Ghatasthapana 2026 Date and Shubh Muhurta: नवरात्रीचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे. यंदा शारदीय नवरात्री नेमकी कधीपासून सुरू होणार आहे याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. १० ऑक्टोबर की ११ ऑक्टोबर या तारखेबाबत संभ्रम आहे. हिंदू पंचांगानुसार, अश्विन शुक्ल पक्षातल्या प्रतिपदा तिथी १० ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून १९ मिनिटांनी सुरू होत असून ११ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे उद्या तिथीच्या नियमानुसार नवरात्रीचा पहिला दिवस ११ ऑक्टोबर हाच मानला जाईल.

घटस्थापना कधी?

११ ऑक्टोबर रोजी सकाळी घटस्थापना करून नवरात्रौत्सवाला सुरूवात केली जाईल. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांपासून १० वाजून २६ मिनिटांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही वेळा चुकल्या तर दुपारी १२ वाजून २ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत अभिजीत मुहूर्तातही घटस्थापना करता येणार आहे.

नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कूष्मांडा, तर पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाईल. त्यानंतर सहाव्या दिवशी कात्यायनी, तर सातव्या आणि आठव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. नवमीच्या दिवशी महागौरी आणि सिद्धीदात्री या दोन्ही रूपांची पूजा केली जाते.

कशी करावी घटस्थापना (How to do Ghatasthapana)

१. आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना व मालाबंधन करावे. शेतातील माती आणून दोन बोटांचा जाड थर लावावा. त्यात पाच किंवा सात धान्ये (जवस, गहू, तीळ, मूग, राळे, सावे, चणे) टाकावीत.
२. तांब्या किंवा मातीच्या कलशात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचरत्ने/नाणे ठेवून मातीच्या मधोमध कलश बसवावा.
३. सप्तधान्ये व कलशस्थापनेचे वैदिक मंत्र माहीत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत किंवा प्रत्येक वस्तूचे नाव घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून अर्पण करावे. कलशाला माळ बांधावी.
४. अखंड दीप, ग्रंथवाचन, देवीची स्तोत्रे, भजने, पारायणे करावीत. चंडीपाठ, सप्तशतीपाठ, देवी भागवत, ललितोपाख्यान, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण अशा गोष्टी आपल्या सामर्थ्यानुसार कराव्यात.

दोन दिवस सप्तमी आणि अष्टमी- नवमी एकत्र

या वर्षी सप्तमीची तिथी दोन दिवस असल्याने १७ आणि १८ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी सप्तमी असणार आहे. १९ ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमीचे पूजन केले जाईल. याच दिवशी कन्या जूपनासह शारदीय नवरात्रीची समाप्ती होईल. त्यानंतर दशमी अर्थात २० ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाईल.

हत्तीवरून देवीचे आगमन म्हणजे काय? (Shardiya Navratri 2026 Devi Arrival)

धार्मिक मान्यतेनुसार, देवीचे हत्तीवरून आगमन शुभ संकेत मानले जाते. याचा संबंध सुख-समृद्धी, शांतता आणि धनधान्याच्या वाढीशी जोडला जातो. त्यामुळे यंदाची नवरात्री अनेकांसाठी शुभ फलदायी ठरू शकते अशी श्रद्धा आहे.

घोड्यावरून होणार देवीची पाठवणी

यंदा नवरात्रीची सांगता २० ऑक्टोबरला होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार त्या दिवशी मंगळवार असल्याने देवीचे प्रस्थान घोड्यावरून होईल असे मानले जाते. घोड्याला वेग, शक्ती आणि हालचालीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे देवीच्या घोड्यावरून प्रस्थानाचा संबंध काही धार्मिक परंपरांमध्ये मोठे बदल, घडामोडी किंवा अस्थिरतेशी जोडला जातो.

नवरात्रीत काय कराल?

नवरात्रीच्या काळात देवीची उपासना करताना श्रद्धेनुसार घटस्थापना, दुर्गासप्तशती किंवा देवीच्या मंत्रांचा जप, आरती आणि नैवेद्य केला जातो. प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार पूजेची पद्धत वेगळी असू शकते.