Baba Vanga prediction for World War 3: आकाशात घुमणारे आवाज, सीमांवर वाढलेली हालचाल आणि जागतिक राजकारणातील अस्वस्थता… जग जणू एखाद्या अनोळखी वळणावर उभं आहे. पश्चिम आशियातील तणाव वाढत असताना एक नाव पुन्हा चर्चेत आलं आहे बाबा वेंगा. अनेक दशकांपूर्वी त्यांनी केलेल्या २०२६ संदर्भातील सूचक विधानामुळे सोशल मीडियावर आणि चर्चासत्रांत नव्यानं खळबळ उडाली आहे.

२०२६ चं भाकीत नेमकं काय?

बुल्गारियातील गूढ भविष्यवक्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांनी २०२६ साली “पूर्वेकडून उभं राहणारं मोठं संकट” असा उल्लेख केल्याची चर्चा वारंवार पुढे येते. काही ज्योतिष अभ्यासकांच्या मते, त्या विधानात एका संभाव्य युद्धाची किंवा जागतिक अस्थिरतेची रूपकात्मक सूचना असल्याचं मानलं जातं.

त्यांनी थेट कोणत्याही देशाचं नाव घेतलं नव्हतं. मात्र “पूर्वेकडील हालचालींचा परिणाम दूरवर जाणवेल”, अशी शक्यता व्यक्त केली गेली असल्याचं सांगितलं जातं. आजच्या जागतिक परिस्थितीशी हे विधान जोडून पाहिलं जात असल्यामुळेच २०२६ हे वर्ष विशेष चर्चेत आलं आहे.

ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन काय सांगतो?

काही ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, २०२६ मध्ये ग्रहांची स्थिती विशेषतः शनी, मंगळ व राहू यांची हालचाल जागतिक स्तरावर तणाव वाढवणारी ठरू शकते. मंगळ हा युद्ध आणि उग्रतेचा ग्रह मानला जातो; तर शनी दीर्घकालीन परिणामांचे संकेत देतो. या ग्रहयोगांमुळे काही भागांत संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं मत काही अभ्यासक मांडतात.

तथापि, हे केवळ ग्रहस्थितीवर आधारित संकेत आहेत. याचा अर्थ निश्चित युद्ध किंवा विनाश होणारच, असा दावा कुणीही करत नाही. ज्योतिषशास्त्र हे शक्यतांचा वेध घेतं; निश्चित निष्कर्ष देत नाही.

लोकांमध्ये वाढतं कुतूहल

सध्या इंटरनेटवर २०२६, संभाव्य जागतिक संघर्ष आणि पूर्वेकडील तणाव यासंबंधीची शोधमोहीम वाढल्याचं दिसतं. त्यामुळे बाबा वेंगा यांचं नाव पुन्हा समोर येत आहे. काहींना त्यांच्या भाकितांमध्ये योगायोग दिसतो; तर काहींना त्यात भविष्यसूचक संकेत जाणवतात.

भीती की योगायोग?

इतिहासात अनेकदा भविष्यवाण्या आणि जागतिक घटना यांची सांगड घातली गेली आहे. मात्र, प्रत्येक वेळी ती अचूक ठरतेच, असं नाही. त्यामुळे २०२६ संदर्भातील चर्चा ही सध्या केवळ एक ज्योतिषीय शक्यता आणि सामाजिक कुतूहल म्हणूनच पाहणं अधिक सयुक्तिक ठरेल.

जग खरंच एखाद्या मोठ्या वळणावर उभं आहे का? की ही फक्त काळाच्या पडद्यामागची एक पडछाया आहे? याचं उत्तर भविष्याच्या उदरात दडलेलं आहे. त्यामुळे २०२६ हे वर्ष आता कसं उलगडत जाणार, याची चिंता जगाला लागून राहिली आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)