Gudi Padwa 2023: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा. गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार खूप शुभ मानला जातो. म्हणून या दिवशी नव्या कामाची सुरुवात करणे फलदायी असते असे मानले जाते. महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढी पाडव्यानिमित्त घरोघरी गुढ्या उभारलेल्या पाहायला मिळतात. शोभायात्रांसह नानाविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अन्य राज्यांमध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीला फार महत्त्व असते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर लोक पहाटे लवकर उठून स्नान करतात. त्यानंतर गुढी तयार करुन पूजा केली जाते. गुढी कशी उभारावी? गुढीसाठी वापरणारा तांब्या/कलश स्वच्छ धुऊन, पुसून घ्या. त्या कलशावर कुंकूने स्वास्तिक काढा. त्यासह हळदीचाही वापर करा. गुढी उभारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काठीला वेलू काठी असे म्हटले जाते. ही काठीही स्वच्छ करुन ठेवा. त्याला रेशमी वस्त्र बांधा आणि त्यावर कलश ठेवा. गुढीला कडुलिंब, आंब्याची पाने बांधा. सोबत साखरेची माळ देखील लावू शकता. ज्या जागी गुढी उभारणार आहात, तेथे रांगोळी काढू शकता. अंघोळ केल्यानंतर गुढी तयार करावी आणि हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी. ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची रचना केली अशी आख्यायिका प्रचलित आहे. यामुळे गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. आणखी वाचा - Gudi Padwa 2023: १ तास १० मिनिटे असणार गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या यंदाची तिथी, महत्त्व गुढी उभारल्यानंतर ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद।प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।। ही प्रार्थना म्हणावी. त्यानंतर पंचांगांचे पूजन करुन नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. पुढे कडुलिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुलिंबाचे पाणी घ्यावे. यंदा २२ मार्च (बुधवारी) रोजी गुढी पाडवा आहे. या दिवशी सकाळी ६.२९ ते ७.३९ हा गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे. सकाळी लवकर गुढी उभारणे योग्य असते. सूर्य मावळायला लागल्यावर त्याला नमस्कार करुन गुढी उतरवून ठेवावी.