Gemini October Horoscope : मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुध बुद्धीचा कारक आहे. चुणचुणीत, हजरजबाबी आणि हुशार असे बुधाचे गुण मिथुन राशीच्या लोकांमध्ये आढळतात. आपली खरी ताकद बोलण्यातच असते. एखाद्याला हाताने नाही तर शाब्दिक फटक्यांनी गारद कराल.
आपले निरीक्षण अगदी बारकाव्यासह असते. विविध विषयात आपणास रस असतो. नवनवीन विषयांची आपणास ओढ असते. स्मरणशक्ती आणि समयसूचकता अफलातून असते. अशा या अस्थिर, अल्लड मिथुन राशीला ऑक्टोबर महिना कसा जाईल हे पाहूया.
वर्षभरातील महत्त्वाच्या ग्रहांचे राशीबदल असे आहेत (Mithun October Horoscope)
यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल वृषभ राशीत असेल. नेपच्यून आणि शनी दशमातील मीन राशीतून भ्रमण करतील. प्लूटो अष्टमातील मकर राशीतून भ्रमण करेल. मिथुन राशीतून भ्रमण करणारा गुरू १ जूनला कर्क राशीत प्रवेश करेल. गुरूचा हा राशी बदल आपणास हितकारक ठरेल. पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू सिंह राशीत प्रवेश करेल. गुरूचे हे सिंहस्थ स्थित्यंतरदेखील आपणासाठी पूरक ठरेल. २५ नोव्हेंबरला राहू वक्र गतीने भाग्यातील कुंभेतून अष्टमातील मकरेत प्रवेश करेल, तर केतू तृतीयातील सिंह राशीतून वक्र गतीने द्वितीयातील कर्क राशीत प्रवेश करेल.
मिथुन राशीचे ऑक्टोबर महिन्याचे राशीभविष्य (Gemini Horoscope October 2026)
पितृपक्षात धार्मिक कार्यांसह सामाजिक कार्यात सहभागी झाल्याचे अधिक समाधान वाटेल. घटस्थापना आपल्यातील कलागुणांना विशेष उत्तेजन देईल, तर कोजागिरी पौर्णिमा लाभदायक चांदणे पसरवेल. नवी आशा पल्लवीत होईल. विद्यार्थी वर्गासाठी नवी आव्हाने समोर येतील. मेहनत आणि हुशारी यांच्या बळावर यश मिळेल.
नोकरी व्यवसायात काही निर्णय घेताना मनात गोंधळ निर्माण होईल. डोकं शांत ठेवणे महत्त्वाचे! विवाहोत्सुक मंडळींचे प्रयत्न यशस्वी होतील. मनाजोगता जीवनसाथी मिळेल. विवाहित मंडळींनी एकमेकांच्या मताचा आदर करावा. आपल्या म्हणण्यानुसारच प्रत्येक वेळी गोष्टी घडतील असे नाही. गुंतवणूकदारांना उत्तम मार्गदर्शन मिळाल्याने भरघोस यश मिळेल. घराची समस्या चर्चेने आणि सामोपचाराने सुटेल. ३१ ऑक्टोबरला गुरू सिंह राशीत प्रवेश करेल.
– ज्योतिषी सोनल चितळे
