Guru Asta 2026 : गुरू ग्रहाचा १४ जुलै २०२६ रोजी अस्त होईल आणि १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत तो त्याच अवस्थेत राहील. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तनासह वक्री-मार्गी होणे आणि उदय-अस्त होणे या अत्यंत महत्त्वपूर्ण घटना मानल्या जातात. ग्रहांच्या चालीतील प्रत्येक बदल सर्व १२ राशींच्या व्यक्तींच्या जीवनावर परिणाम करतो. असाच एक बदल येत्या काही दिवसांत गुरू ग्रहाच्या चालीत दिसून येईल.

गुरू हा शुभ फल देणारा ग्रह म्हणून ओळखला जातो. लग्न, मुंज आणि इतर मंगल कार्यांमध्ये या ग्रहाच्या स्थितीचा प्रामुख्याने विचार केला जातो. गुरूचा अस्त होत असल्यामुळे या काळात विवाह, गृहप्रवेश, मुंज आणि इतर कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही. गुरूचा अस्त झाल्यामुळे भाग्य, शिक्षण, धन, संतान आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित बाबींवर परिणाम होऊ शकतो. मात्र, ज्यांच्या जन्मकुंडलीत गुरू मजबूत स्थितीत आहे, त्यांना या काळात विशेष त्रास सहन करावा लागणार नाही. गुरूचा अस्त झाल्याने काही राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदलही घडतील. जाणून घेऊया या राशींबद्दल

मेष

गुरू अस्ताचा काळ मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करारांमुळे फायदा होऊ शकतो आणि उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ मिळाल्याने अनेक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

कर्क

हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठीही सकारात्मक ठरू शकतो. परदेश वारी किंवा परदेशाशी संबंधित कामांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि मूलांकडून शुभ बातमी मिळू शकते. करिअरमध्येही प्रगतीची दारे खुली होतील.

धनू

हा काळ धनू राशीच्या लोकांसाठी मानसन्मान आणि प्रगती घेऊन येणारा ठरेल. नोकरीमध्ये सहकारी आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विवाहातील अडथळे दूर होऊ शकतात. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह जमण्याचे किंवा संपन्न होण्याचे योग येतील. सामाजिक प्रतिष्ठेतही वाढ होईल.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)