग, इंद्र योग आणि ब्रह्म योग तयार होत आहेत.
आता राहिला प्रश्न गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करायची; तर त्याबद्दलही सविस्तर जाणून घेऊयात…
गणपती पूजन पूर्वतयारी कशी करावी?
गणपती बाप्पाची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांची डहाळी, सुपाऱ्या, पाच फळे, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, कुंकू-हळद, अगरबत्ती, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी.
१. गणपती बाप्पांना घरी आणल्यानंतर त्यांची मूर्ती तयार केलेल्या मखरात ठेवा.
२. मग बाप्पाच्या मूर्तीपुढे किंवा एक टेबल घेऊन त्यावर एका ताम्हणामध्ये अक्षता, ३ पोफळे (सुपारी) ठेवावीत आणि हात जोडून, डोळे बंद करून ‘ॐ गं गणपतये नमः।’ म्हणा.
३. अक्षता ठेवलेल्या ताम्हणामधील ३ पोफळे दुसऱ्या ताम्हणामध्ये ठेवून त्यावर अभिषेक करावा आणि त्यावेळेस संपूर्ण अथर्वशीर्ष म्हणावे. (अभिषेक करताना प्रथम पंचामृत, मग सुगंधित जल आणि शेवटी पाण्याने अभिषेक करावा).
४. तिन्ही पोफळे स्वच्छ पुसून, पुन्हा अक्षतांच्या ताम्हणामध्ये ठेवावीत आणि “एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजम् । पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ।। श्रीसिद्धिविनायकाय नमः । आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि।” हा मंत्र एकदा म्हणावा.
५. मधल्या पोफळास अष्टगंध व बाजूच्या दोन्ही पोफळाला आणि गणपती बाप्पाला हळद-कुंकू वाहावे आणि “अष्टगन्धसमायुक्तं सुगन्धद्रव्यसंयुतम् । श्रीगन्धं गणाध्यक्ष स्वागतार्थं प्रतिगृह्यताम् ।।” हा मंत्र बोलावा.
६. त्यानंतर गणपती बाप्पा आणि पोफळावर जानवे अर्पण करावे आणि “ॐ श्रीसिद्धिविनायकाय हेरंबगणेशाय नमः । यज्ञोपवीतं समर्पयामि।” हा मंत्र एकदा म्हणावा.
७. मग गणपती आणि पोफळावर कार्पासवस्त्र (कापसाचे वस्त्र) अर्पण करावे आणि “ॐ श्रीसिद्धिविनायकाय श्रीधुंडिराजगणेशाय नमः । वस्त्रं समर्पयामि।” हा मंत्र एकदा म्हणावा.
८. सुमुखः एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः । लंबोदरश्च विकटो विघ्ननाशि गणाधिपः ।।
ॐ श्रीसिद्धिविनायकाय भालचंद्राय गजाननाय नमः ।
सुगन्धित-रक्तपुष्पं समर्पयामि ।
हा मंत्र एकदा म्हणावा व गणपती बाप्पा आणि पोफळावर लाल फुले, सुगंधित फुले व दूर्वा अर्पण कराव्यात.
९. ॐ श्रीसिद्धिविनायकाय ब्रह्मणस्पतये नमः । धूपदीपौ समर्पयामि।
हा मंत्र एकदा म्हणावा आणि गणपती बाप्पा आणि पोफळाला उदबत्ती (अगरबत्ती) व निरांजनाने ओवाळून घ्यावे.
१०. त्यानंतर एकीकडे नैवेद्याची तयारी करायला घ्या.
ॐ श्रीसिद्धिविनायकाय विघ्नान्तकाय नमः।
ॐ प्राणाय स्वाहा।
ॐ अपानाय स्वाहा।
ॐ व्यानाय स्वाहा।
ॐ उदानाय स्वाहा।
ॐ समानाय स्वाहा।
ॐ ब्रह्मणे स्वाहा।
म्हणत राहा आणि नंतर बाप्पापुढे नैवेद्य ठेवावा व पाणी फिरवून नैवेद्यावर दूर्वा ठेवावी व हात जोडून -ॐ श्रीसिद्धिविनायकाय अन्नपूर्णानन्दनाय नमः । असे म्हणावे.
११. गणेश-गायत्री मंत्र १०८ वेळा म्हणून गणपतीस दूर्वा अर्पण कराव्यात.
ॐ एकदन्ताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि। तन्नो दन्तिः प्रचोदयात् ।। हा गणेश-गायत्री मंत्र १०८ वेळा म्हणण्याने श्रीगणेशाची विघ्ननाशक स्वरूपात प्राणप्रतिष्ठा होते.
१२. नंतर उठून साष्टांग नमस्कार करावा व स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात व त्यानंतर समोर उभे राहून
आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चनम् । पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर ।।
असे म्हणावे व पोफळावर अक्षता (तांदूळ) वाहाव्यात.
अशाप्रकारे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा संपन्न होईल.
